कोस्टल रोडच्या बांधकामात नवीन तंत्रज्ञान : सल्लागारांच्या शुल्कांत ७.२९ कोटींची वाढ

59

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पासाठी अर्थात कोस्टल रोडच्या कामाला सुरुवात होऊन आतापर्यंत ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. परंतु या प्रकल्प कामातील पुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक स्तंभ पायाच्या बांधकामाऐवजी परदेशात वापरल्या जाणाऱ्या एकल स्तंभ पायाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या एकल स्तंभ पायाच्या अतिरिक्त कामांसाठी सल्लागारांच्या शुल्कातही वाढ करावी लागणार असून यासाठी ७ कोटी २९ लाख रुपयांचा खर्च वाढणार आहे.

अतिरिक्त कोटींचा खर्च

मुंबई किनारा रस्ता प्रकल्पातील बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूचे दक्षिणेकडील टोक या पॅकेट दोनच्या कामासाठी इजिस इंडिया कन्सल्टींग इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व कलिन ग्रुमिट आणि रो (यु के) यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून ७ मार्च २०१८ मध्ये नियुक्ती करण्यात आली. या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सेवेसाठी ५७ कोटी ६१ लाख ६० हजार रुपयांच्या शुल्काची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. या भागासाठी एचसीसी व एचडीसी (संयुक्त भागीदारी) यांची कंत्राटदार म्हणून नेमणूक करयात आली आहे. या पॅकेट दोनमधील कंत्राटाचे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

परंतु आता कोस्टल रोड प्रकल्पामध्ये परदेशात वापरले जाणारे एकल स्तंभ पाया या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. हे तंत्रज्ञान भारतात प्रथमच वापरले जात आहे. त्यामुळे या कामावर देखरेख ठेवण्यासाठी, प्रकल्प स्तंभ पाया असलेल्या अतिरिक्त कामासाठी अनुभव असलेल्या तज्ज्ञांची आवश्यकता असल्याने यावर सल्लागार सेवेवर अतिरिक्त ७.२९ कोटींचा खर्च होणार आहे. त्यामुळे पॅकेट दोन मधील एकूण सल्लागार सेवेवर एकूण ६४.९१ कोटींचा खर्च होणार आहे.

( हेही वाचा : कमला नेहरु उद्यानातील ‘ट्री वॉकला’ कोस्टलच्या भुयारी मार्गाचा अडथळा! )

एकल स्तंभ पायाच्या बांधकामाचे फायदे

या नवीन स्तंभ पाया बांधकामाचा वापर केल्यामुळे कंत्राट कालावधीत कमीत कमी तीन महिन्यांची बचत होणार आहे. तसेच कंत्राट किंमतीतही बचतही होणार आहे. याशिवाय एक एकल स्तंभ पाया कामाचा दोष दायित्व कालावधीही दोन वर्षांऐवजी ५ वर्षांपर्यंत असेल. याबरोबरच समुद्रामध्ये बंधारा बांधून पाया बनवण्यासाठी लागणारी मनुष्यबळाची यंत्रणा अत्यंत कमी लागणार आहे. त्यामुळे कामगारांचीही सुरक्षा वाढणार आहे. याबरोबरच समुद्र तळातील पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.