भारत-नेपाळ मैत्री ‘बस’ला पुन्हा हिरवा कंदील!

74

पश्चिम बंगालमधील सिलीगुडी आणि नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू दरम्यान असलेली बस सेवा कोविड-19 मुळे दीड वर्षाहून अधिक काळ स्थगित राहिल्यानंतर पुन्हा सुरू झाली आहे. ही बस काकरविटा, लालगड, नौबिस मार्गे काठमांडु असा प्रवास करते. या बसमधून एकावेळी ४५ प्रवासी प्रवास करू शकतात.

कोविड काळात नेपाळने भारताशी संलग्न असलेल्या सीमा बंद केल्यामुळे, भारत आणि नेपाळ दरम्यान असलेली ही मैत्रीपूर्ण बससेवा गेल्या वर्षीपासून बंद करण्यात आली होती. पण आता या बससेवेला पुन्हा एकदा हिरवा कंदील मिळाला आहे.

लसीकरण बंधनकारक

या बसमधील प्रवाशांना काही अटींची पूर्तता करणे मात्र आवश्यक असणार आहे. बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना सर्व कोविड-सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याबरोबरच, संपूर्ण लसीकरण करणे बंधनकारक असणार आहे, असे या बस संघटनेचे सचिव संतोष साहा यांनी स्पष्ट केले. आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी दुपारी ३ वाजता पश्चिम बंगालमधील सिलीगुडीहून ही बस सुटेल व दुस-या दिवशी सकाळी ११ वाजता कक्कडविट्टा-पाणिटंकी मार्गे काठमांडुला पोहोचेल. या बसच्या तिकीटाची किंमत प्रतिप्रवासी १५०० रूपये एवढी आकारली जाईल.

कोरोनामुळे बससेवेत खंड

कोरोना संसर्गामुळे सिलीगुडी ते काठमांडू मैत्री बस सेवेवर बंदी घालण्यात आली होती. यामुळे पर्यटनावर मोठा परिणाम झाला होता. आम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, पण येणारे दिवस पर्यटनासाठी चांगले जातील अशी आम्हाला आशा आहे, असे सचिव संतोष साहा यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.