Plane Crash Peru :दक्षिण अमेरिकेतील पेरूमध्ये शनिवारी (1 ऑगस्ट) एक भीषण विमान दुर्घटना घडली. जगप्रसिद्ध ‘नाझ्का लाईन्स’ (Nazca Lines) पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणारे एक छोटे पर्यटन विमान कोसळल्याने विमानातील सर्व १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ११ परदेशी पर्यटक आणि दोन वैमानिक/क्रू सदस्य असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. दुर्घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बचाव आणि तपास पथके दाखल झाली असून, अपघाताचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विमान सहल ठरली अखेरची…
ही दुर्घटना पेरूच्या नाझ्का शहराजवळील सोकोस (Socos) परिसरात घडली. एरोडियाना (Aerodiana) कंपनीचे सेस्ना कॅरव्हॅन C-208 (Cessna Caravan C-208) हे विमान पिस्को विमानतळावरून दुपारी सुमारे 12.10 वाजता उड्डाण केले होते. नाझ्का लाईन्सवरून पर्यटन फेरी सुरू असतानाच, सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास वैमानिकांनी आपत्कालीन परिस्थितीचा संदेश (Emergency) दिला. त्यानंतर काही क्षणांतच विमानाशी संपर्क तुटला आणि ते जमिनीवर कोसळले. (Plane Crash Peru)
प्रत्यक्षदर्शींनी काही आंतरारष्ट्रीय माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, विमान कोसळताच त्याला भीषण आग लागली. त्यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले. अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली; मात्र विमानातील एकाही प्रवाशाला वाचवता आले नाही.
पेरूच्या परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये इटलीचे सात, जर्मनीचे दोन आणि स्पेनचे दोन पर्यटक होते. उर्वरित दोघे पेरूचे वैमानिक होते. मृतांचे वय 18 ते 78 वर्षांदरम्यान असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. (Plane Crash Peru)
नाझ्का लाईन्स काय आहेत?
नाझ्का लाईन्स या पेरूच्या वाळवंटी प्रदेशातील हजारो वर्षांपूर्वी जमिनीवर कोरलेल्या विशाल आकृत्या (Geoglyphs) आहेत. पक्षी, माकड, कोळी, वनस्पती आणि विविध भूमितीय आकृत्यांच्या स्वरूपातील या रचना इतक्या मोठ्या आहेत की त्यांचे संपूर्ण दर्शन केवळ आकाशातूनच घेता येते. या ऐतिहासिक वारसा स्थळाचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा (UNESCO World Heritage) यादीत करण्यात आला असून दरवर्षी सुमारे एक लाख पर्यटक येथे भेट देतात.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर पेरूच्या परिवहन आणि दळणवळण मंत्रालयाने तसेच विमान अपघात तपास आयोगाने संयुक्त तपास सुरू केला असून, अपघातामागे तांत्रिक बिघाड, तत्कालीन हवामान, मानवी चूक किंवा इतर अन्य कोणते कारण होते याचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित पर्यटन उड्डाणांबाबत अतिरिक्त खबरदारी घेतली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (Plane Crash Peru)
Join Our WhatsApp Community

