तो क्षण होता अलौकिक, तो क्षण होता दैवी! जेव्हा नाशिक जिल्ह्यातील पवित्र ओझर नगरीचा आसमंत केवळ वेदघोषानेच (Vedas) नव्हे, तर एका अभूतपूर्व मानवी साधनेच्या तेजाने उजळून निघाला. निमित्त होते महापंडित धनंजयभट्ट जोशी गुरुजी (घनपाठी) यांच्या श्रीगुरुजी वेद विद्या प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘शुक्ल यजुर्वेद मूळसंहिता एकाकी कंठस्थ पाठ पारायण विधान’ सोहळ्याचे! या ज्ञानयज्ञात तीन बाल तपस्वींनी संपूर्ण शुक्लयजुर्वेद (Vedas) संहिता कंठस्थ म्हणून एक असाधारण विक्रम दक्षिण काशी म्हणजेच नाशिकमधून आपल्या नावे केला, जो इतिहासाच्या पानांवर सुवर्णअक्षरांनी कोरला जाईल.
नुकत्याच काशीच्या पुण्यभूमीत संपन्न झालेल्या ‘दंड क्रम विधाना’च्या धर्तीवर आयोजित या सोहळ्याने संपूर्ण भारताचे लक्ष वेधून घेतले. या पारायण सोहळ्यात देशभरातून शेकडो वैदिक विद्यार्थी ज्ञानाच्या महायज्ञात सहभागी होण्यासाठी जमले होते. या वेदशाळेतील तीन नक्षत्र तेजस्वीपणे तळपली – चि.वेदांत निसाळ, चि.सोहम चोपडे, आणि चि.शिव पाण्ड्या! या ब्रह्मचारी किशोरवयीन वेदकुमारांनी आपल्या अद्भुत स्मरणशक्ती, अविचल श्रद्धा आणि कठोर साधनेच्या बळावर संपूर्ण शुक्ल यजुर्वेद (Vedas) संहिता, एकही चूक न करता, मुखोद्गत सादर केली. त्यांचा तो स्वरबद्ध, लयबद्ध, शुद्ध आणि तेजस्वी वेदपाठ ऐकताना उपस्थित जनसमुदाय अक्षरशः भारावून गेला होता. जणू काही सहस्रो वर्षांपूर्वींचे ऋषी-मुनीच या बालकांच्या रूपात अवतरले असून, वेदगंगेचा प्रवाह पुन्हा एकदा पृथ्वीवर प्रवाहित करत आहेत, असाच तो दिव्य अनुभव होता.
(हेही वाचा Maharashtra Winter Session : संसदेत चर्चा सुरू असतानाच विधिमंडळात ‘वंदे मातरम’चे संपूर्ण गायन)
या ऐतिहासिक सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून शुक्ल यजुर्वेदाचे (Vedas) अभ्यासक विश्वविख्यात धर्मशास्त्रपंडित श्रीमहंत आचार्य पीठाधीश्वर डॉ.अनिकेतशास्त्री महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली, ज्यामुळे कार्यक्रमाला एक वैचारिक आणि आध्यात्मिक उंची प्राप्त झाली. आपल्या ओघवत्या आणि तेजस्वी वाणीने सर्व वेदपाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “वेदः शिवः शिवो वेदः। वेदाध्यायी सदा शिवः।।” या श्लोकाचा अर्थ उलगडताना त्यांनी सांगितले की, “जो वेदांचे (Vedas) अध्ययन करतो, तो विद्यार्थी सामान्य नसतो, तो साक्षात शिवस्वरूप असतो. तो त्रिकाल पूजनीय ठरतो. आज तुमच्यासारख्या युवा साधकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष वेद रक्षणाचे कार्य होत आहे, याचा संपूर्ण भारत भूमीला अभिमान आहे.”
पुढे त्यांनी वेदांचे महत्त्व अधोरेखित करताना “वेदोखिलो धर्ममूलम्” या उक्तीचा संदर्भ दिला. ते म्हणाले, “वेद हेच अखिल धर्माचे मूळ आहेत आणि त्या मूळाचे रक्षण करणे, हे ब्राह्मण समाजाचे आणि पर्यायाने संपूर्ण हिंदू समाजाचे आद्य कर्तव्य आहे.” त्यांच्या या तेजस्वी विचारांनी उपस्थितांमध्ये एक नवी ऊर्जा आणि प्रेरणा संचारली.
यावेळी मोठ्या संख्येने धर्मशास्त्र अभ्यासक, वैदिक परंपरेचे उपासक आणि नागरिक उपस्थित होते. हा सोहळा केवळ एक विक्रम नोंदवणारा कार्यक्रम नव्हता, तर तो सनातन परंपरेच्या उज्ज्वल भविष्याचे संकेत देणारा, नव्या पिढीसाठी एक प्रेरणादायी अध्याय ठरला आहे. श्रीगुरुजी वेद (Vedas) विद्या प्रतिष्ठानने केलेला हा संकल्प खरोखरच कौतुकास्पद असून, भारतीय संस्कृतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा ठरला आहे.
Join Our WhatsApp Community


