लंपी प्रादुर्भाव : राज्यभरात सात लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण

110

राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये १४ सप्टेंबर २०२२ अखेर लंपी आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. लंपी नियंत्रणासाठी बाधित परिसरातील २ हजार ५३५ गावांमध्ये ७ लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

सिंह म्हणाले, जळगाव २४, अहमदनगर १७, धुळे १, अकोला ५, पुणे ८, सातारा २, बुलडाणा ३, अमरावती ३ व वाशिम जिल्ह्यात १ अशी ६४ बाधित जनावरे या आजारामुळे दगावली. तर १ हजार ७५६ पशुधन उपचाराने बरे झाले. पशुसंवर्धन विभागाकडून याबाबत सुरूवातीपासूनच आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळे महाराष्ट्रातील लंपी रोगामुळे मृत्यूदराचे प्रमाण कमी राखण्यामध्ये यश आले आहे. बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील २ हजार ५३५ गावातील एकूण ६ लाख ९७ हजार ९४९ पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे व पुढील लसीकरण सुरू आहे. बाधित गावांतील एकूण ३ हजार ५१९ बाधित पशुधनापैकी १ हजार ७५६ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

बाधित गावांच्या ५ किमी क्षेत्रात लसीकरण

लंपी आजाराच्या नियंत्रणासाठी १६.४९ लाख लसमात्रा राज्यात उपलब्ध आहेत. १४ सप्टेंबर रोजी अतिरिक्त ५ लाख लसमात्रा राज्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. आणखी ५० लाख लसमात्रा आठवडा भरात प्राप्त होत आहेत. त्यानुसार अभियान स्वरुपात बाधित गावांच्या ५ किमी क्षेत्रात लसीकरण करण्यात येत आहे. त्यानंतर प्राधान्याने गोशाळा व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशुधन असलेल्या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार असल्याचे सिंह यांनी यावेळी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.