तरच जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाणीकपातीचा निर्णय

लांबणीवर पडलेला पाऊस आणि तलावातील आटणारे पाणी यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.

160
तरच जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाणीकपातीचा निर्णय

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या २४ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणी साठा असून जस जसे दिवस पुढे सरकत चालले आहेत, तसतसे तलावातील पाण्याचा साठाही आटत चालला आहे. जून महिन्यातील तीन आठवडे उलटत आले तरी पावसाचा काही पत्ता नाही. त्यामुळे लांबणीवर पडलेला पाऊस आणि तलावातील आटणारे पाणी यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. राज्य शासनाने राखीव पाणी साठ्यातील पाणी उचलण्यास मंजुरी दिली असली तरी आजवर दिवस रेटून नेणाऱ्या महापालिका प्रशासनाला आता पाणी कपातीशिवाय पर्याय उरलेला नाही.

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जर पावसाने तलाव क्षेत्रात हजेरी लावली नाही तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १५ टक्के पाणीकपात जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, नाशिकसह इतर भागांमध्ये पुढील आठवडयात मुसळधार पाऊस पडल्यास तलावातील पाणी साठ्यात वाढ झाल्यास ही कपात केली जाणार नसल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – वीर सावरकर कुटुंबीयांवरील ‘त्रिवेणी’ या नाटकाचा खर्च राज्य शासन उचलणार)

मुंबई पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा या सर्व धरणांमध्ये सध्या ११ टक्के एवढा पाणी साठा आहे, तर भातसामध्ये २ टक्के, विहारमध्ये १८ टक्के आणि तुळशीमध्ये २५ टक्के एवढा पाणी साठा या धरणांमध्ये आहे. त्यामुळे सर्व धरणांमध्ये सध्या केवळ ६.९२ टक्के एवढाच पाणी साठा असून सर्व धरणातील वापरातील पाणी आणि राखीव साठ्यातील पाणी अशाप्रकारे एकूण १२.७३ टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. ज्यात सध्या वैतरणा, मोडक सागरमधील राखीव पाणी साठ्यातून पाणी उचलण्यास सुरुवात केली आहे, तर सर्वात जास्त पाण्याचा पुरवठा करणाऱ्या भातसामधून अद्यापही राखीव साठ्यातील पाणी उचलले जात नाही.

मुंबईला दरदिवशी ३८५० दशलक्ष लिटर्स अर्थात ३८५ कोटी लिटर्स पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु विद्यमान वापरातील पाणी साठा ६.९२ टक्क्यांवर येवूनही महापालिका प्रशासनाने राखीव कोट्यातील पाणी साठ्याच्या बळावर कोणतीही पाणीकपात जाहीर केलेली नाही. परंतु जस जसे दिवस पुढे निघून जात वरुण राजांची कृपा होत नसल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मनात चिंतेचे काहूर माजायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे पावसाचे ढग आता विदर्भातून नाशिकच्या दिशेने पुढे सरकत असल्याने पुढील आठ दिवसांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जूनच्या या शेवटच्या आठवड्यात नाशिकसह इतर भागांमध्ये मुसळधार पाऊस पडल्यास मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारची कपात लागू करण्याची गरज भासणार नाही. परंतु जर जूनचा शेवटचा आठवडाही कोरडा गेल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाणीकपात लागू करण्याशिवाय पर्यायच उरणार नाही. त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या मुसळधार पावसावच पाणीकपातीचा निर्णय अवलंबून असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून समजते. निवृत्त जलअभियंत्यांच्या म्हणण्यानुसार, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाणीकपात लागू करायला हरकत नसून जुलै आणि ऑगस्टमधील पाणी साठ्याचा अंदाज घेऊन ही कपात मागे घेता येवू शकते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.