परमबीर सिंग खुल्या चौकशीला गैरहजर

72

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन वेळा समन्स पाठवून देखील ते खुल्या चौकशीला गैरहजर राहिले आहेत. यावेळी त्यांनी कोरोनाचे कारण देऊन चौकशीसाठी येण्याचे टाळले असल्याचे सांगण्यात आले आहे.

चौकशीला गैरहजर

मुंबई पोलिस दलातील पोलिस अधिकारी अनुप डांगे यांनी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चौकशीसाठी सोपवण्यात आले होते. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे खुली चौकशी सुरु असून या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संबंधिताची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवणे सुरु आहे. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० जानेवारी रोजी परमबीर सिंग यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र ते चौकशीसाठी हजर राहू शकलेले नव्हते, दरम्यान १८ जानेवारी रोजी त्यांना पुन्हा समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते, परंतु यावेळी त्यांनी कोविडचे कारण पुढे करून ते मंगळवारीही चौकशीला गैरहजर राहिले आहे.

( हेही वाचा : महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांविरोधात राज्याची नवी गाईडलाईन! जाणून घ्या… )

अधिकृत उत्तर नाही

‘आम्ही सिंग यांच्याविरुद्ध खुली चौकशी करत असल्याने, आम्ही सिंग यांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर नोंदणीकृत पत्राद्वारे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात समन्स पाठवले होते आणि त्यांना १० जानेवारीला हजर राहण्यास सांगितले होते, परंतु ते हजर झाले नाहीत. नंतर आम्ही त्याला १८ जानेवारीला हजर राहण्यासाठी दुसरे स्मरणपत्र पाठवले परंतु ते यावेळीही गैरहजर राहिले. याविषयी त्यांच्याकडून कोणतेही अधिकृत उत्तर आलेले नसल्याचे एसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. एसीबीने सांगितले की, त्यांनी या प्रकरणात ५० टक्क्यांहून अधिक चौकशी केली आहे, परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवणे बाकी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.