Maharashtra Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD), महाराष्ट्रासह देशातील पुढील काही दिवसांच्या हवामानाबाबत महत्त्वाचा अंदाज जाहीर केला आहे. सध्या सक्रिय असलेले कमी दाबाचे क्षेत्र, पुढील पाच दिवसांचा पावसाचा अंदाज आणि ऑगस्ट महिन्याचा दीर्घकालीन अंदाज यामुळे राज्यातील हवामानाचा पुढील कल स्पष्ट झाला आहे.
कमी दाबाच्या क्षेत्राचा पावसाचा परिणाम
IMD च्या माहितीनुसार, पूर्व विदर्भ आणि लगतच्या छत्तीसगड परिसरावर निर्माण झालेले ‘डिप्रेशन’ आता पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे. 31 जुलै रोजी सकाळी ते पश्चिम विदर्भ आणि दक्षिण मध्य प्रदेश परिसरात सक्रिय होते. सध्या हे कमी दाबाचे क्षेत्र अमरावतीच्या पूर्व-ईशान्येस सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असून वर्धा आणि मध्य प्रदेशातील बेतुल परिसरावर त्याचा प्रभाव आहे. (Maharashtra Rain Alert)
हे कमी दाबाचे क्षेत्र ताशी सुमारे 50 ते 65 किलोमीटर वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने सरकत असून पुढील काही तासांत त्याचे ‘वेल मार्क्ड लो प्रेशर एरिया’ मध्ये रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागांवर पावसाचे ढग
सध्या दक्षिण मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, उत्तर कर्नाटक आणि उत्तर-पश्चिम तेलंगणावर दाट ढगांचे आवरण कायम आहे. या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Rain Alert)
हवामान विभागाने संभाव्य अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
राज्यातील पावसाचा आढावा
IMD नुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. या भागांत ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. (Maharashtra Rain Alert)
याशिवाय नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाट भागातही जोरदार पावसाची शक्यता कायम आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Maharashtra Rain Alert)
पुढील पाच दिवस कसे असतील?
31 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीसाठी जारी केलेल्या अंदाजानुसार, सुरुवातीला काही भागांत मुसळधार पाऊस सुरू राहील. मात्र, त्यानंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होऊन राज्यातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्याचा दीर्घकालीन अंदाज
IMD च्या दीर्घकालीन अंदाजानुसार, ऑगस्ट महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही नाशिक परिसर वगळता बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान राहण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Rain Alert)
विशेष म्हणजे कोकण आणि घाटमाथ्यावरही नेहमीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊ शकतो.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत देशभरातील पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे 94 टक्के राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच, मान्सूनच्या उत्तरार्धात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहू शकते. (Maharashtra Rain Alert)
काही भागांत उकाडा वाढण्याची शक्यता
पावसाबरोबरच काही भागात तापमानवाढीबाबतही IMD ने महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. ऑगस्ट महिन्यात देशातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारत, मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पातील काही भागांत तापमान सामान्य किंवा किंचित जास्त राहू शकते. तसेच किमान तापमानही बहुतांश भागांत सामान्य ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.
एल निनोचा मान्सूनवर परिणाम
हवामान विभागाच्या मते, विषुववृत्तीय प्रशांत महासागरात मध्यम तीव्रतेचा एल निनो सक्रिय असून मान्सूनच्या उर्वरित कालावधीत तो आणखी प्रभावी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, इंडियन ओशन डायपोल (IOD) सध्या तटस्थ स्थितीत असून मान्सून संपेपर्यंत तो तसाच राहण्याचा अंदाज आहे. मात्र, सप्टेंबरमध्ये सकारात्मक IOD विकसित होण्याचे संकेत काही आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांनी दिले असून त्याचा पुढील हवामानावर परिणाम होऊ शकतो. (Maharashtra Rain Alert)
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community

