“मी मोदींचा फॅन”, एलॉन मस्क यांनी घेतली पंतप्रधान मोदींची न्यूयॉर्कमध्ये भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१५ मध्ये मस्क यांच्या कॅलिफोर्निया या ठिकाणी असलेल्या टेस्ला मोटर्सच्या फॅक्टरीतही त्यांना भेटले होते.

174
"मी मोदींचा फॅन", एलॉन मस्क यांनी घेतली पंतप्रधान मोदींची न्यूयॉर्कमध्ये भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अशातच टेस्ला कंपनी आणि ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान “मी मोदींचा फॅन झालो आहे” असं मस्क यांनी सांगितलं आहे. आम्हा दोघांची भेट झाल्यानंतर मी खूप आनंदी आहे असं एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मी जी चर्चा केली ती खूपच सकारात्मक स्तरावर झाली. तसंच पुढच्या वर्षी मी भारतात येण्याचाही विचार करतो आहे. मोदींच्या भेटीनंतर मी त्यांचा फॅन झालो आहे असंही एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१५ मध्ये मस्क यांच्या कॅलिफोर्निया या ठिकाणी असलेल्या टेस्ला मोटर्सच्या फॅक्टरीतही त्यांना भेटले होते. आता पुन्हा एकदा त्या दोघांची भेट झाली. टेस्ला मोटर्स ही कंपनी भारतात कारखाना सुरु करण्याच्या दृष्टीने जागेच्या शोधात आहे. त्या पार्श्वभूमीवर एलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २० ते २४ जून या कालावधीत अमेरिकेत असणार आहेत. या दौऱ्यात अमेरिकेच्या संसदेतही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करणार आहेत. अमेरिकेच्या संसदेत दोनदा भाषणाची संधी मिळणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. २२ जून रोजी अमेरिकेत मोदींसाठी सरकारी स्नेह भोजनही आयोजित करण्यात आलं आहे.

एलॉन मस्क यांनी काय म्हटलं आहे?

“मी पुढच्या वर्षी भारताचा दौरा करण्याचा विचार करतो आहे. टेस्ला लवकरच भारतात येईल ही माझी खात्री आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. भविष्यात आम्ही मोठी घोषणा करु. भारतात गुंतवणूक करणं हे नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि माझी सकारात्मक आणि चर्चा झाली.” या आशयाचं वक्तव्य मस्क यांनी केलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.