मुंबई किना-यालगत फिरणा-या डॉल्फिनचे रहस्य उलगडणार

पर्यावरण दिन विशेष

109

मुंबई किना-याजवळ संचार करणा-या डॉल्फिन या आकर्षक समुद्री जीवाच्या संचाराविषयी आता उलगडा होणार आहे. डॉल्फिनचा मुंबईजवळ अधिवास आहे का डॉल्फिन इतरत्र फिरत असताना मुंबई किना-याला भेट देतात, याबाबत वनविभागाच्या कांदळवन कक्षाच्या पुढाकाराने कोस्टल कॉन्झर्वेशन फाऊंडेशनच्यीवतीने डॉल्फिनचा अधिवासाचा वर्षभरासाठी अभ्यास केला जाईल. या प्रकल्पासाठी अपेक्षित खर्चाचा तपशील मात्र मिळाला नाही.

डॉल्फिनचा संचार मुंबईकरांना सुखावणारा

मुंबई किना-यावर इंडियन हम्प बॅक डॉल्फिन आणि इंडो पॅसिफिक फिनलेस पॉरपोईज या डॉल्फिन सदृश्य परंतु तुलनेने लहान आकाराच्या दोन सागरी जीवांचे दर्शन होत राहते. लॉकडाऊन काळात समुद्रात मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने चौपाट्यांजवळही डॉल्फिनचा सहज संचार मुंबईकरांना सुखावणारा ठरला. गेली कित्येक वर्ष मुंबईच्या किना-यावर आढळून येणारे डॉल्फिनच्या मृत्यूमागील कारण जाणून घेण्याचाही आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख शौनक मोदी यांनी दिली. वर्षभराच्या गणनेत संपूर्ण मुंबई किनारपट्टीची भ्रमंती घेत डॉल्फिनचा मागोवा घेतला जाईल.

सर्वेक्षणात आतापर्यंत २७ डॉल्फिन आढळले

यंदाच्या वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून डॉल्फिनविषयी अभ्यासाला सुरुवात झाली. यात प्रकल्पाचे प्रमुख शौनक मोदी, शास्त्रज्ञ माही माणकेश्वर, सागरीजीवप्रेमी तसेच समुद्री जीवांचे छायाचित्रकार प्रदीप पाताडे यांचा समावेश आहे. हाजी अली ते कुलाबा या दक्षिण मुंबईतील समुद्रातील बॅकबे परिसरात केलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत २७ डॉल्फिन आढळले. एका महिन्यानंतर पावसाळ्यामुळे चार महिने हा प्रकल्प सध्या थांबवला आहे.

महिन्याभरातील निरीक्षणे –

० महिन्याभरात २७ वेळा डॉल्फिनचे दर्शन झाले. ज्यामध्ये सर्वात मोठा समूह सहा डॉल्फिनचा आढळला.
० एकटा डॉल्फिनही स्वच्छंदीपणे समुद्रात संचार करताना दिसला.
० १५ वेळा आढळलेले डॉल्फिन समूहाने समुद्रात संचार करत होती. यात लहान आणि किशोरवयीने डॉल्फिनचाही समावेश होता.

डॉल्फिन मुंबई किनारपट्टीवरील समुद्रात संचार करण्यामागील कारण तसेच डॉल्फिन या सस्तन प्राण्याचे अधिवास क्षेत्र आम्हांला जाणून घ्यायचे आहे, असे प्रकल्प प्रमुख शौनक मोदी यांनी सांगितले आहे.

इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फीनबाबत

  • इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फीन समूहाने राहतात. ही संख्या बारा डॉल्फीनपर्यंत असते, पण त्यामध्ये मोठे बदलदेखील दिसतात.
  • इंटरनॅशनल युनिअन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर (IUCN) च्या यादीनुसार डॉल्फिन ही संकटग्रस्त प्रजाती म्हणून ओळखली जाते
  • किनारपट्टीवर सुरू असणारी विकासकामे आणि त्यांचे परिणाम या जवळ राहणारे सिटेशियन्स वर्गीय जसे की डॉल्फीन यांचा मृत्युदर अधिक आहे.
  • मानववंशजन्य अडथळ्यांचा परिणाम जसे की मासेमारी, प्रदूषण, अधिवासाचा ऱ्हास आणि ध्वनी प्रदूषण यामुळे हा मृत्युदर अधिक आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.