Bharat Ratna : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची खासदार राहुल शेवाळे यांची लोकसभेत मागणी

हिंदूहृदयसम्राट आणि शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचेही राम मंदिराच्या उभारणीसाठी मोठे योगदान आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी पाडण्यात त्यांचे मोठे योगदान मानले जाते, असे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे म्हणाले.

175

अयोध्येत श्रीराम मंदिर उभारण्याच्या आंदोलनात १९९२ मध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची महत्वाची भूमिका होती. त्याठिकाणची मशीद पाडण्यामध्ये शिवसैनिकांचाही प्रत्यक्ष सहभाग होता. त्याकरता बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली होती, त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न (Bharat Ratna) पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत बोलताना केली.

बाबरी पाडण्याच्या रणनीतीमध्ये बाळासाहेबांची महत्वाची भूमिका 

लोकसभेत याविषयावर बोलताना यावेळी राहुल शेवाळे म्हणाले की, राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग सुकर करण्यात माजी पंतप्रधान पी.व्ही नरसिंहराव, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचे योगदान आहे. त्यामुळे त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान म्हणजेच ‘भारतरत्न’ देण्यात येईल, अशी घोषणा करून मोदी सरकारने देशातील १३० कोटी हिंदूंचा गौरव केला आहे. यासाठी मी पुन्हा एकदा सरकारचे आभार मानतो. तसेच हिंदूहृदयसम्राट आणि शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचेही राम मंदिराच्या उभारणीसाठी मोठे योगदान आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी पाडण्यात त्यांचे मोठे योगदान मानले जाते. जरी ते स्वतः बाबरी पाडण्यासाठी घटनास्थळी उपस्थित नव्हते. तरीही बाबरीचा ढाचा पाडण्याच्या रणनीतीमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती, असे खासदार शेवाळे म्हणाले.

(हेही वाचा : Firing : मुंबईनंतर आता पुणे हादरले; घोसाळकरांच्या हत्येनंतर पुण्यात दुकानदारावर गोळ्या झाडून स्वतःला संपवले)

बाळासाहेबांना भारतरत्न देऊन १३० कोटी हिंदूंचा सन्मान करावा

मशीद पाडण्यात शिवसैनिक स्वतः प्रत्यक्ष हजर होते, खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी हा दावा केला होता. आज हिंदुत्वाचे आणि हिंदू धर्माचे महान प्रणेते बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण केले की, प्रत्येक हिंदूची छाती अभिमानाने भरून येते. देशाच्या या महान व्यक्तिमत्वाला, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न (Bharat Ratna) देऊन देशातील १३० कोटी हिंदूंचा सन्मान करावा, अशी माझी सरकारकडे मागणी आहे. या प्रस्तावाद्वारे मी सरकारला हेही सांगू इच्छितो की, या राम मंदिराच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्वांचाही सन्मान केला पाहिजे. कारसेवकांनी मोठे योगदान आणि बलिदान दिले आहे. ज्या कारसेवकांनी हौतात्म्य पत्करले आहे, त्यांच्या कुटुंबीयांसाठी शासनाच्या माध्यमातून पेन्शन योजना सुरू केल्यास त्यांच्या कार्याला मोठा सन्मान मिळेल, अशी माझी सरकारकडे मागणी आहे, असे खासदार शेवाळे म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.