गोव्यात वैश्विक हिंदु राष्ट्राचा उद्घोष

167
गोव्यात वैश्विक हिंदु राष्ट्राचा उद्घोष
गोव्यात वैश्विक हिंदु राष्ट्राचा उद्घोष

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, इंडोनेशिया, सिंगापूर, बेल्जियम, बांग्लादेश आणि नेपाळ या देशांसह भारतातील २८ राज्यांतील ३५० हून अधिक हिंदु संघटनांच्या १५०० हून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांची घेतलेली मुलाखत…

प्रश्न : यंदाच्या वर्षी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’असे नामकरण केले आहे, याचे काही विशेष कारण आहे का?

रमेश शिंदे : या अधिवेशनाला भारतातील २६ राज्यांसह अमेरिका, इंग्लंड, फिजी, हाँगकाँग, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ हे देश सहभागी होत आहेत. हिंदु राष्ट्राच्या दृष्टीतून विश्व एक परिवार आहे; म्हणून आपण ‘वसुधैव कुटुम्बकम’ (वसुधा म्हणजे पृथ्वी हेच कुटुंब) म्हणतो. हिंदु राष्ट्राची संकल्पना ही कोणतीही प्रादेशिक राष्ट्रवादाची संकल्पना नाही. गेले वर्षभर इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने चालू आहेत. तेथील निदर्शने करणाऱ्या ७०० विद्यार्थिनींवर विषप्रयोग केला. त्या इराणी भूमीत आज वैश्विक हिंदु राष्ट्र हवे आहे. पाकिस्तानमध्ये प्रतिदिन धर्मांतरित होणारे हिंदु परिवार आणि बलात्कारित होणाऱ्या हिंदु स्त्रिया या भारतीय हिंदु राष्ट्राकडे मोठ्या अपेक्षेने पहात आहेत. दुसरीकडे आर्थिक मंदीमध्ये अडकलेला श्रीलंकेसारखा देशही आज भारताच्या वैश्विक संस्कृतीचे गुणगान गात आहे. ख्रिस्ती अमेरिका आणि रशिया या पारंपरिक शत्रूंनाही हिंदु राष्ट्राशी आर्थिक मैत्री हवी आहे. २०१२ मध्ये ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ हे एकमेव व्यासपीठ हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करत होते. आज २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करणारी अनेक व्यासपिठे आहेत आणि ती सर्वच राज्यांत निर्माण झालेली आहेत.

प्रश्न : मागील १० अधिवेशनांच्या माध्यमातून तुम्ही नेमके काय साध्य केले?

रमेश शिंदे : आज भारतभर जी हिंदु राष्ट्राची चर्चा चालू झाली आहे, ही हिंदु राष्ट्र अधिवेशनाची फलनिष्पत्ती आहे. वर्ष २०१२ पासून आम्ही हिंदु अधिवेशन आरंभ केल्यानंतर हिंदु राष्ट्राची जाहीरपणे देशभर चर्चा चालू झाली. या अधिवेशनासह प्रांतीय अधिवेशनामुळे देशभरातील ५०० हून अधिक हिंदु संघटना संघटित झाल्या. प्रत्येक महिन्यात ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्याचे निश्चित झाले. गेल्या ११ वर्षांत देशभरातील विविध हिंदु संघटनांनी एकत्र येत राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी १,६८८ हून अधिक आंदोलने केली. हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’ने हिंदुहितासाठी अनेक खटले विनामूल्य लढवले, आजही ते विनामूल्य लढत आहेत. यातून अनेक अवैध पशुवधगृहे बंद करण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील श्री तुळजापूर मंदिर, कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर, पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर, शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान, कोल्लूर येथील श्री मुकांबिका मंदिर आदी अनेक सरकारीकरण झालेल्या मंदिरातील भ्रष्टाचार उघडकीस आणला. या अधिवेशनांमध्ये उत्स्फूर्तपणे ‘उद्योगपती परिषद’, ‘आरोग्य साहाय्य समिती’, ‘राष्ट्रीय पत्रकार मंच’ यांची स्थापना होऊन त्या-त्या क्षेत्रातील लोक हिंदु राष्ट्रासाठी संघटित होत आहेत. अधिवेशनातील सहभागी संघटनांनी ‘Dismentling Global Hindutva’ या हिंदुत्वाला बदनाम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेला जागतिक स्तरावर जोरदार विरोध करण्यात पुढाकार घेतला. अधिवेशनात निश्चित केलेल्या समान कृती कार्यक्रमाच्या अंतर्गत देशभरात आम्ही ‘राष्ट्रीय मंदिर संस्कृती रक्षा अभियान’ राबवले. याच्या माध्यमांतून कर्नाटकातील बेळगाव येथील एक मंदिर सरकारीकरण करण्यापासून रोखले गेले. महाराष्ट्रातील जवळपास ५० मंदिरांमध्ये ‘वस्त्रसंहिता’ लागू करण्यात आली, तर एकूण ३०० मंदिरांमध्ये लागू करण्याची प्रक्रिया चालू आहे.

