पाकिस्तानी गँगस्टर Shahzad Bhatti च्या टोळीवर केंद्राची मोठी कारवाई; UAPA अंतर्गत दहशतवादी संघटना घोषित

पाकिस्तानी गँगस्टर Shahzad Bhatti च्या टोळीवर केंद्राची मोठी कारवाई; UAPA अंतर्गत दहशतवादी संघटना घोषित

11
Shahzad Bhatti Network Declared Terrorist Organisation by Centre Under UAPA
Shahzad Bhatti Network Declared Terrorist Organisation by Centre Under UAPA

Shahzad Bhatti Network : पाकिस्तानस्थित ‘शहजाद भट्टी नेटवर्क’ (SBN) या संघटनेला केंद्र सरकारने बेकायदा कारवाया (प्रतिबंध) कायदा अर्थात UAPA अंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी १६ सप्टेंबर रोजी याबाबत माहिती दिली. गृह मंत्रालयाने UAPA च्या कलम 35(1)(a) अंतर्गत अधिसूचना जारी करून SBNचा कायद्याच्या पहिल्या अनुसूचीत समावेश केला आहे.

गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, शस्त्रास्त्रे, स्फोटके आणि अंमली पदार्थांची सीमापार तस्करी, तसेच तरुण आणि स्थानिक गुन्हेगारांना दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त करण्याच्या आरोपांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या नेटवर्ककडून भारताच्या लोकशाही व्यवस्थेला, सामाजिक सौहार्दाला आणि अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कारवाया केल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे.

अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, हे नेटवर्क सीमापार शस्त्रे, स्फोटके आणि अमली पदार्थांची तस्करी करण्यात सहभागी आहे. तसेच तरुण आणि किरकोळ गुन्हेगारांना दहशतवादाकडे वळवण्याचे काम केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भारताच्या लोकशाही रचनेला आणि सामाजिक सलोख्याला लक्ष्य करत या सिंडिकेटने द्वेषपूर्ण डिजिटल मजकूरही प्रसारित केल्याचा आरोप आहे.

अनेक कायद्यांनुसार गुन्हे दाखल

गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटले आहे की, SBNच्या कथित सदस्यांविरोधात विविध राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये भारतीय न्याय संहिता, शस्त्रास्त्र कायदा, UAPA, स्फोटक पदार्थ कायदा, स्फोटके कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि इतर संबंधित कायद्यांतील कलमांचा वापर करण्यात आला आहे. अधिसूचनेनुसार, युवकांना दहशतवादी कृत्यांसाठी प्रवृत्त करणं, तसेच भारताच्या लोकशाही व्यवस्था आणि सामाजिक सौहार्दाला धक्का पोहोचवणारी कृत्यं केल्याचा आरोप या संघटनेवर आहे. डिजिटल माध्यमांचा वापर करून प्रक्षोभक संदेश प्रसारित केल्याचाही उल्लेख केंद्राच्या अधिसूचनेत आहे.

14 राज्यांमध्ये कारवाई, 200 हून अधिक अटक

SBNविरोधात यापूर्वीही सुरक्षा यंत्रणांनी देशभरात कारवाई केली होती. गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये 14 राज्यांमध्ये 80 हून अधिक FIR दाखल करण्यात आल्या असून 200 हून अधिक जणांना अटक करण्यात आली होती. आता UAPA अंतर्गत SBNचा दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश करण्यात आल्याने या नेटवर्कविरोधातील केंद्र सरकारची कायदेशीर कारवाई आणखी कठोर झाली आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, केंद्र सरकारला SBNचा भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.