Russian Crude Oil : जागतिक भू-राजकीय तणाव आणि ऊर्जा बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी (Crude Oil) आणखी वाढवली आहे. मे 2026 मधील ताज्या आकडेवारीनुसार, भारताने रशियाकडून 5.55 अब्ज डॉलर्स (सुमारे 4.8 अब्ज युरो) किमतीच्या कच्च्या तेलाची आयात केली असून, एप्रिलच्या तुलनेत त्यात 6.6 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. यामुळे चीननंतर रशियन तेल खरेदी करणारा भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे.
फिनलंडस्थित सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) या संस्थेच्या अहवालानुसार, मे महिन्यात भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची खरेदी केली. स्वस्त दरात उपलब्ध होणारे रशियन तेल आणि देशांतर्गत वाढती ऊर्जा मागणी यामुळे भारतीय रिफायनरी कंपन्यांनी खरेदी वाढवल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा: Crime News : पित्याचा संताप अनावर, लेकीच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, पत्नीलाही… गुन्ह्यामागचे कारण उघड
तेलाच्या खरेदीत वाढ
CREA च्या अहवालानुसार, मे महिन्यात भारताने रशियाकडून एकूण सुमारे 5.8 अब्ज युरो किमतीचे जीवाश्म इंधन (Fossil Fuels) आयात केले. यापैकी तब्बल 83 टक्के हिस्सा कच्च्या तेलाचा होता. उर्वरित आयातीत तेलजन्य उत्पादने आणि कोळशाचा समावेश होता.
अहवालात नमूद करण्यात आले आहे की, भारताच्या एकूण कच्च्या तेल आयातीत मे महिन्यात सुमारे 8 टक्क्यांची वाढ झाली. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे रशियाकडून होणाऱ्या आयातीत झालेली 21 टक्के वाढ.
देशातील प्रमुख रिफायनरी केंद्रांमध्ये रशियन तेलाच्या आगमनात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गुजरातमधील वाडीनार रिफायनरीमध्ये एप्रिलच्या तुलनेत रशियन तेलाची आवक 36 टक्क्यांनी वाढली, तर जामनगर रिफायनरी संकुलातही 14 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. ओडिशातील पारादीप रिफायनरीमध्ये गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक रशियन तेल उतरवण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा: अमेरिका स्थलांतरितांसाठी असुरक्षित, प्रशासनाचे कडक धोरण; AAPI समुदायात भीतीचे वातावरण
स्वस्त दरामुळे भारताचा फायदा
मे महिन्यात रशियाच्या युरल्स (Urals) क्रूड तेलाची सरासरी किंमत एप्रिलच्या तुलनेत सुमारे 12 टक्क्यांनी घसरून 82.02 डॉलर प्रति बॅरल इतकी झाली. तसेच हे तेल ब्रेंट क्रूडच्या तुलनेत सुमारे 25 टक्के स्वस्त उपलब्ध होते. त्यामुळे भारतीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी वाढविल्याचे मानले जाते.
दरम्यान, रशियन तेलासोबतच भारत इतर स्रोतांकडूनही पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिफायनऱ्यांनी लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांकडूनही तेल खरेदी वाढविली आहे. मात्र स्वस्त आणि सातत्यपूर्ण पुरवठा मिळत असल्याने रशिया अद्याप भारताचा प्रमुख पुरवठादार राहिला आहे.
तज्ज्ञांच्या मते, भारताची ही भूमिका पूर्णपणे ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंधांवर आधारित आहे. वाढती औद्योगिक मागणी, इंधन वापर आणि जागतिक बाजारातील चढ-उतार लक्षात घेता भारताने ऊर्जा पुरवठ्याचे विविधीकरण करताना रशियन तेल खरेदी कायम ठेवली आहे.
Join Our WhatsApp Community

