वानखेडेंवर आरोप करणारे नवाब मलिक एकटे पडले का?

त्यांना त्यांच्या पक्षातील कुठलेही नेते साथ देत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

113

केंद्रीय यंत्रणा असलेल्या नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी)ला लक्ष्य करणारे राज्याचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे एकटे पडले आहेत. त्यांच्याच पक्षातील नेते त्यांना या प्रकरणात साथ देत नसल्याचे समोर आले आहे.

समीर वानखेडे यांची चौकशी करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण वानखेडे हे केंद्रीय तपास यंत्रणेचा भाग आहेत, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी नवाब मलिकांच्या विधानावर पत्रकारांना उत्तर देताना म्हटले आहे. त्यामुळे नवाब मलिक हे एनसीबी विरुद्ध लढाईत एकटेच पडत चालले असून, त्यांना त्यांच्या पक्षातील कुठलेही नेते साथ देत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान समीर वानखेडे यांनी ही लढाई आता कायदेशीररित्या लढवली जाईल, असे म्हटले आहे.

(हेही वाचाः नवाब मलिकांनी कोणता केला नवा दावा? वाचा…)

वानखेडेंवर मलिकांचा निशाणा 

क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात एनसीबीने आर्यन खानसह इतरांना अटक केल्यानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कार्य पद्धतीवर थेट निशाणा साधत, ही लढाई या एनसीबीचे मुंबई विभागाचे प्रमुख समीर वानखेडे यांच्या खाजगी जीवनापर्यंत आणून ठेवली. समीर वानखेडे यांच्या कुटुंबाला नवाब मलिक यांनी या लढाईत ओढले असून, समीर वानखेडे यांच्यावर वसुलीचा आरोप मलिक यांनी केला आहे.
तसेच वर्षभरात तुझी नोकरी घालवून तुला जेलची हवा खायला पाठवेन, या शब्दांत मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला.

मला कल्पना नाही- गृहमंत्री

वानखेडे यांनी देखील हे आरोप मोडीत काढले. कोणी माझ्या कुटुंबापर्यंत आल्यास मी गप्प बसणार नाही, कायदेशीर मार्गाने ही लढाई लढवेन, असे वानखेडे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना काही पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारले असता, राज्य सरकारकडून याबाबत चौकशी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कारण समीर वानखेडे हे केंद्रीय यंत्रणेचा भाग असून, ते त्यासाठी काम करत आहेत. मला त्यांनी (नवाब मलिक) केलेल्या आरोपांबाबत कुठलीही कल्पना नाही किंवा कुठलेही पुरावे माझ्यापर्यंत आलेले नसल्याचे वळसे पाटील म्हणाले.

(हेही वाचाः नवाब मलिक खोटारडे, कुटुंबावर खोटे, घाणेरडे आरोप करतात! वानखेडेंचा पलटवार)

दरम्यान, नवाब मलिक हे एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर करत असलेल्या आरोपांबाबत राष्ट्रवादीचे नेते अथवा सरकार मधील एकाही नेत्यांनी अद्याप कुठलेही भाष्य केलेले नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.