सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडला सावरकरवाद

137

दसरा म्हटला की अनेकांना शिवसेनेचा मेळावा आठवतो. अर्थात हा मेळावा राजकीय असतो. यामध्ये विरोधकांवर जहरी टिका देखील केली जाते. परंतु दसऱ्‍याच्या दिवशी मेळावा घेतला पाहिजे आणि जनतेला संबोधित केले पाहिजे ही कल्पना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची. या उत्सवादरम्यान सरसंघचालक भारतीय जनतेला संबोधित करतात. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नसतो. हेतू असतो तो भारतमातेच्या विकासाचा, देशाच्या समृद्धीचा… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेमध्ये बाबाराव सावरकर यांचा मोठा वाटा होता. वीर सावरकरांचा देखील यास आशीर्वाद होता. दरवर्षी प्रमाणे यंदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव रेशीमबाग मैदानावर साजरा झाला. यंदाच्या विजयादशमी उत्सवात विशेष म्हणजे पहिल्यांदाच प्रमुख पाहुणे म्हणून महिलेला मान देण्यात आला होता, या उत्सवाला सुप्रसिद्ध गिर्यारोहक पद्मश्री संतोष यादव यांची उपस्थिती लाभली. संघाची शिस्त ही जगभरात चर्चेची गोष्ट आहे. अनेक लोक संघाच्या मेळाव्यावर टिका करतात. पण त्यांना १५ मिनिटे अशाप्रकारे शिस्तीत उभं राहताही येणार नाही.

तर ठाकरे आणि शिंदे गटासंबंधी टीआरपीच्या लढाईत मोहन भागवत यांच्या भाषणाकडे महाराष्ट्रातील पत्रकारांचं दुर्लक्ष झालं. कारण शिंदे व ठाकरे गटाच्या मेळाव्यात किती खुर्च्या मंचावर लावण्यात आल्या होत्या, इतक्या बारीक तपशीलात हे पत्रकार गुंतले होते. म्हणून त्यांना सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही, यात त्यांचा दोष नाहीच. संघाच्या कार्यक्रमाला पाहुणे महिला उपस्थित राहिली हीच मोठी ब्रेकिंग न्यूज होती. महिला पाहुण्यांना बोलवताना गिर्यारोहक पद्मश्री संतोष यादव यांचा विचार करण्यात आला ही दुसरी ब्रेकिंग न्यूज.

संतोष यादव ह्या वीर सावरकरांच्या दृष्टीकोनातील स्त्री आहेत. देशाच्या स्वातंत्र्याकरिता शत्रूला मारिता मारिता मरेतो झुंजेन अशी गर्जना करणारी स्त्री सावरकरांना अपेक्षीत आहे. सध्या भारताची वाटचाल सावरकरवादानुसार होत आहे. आज राष्ट्रप्रथम हा शब्दप्रयोग आपण सहज करतो परंतु ही प्रेरणा सावरकरांकडून घेतली आहे. वयाच्या १५ वर्षांपासून ते अखेरच्या श्वासापर्यंत सावरकर राष्ट्रासाठी जगले. विजयादशमी उत्सवातील सरसंघचालक मोहनराव भागवत यांचं भाषण या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.

सरसंघचालक म्हणाले, ‘डॉ. आंबेडकर यांनी संविधानामुळे राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळतील. मात्र, सामाजिक स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करावे लागतील असे म्हटले होते. सामाजिक समानतेसाठी कायदे आहेत. मात्र, विषमता आपल्या मनात आहे. मनातील ही विषमता दूर करण्याची आवश्यकता असून सगळ्यांनी त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मंदिर, पाणवठा आणि स्मशानभूमी आदी सगळ्यांसाठी एकच असायला हवे.’ हा सावरकरांचा विचार आहे. ‘तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, तो महादेवजी पिता आपुला, चला तया वंदू’ हा सावरकरांचा संदेश आहे. शत्रूशी लढायचे असेल अथवा देशाचा विकास घडवून आणायचा असेल तर त्याआधी आपल्यातील विषमता काढून टाकायला हवी. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत, संघटन करायला हवे. या सर्व गोष्टी सावरकरांनी केवळ सांगितल्या नाहीत तर प्रत्यक्षात करुन दाखवल्या आहेत.

