Veer Savarkar : बाल वयातच सावरकरांच्या लेखन प्रवासाची सुरुवात

ज्याचे कर आपल्या पडत्या राष्ट्राला सावरतात असा सावरकर - शीघ्रकवी बळवंत खंडुजी पारख, नाशिक

205
Veer Savarkar : बाल वयातच सावरकरांच्या लेखन प्रवासाची सुरुवात
Veer Savarkar : बाल वयातच सावरकरांच्या लेखन प्रवासाची सुरुवात

जयेश शत्रुघ्न मेस्त्री

काही मोजक्या क्रांतिकारकांना लेखन हा गुण लाभतो. सावरकर या बाबतीत खूप भाग्यवान म्हणायला हवेत. त्यांच्या लेखन प्रवासाची सुरुवात लहानपणीच झाली. भगूरला असताना सावरकर लेख लिहू लागले होते. त्यांनी लिहिलेले सर्व लेख आपल्या शिक्षकांना दाखवले. शिक्षकांना सावरकरांची प्रतिभा पाहून कौतुक वाटले. त्यांनी सावरकरांचे लेख प्रसिद्ध करण्यासाठी ‘लोकसेवा’चे संपादक अ.वा. बर्वे आणि ‘नाशिक वैभव’चे संपादक खरे यांच्याकडे पाठवले. विशेष म्हणजे या संपादकांनी सावरकरांच्या लेखनाची स्तुती केली आणि त्यांचे लिखाण प्रसिद्धही केले. शिक्षकांनी आणि संपादकांनी बाल सावरकरांना प्रोत्साहन दिल्यामुळे सावरकरांचे लेखन अधिकाधिक फुलत गेले. याच काळात त्यांनी ‘हिंदू संस्कृतीचा गौरव’ या मथळ्याचा लेख लिहिला आणि ‘नाशिक वैभव’च्या कार्यालयात पाठवला.

सुरुवातीला हा लेख वाचून संपादक खरे यांना प्रश्न पडला की, चौदा-पंधरा वर्षांचा मुलगा असा लेख लिहू शकतो ? त्यांनी याबाबत शिक्षकांना विचारले असता शिक्षकांनी सांगितले की, हा लेख विनायक सावरकरनेच लिहिला आहे. तेव्हा खरे यांनी ‘नाशिक वैभव’मध्ये अग्रलेख म्हणून तो छापला. सावरकारांच्या लेखन कौशल्यामुळे ज्येष्ठ मंडळी त्यांना मान देऊ लागली होती. याचे एक उदाहरण असे की, लोकमान्यांनी पुण्यामध्ये सुरु केलेले गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव नाशिकमध्येही करता यावेत म्हणून बर्वे पुढाकार घेत होते. या उत्सवासाठी बर्वेंनी जी पदे लिहिली, ती पदे सावरकरांना ऐकवत.

(हेही वाचा – Sharad Pawar On Partition : शरद पवारांना फाळणीच्या इतिहासाचे वावडे)

एकीकडे लेखन तर दुसरीकडे त्यांनी वक्तृत्व कलेचा अभ्यास सुरु ठेवला. सावरकरांचे वक्तृत्व इतके प्रभावी होते की, नाशिकचे शीघ्रकवी बळवंत खंडुजी पारख यांनी ’सावरकर हे नाव यथार्थ बरं का ! ज्याचे कर आपल्या पडत्या राष्ट्राला सावरतात असा सावरकर हो !’ सावरकरांनी लोकमान्यांचे कार्य आणि चापेकरांचे हौतात्म्य दाखवणारी एक एकांकिका लिहिली होती. याचे दिग्दर्शन त्यांचा एक मित्र करणार होता. मात्र गावच्या पाटलाने त्या पोराला धमकी दिल्यामुळे एकांकिका होऊ शकली नाही. १८९९ मध्ये सावरकरांनी चापेकर बंधू आणि रानडे यांच्यावर एक फटका रचला. जरी त्या काळी सरकारच्या भितीमुळे हा फटका प्रसिद्ध करण्याची कुणाची छाती झाली नसली तरी ठिकठिकाणी हा फटका गायला जाऊ लागला.

या फटक्यात सावरकर लोकमान्यांचा गौरव करताना म्हणतात,

‘देशवीर महाराज शूरश्री टिळक तयांचे क्षेम असो
खरा हित हा कसासि उत्तरे काळभीति ’बाळा’ सि नसो
सायंकाळी सवे चमकती बहुत काजवे आणि शशी
तशाच न्याये टिळक-सुधाकर ठरत तोलता इतरांशी’

दामोदरपंतांना फाशी होत असतानाचे खूप सुंदर वर्णन सावरकरांनी केले आहे. सावरकर लिहितात,

‘न्यायाधिशचि जोशी उत्तम, उदयमुहूर्ता योग्य गणी
सत्य देशहित वऱ्हाड जमले, कीर्ति-नीति या वऱ्हाडणी
टिळक-गजानन नमस्कारिला फास-बोहले मग पुरले
स्मरले गीतामंत्र ‘दामु’ने मुक्ती नवरिला हो वरिले’

या प्रसंगाचे वर्णन करताना त्यांनी लग्न-सोहळ्याची उपमा दिली आहे. न्यायाधिशांनी फाशीची शिक्षा सुनावली म्हणजे त्यांनी लग्नाचा मुहूर्त काढला आहे असे सावरकर म्हणतात. सत्य देशहित हे वऱ्हाड असून कीर्ति-नीति या वऱ्हाडणी आहेत. लोकमान्य टिळक हे गजानन असून दामोदरपंतांनी हसत हसत फाशीचा दोर गळ्यात घातला म्हणजे जणू ते बोहल्यावर चढले आहेत. लग्नातील मंत्र जसे असतात, तसे गीतामंत्र स्मरले, कारण भगवद्गीता हातात घेऊन त्यांनी फाशी स्वीकारली होती आणि फाशी दिल्यानंतर त्यांना मुक्ती मिळाली, असे म्हणत असाताना ती मुक्ती म्हणजे नवरी आहे, अशी उपमा सावरकर देतात. इतक्या लहान वयात सावरकर इतकी सुंदर कल्पना करतात. त्यांच्या या काव्य व लेखन प्रतिभेचे वर्णन ‘अद्भूत’, ‘चमत्कारिक’ अशाच शब्दांत करावेसे वाटते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.