
Mumbai: गिरगावातील ठाकूरद्वार परिसरातील वैद्यवाडीत असलेल्या सुमारे २०० वर्षे जुन्या विठ्ठल-रखुमाई मंदिराचा वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन विभागाने मंदिराचा वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्याबाबत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत.
विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या संरक्षणाच्या लक्ष्यामध्ये विठ्ठल-रखुमाई सेवा समितीने तब्बला १३ वर्षे न्यायालयीन, प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर सातत्याने संघर्ष केला. समितीचे अध्यक्ष किशोर भाटकर, सचिव सुमित्रा हिर्लेकर, संजय मेर्वेकर, मिलिंद गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता मंदिराच्या संरक्षणासाठी अविरत पाठपुरावा केला.
हेही वाचा – Pandharpur : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजेसाठी ऑनलाइन नोंदणी पुन्हा सुरू होणार; कुठे आणि कसे कराल बुकिंग?
त्यांच्या चिकाटीमुळे मंदिराच्या हेरिटेज दर्जाचा प्रस्ताव अंतिम निर्णयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. हे मंदिर विकसकाच्या भूमिकेमुळे तसेच विविध प्रशासकीय आणि न्यायालयीन प्रक्रियांमुळे मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर १३ वर्षांच्या संघर्षाला यश आले आहे.
पसायदान चॅरिटेबल संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष मनोज अमरे म्हणाले, ‘श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून गिरगावच्या इतिहासाचे, वारकरी परंपरेचे आणि मुंबईच्या सांस्कृतिक वारशाचे जिवंत प्रतीक आहे. हा अमूल्य वारसा पुढील पिक्यांसाठी जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने शासनाकडे सकारात्मक सूचना व हरकती नोंदवून मंदिराच्या हेरिटेज दर्जाला पाठिंबा द्यावा.
गौरवशाली भूतकाळ
ठाकूरद्वार येथील हे विठ्ठल-रखुमाई मंदिर म्हणजे केवळ एक वास्तू नसून, तो मुंबईच्या गौरवशाली भूतकाळाचा एक जिवंत अध्याय आहे. हे मंदिर सुमारे २०० वर्षांपेक्षाही अधिक जुने आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्यलढ्याच्या आणि परिसरातील अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक घडामोडींच्या केंद्रस्थानी हे मंदिर असायचे. त्या काळातही या मंदिराचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आणि आदराचे मानले जात असे.
सूचना आणि हरकतींची अंतिम मुदत
येत्या २३ ऑगस्टपर्यंत नागरिकांना आपल्या अमूल्य सूचना आणि हरकती महापालिका मुख्यालयाच्या विस्तारित इमारतींमधील प्रमुख अभियंता (विकास नियोजन) यांच्या कार्यालयात सादर करता येणार आहेत.
नकाशा आणि छायाचित्रे उपलब्ध
या मंदिराचा स्थळदर्शन नकाशा आणि ऐतिहासिक व वर्तमानातील छायाचित्रे महापालिका मुख्यालयातील उपवास्तुशास्त्रज्ञ (विकास नियोजन) यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
पाहण्याची सोय
नागरिकांना कार्यालयासमोर वेळेत प्रस्ताव घेऊन ते दस्तावेज व छायाचित्रे पाहण्याची विशेष सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती आणि आवाहन
या ऐतिहासिक मंदिराच्या जतनासाठी महापालिकेने पावले उचलली असून, नागरिकांना यात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही पहा –