‘आपल्या शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षणात मातृभाषेचा समावेश करण्यात येत आहे. त्यानुसार, आता पाठ्यक्रम पुस्तके आणि शिक्षकदेखील तयार होत आहे. पण, आपण आपल्या पाल्यांना मातृभाषेतील शिक्षणासाठी पाठवतो का?’ असा प्रश्नही त्यांनी विचारला. मातृभाषा व भाषाशुद्धी चळवळीचे सावरकर पुरस्कर्ते होते. मातृभाषा टिकली तर संस्कृती टिकून राहते. बऱ्याचदा भाषेसह संस्कृती देखील नष्ट होते. करिअरसाठी इंग्रजी आवश्यक नाही असंही भागवत म्हणाले. आपण इंग्रजीचा फुगा इतका फुगवला की आपल्याला आपलीच भाषा नकोशी वाटू लागली. इंग्रजीत बोलणं हे प्रतिष्ठेचं मानलं गेलं. मातृभाषा टिकवायची असेल तर मातृभाषेतील शाळेत मुलांना शिक्षण दिलं पाहिजे. पालक म्हणून ही आपली जबाबदारी आहे.

देशाच्या सुरक्षेतील महत्त्वाची बाधा म्हणजे दहशतवाद आणि भारतीय मुस्लिम तरुण या दहशतवादाला बळी पडत आहेत. हे भारताचे मोठे दुखणे आहे. म्हणूनच सावरकरांनी हिंदुंप्रमाणे मुस्लिमांना सुद्धा पोथीनिष्ठेचा त्याग करायला सांगितला होता. पण भारताचं दुर्दैव असं की इथल्या कॉंग्रेस संस्कृतीने सावरकरांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं. आज ही समस्या आ-वासून उभी आहे. यावर देखील सरसंघचालकांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘काहीजणांकडून भारताची प्रगती होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटकांकडून भारतातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सुरू असून भेदभाव वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. देशात दहशतवाद वाढावा, अराजकतेची स्थिती निर्माण व्हावी आणि लोकांना कायद्याचा आदर वाटू नये अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत. असे प्रयत्न कोण करतोय हे सांगण्याची आवश्यकता नाही. सरकारकडून अशा लोकांवर कारवाई सुरू असून आपण सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.’ हा सावरकरी विचारच तर आहे.

‘जितकी लोकसंख्या असेल तितका त्याचा ताण असेल हे खरे आहे. पण, तीच लोकसंख्या मनुष्यबळ म्हणून वापरली तर त्याचा उपयोग होऊ शकतो. ’ असं मोहन भागवत यांनी म्हटलं. सावरकरांनी देखील लोकसंख्येचे महत्त्व सांगितले होते. त्याचबरोबर ‘नको ती’ लोकसंख्या वाढली तर त्याचे भयानक परिणाम देखील भोगावे लागतात. यावर संरसंघचालकांनी प्रकाश टाकला.सरसंघचालक मोहन भागवत यांनी असे अनेक मुद्दे मांडले जे देशासाठी अत्यंत उपयुक्त आहेत, मार्गदर्शक आहेत. जे सावरकरांना अपेक्षित होतं,तेच भागवत म्हणत होते. संघासारख्या मोठ्या संघटनेचा प्रमुख ज्यावेळी बोलतो, तेव्हा त्या शब्दांना खूप महत्त्व प्राप्त होतं आणि तसे बदल भविष्यात घडणार असतात, हे ब्रेकिंग न्यूजसाठी हपापल्यांना कळेनासे झाले आहे. मोहन भागवत यांचे भाषण पुन्हा पुनः ऐकावे असेच आहे. सावरकरवाद हा देशासाठी किती उपयुक्त आहे याची कल्पना आपल्याला या भाषणातून येते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.