प्रश्न : भारत सेक्युलर असतांना ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करणे, हे असंवैधानिक आहे. याबद्दल आपण काय सांगाल?

रमेश शिंदे : ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाला असंवैधानिक ठरवणारे ‘सेक्युलर’वादी आज ज्या ‘सेक्युलर’ शब्दाचा उदो उदो भारतात करत आहेत, तो ‘सेक्युलर’ शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बनलेल्या आणि २६ जानेवारी १९५० या दिवशी भारतात लागू केलेल्या मूळ संविधानात होता का?’, तर त्या वेळी हा शब्द संविधानात नव्हता. भारताच्या ‘संविधान निर्मिती सभे’ने संविधानाच्या प्रस्ताविकेत ‘सेक्युलर’ शब्द घेण्याच्या संदर्भात खूप विस्तृत चर्चा केली होती. आश्चर्य म्हणजे स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांनी संविधानात ‘सेक्युलर’ शब्द घेण्यास विरोध केला. दुर्दैवाने त्याच काँग्रेस पक्षाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वर्ष १९७६ मध्ये राज्यघटनेची ४२वी सुधारणा म्हणून ‘सेक्युलर’ शब्द संविधानाच्या प्रस्तावनेत घुसडला; मात्र ही प्रक्रियाच असंवैधानिक असून त्या संदर्भात मात्र देशातील एकही ‘सेक्युलर’ बोलत नाही. इंदिरा गांधी यांनी वर्ष १९७५ ते १९७७ या काळात तब्बल २१ महिने देशात आणीबाणी (आपत्काळ) घोषित करून देशातील विरोधी पक्षियांना कारागृहात डांबले. सर्वोच्च न्यायालयात ‘केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य’ या गाजलेल्या खटल्यात वर्ष १९७३ मध्ये सर्वाेच्च न्यायालयाच्या १३ न्यायाधिशांच्या खंडपिठाने ‘कोणत्याही शासनाला संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार असला, तरी ते शासन संविधानाच्या मूलभूत आराखड्याला किंवा चौकटीला धक्का पोहोचेल, असे बदल करू शकत नाही’, असा आदेश दिला होता. हा आदेश दिल्यानंतर ३ वर्षांतच, म्हणजे वर्ष १९७६ मध्ये तत्कालीन काँग्रेस शासनाने संविधानाच्या प्रस्तावनेत बदल करून त्यात ‘सेक्युलर’ आणि ‘सोशलिस्ट’ हे शब्द घातले. यामुळे हे बदल म्हणजे सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधातील कृत्य आहे. त्यामुळे ‘हिंदु राष्ट्र’ असंवैधानिक कसे नाही’, याचा खुलासा करण्यापेक्षा ‘संविधानातील ‘सेक्युलर’ शब्दच असंवैधानिक कसा घातला गेला याचा खुलासा करण्याची गरज आहे. आणि असंवैधानिक शब्द संविधानातून हटवला गेला पाहिजे. ज्या प्रमाणे ४२ वी घटनादुरुस्ती करून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द राज्यघटनेत घुसडले, तर ते शब्द हटवून त्या जागी ‘हिंदु राष्ट्र’ आणि ‘आध्यात्मिक’ हे शब्द राज्यघटनेत घातले जाऊ शकतात. संविधानाच्या चौकटीत राहून समाज आणि राष्ट्र यांच्या हिताची संकल्पना मांडणे, हे पूर्णतः संवैधानिक आहे!

(हेही वाचा – Hindu Rashtra : हिंदूंनो, ‘हलाल’सारख्या इस्लामी आर्थिक आक्रमणाला बहिष्काराने प्रत्युत्तर द्यावे;  रणजित सावरकरांचे आवाहन )

प्रश्न : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेद्वारे नेमके काय साध्य होईल?

रमेश शिंदे : मुळात येथे धर्माची चुकीची व्याख्या केली जात आहे. धर्म म्हणजे काय हे पहिले समजून घेतले पाहिजे. आद्य शंकराचार्यांनी सांगितले आहे की, ‘व्यक्तीची ऐहिक (व्यावहारीक) आणि पारलौकिक (आध्यात्मिक) उन्नती जेथे साध्य होते आणि समाजव्यवस्था उत्तम रहाते, त्याला ‘धर्म’ म्हटले आहे.’ हा धर्म एकच असतो. हिंदु संस्कृती ही ‘वसुधैव कुटंबकम’ अर्थात ‘संपूर्ण पृथ्वी एक कुटुंब’ मानणारी असल्यामुळे हिंदु धर्म सर्वांना सामावून घेतो. त्यामुळेच प्रभु श्रीरामचंद्र, चंद्रगुप्त मोर्य, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले राज्य हे धर्मराज्य अर्थात आदर्श राष्ट्र असल्यामुळेच तेथील जनता सुखी आणि समाधानी होती. असे आदर्श असे हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यागी आणि राष्ट्रहिताचा विचार करणारा धर्माचरणी समाज, कर्तव्यनिष्ठ सुरक्षायंत्रणा, सत्यान्वेषी न्यायप्रणाली आणि कार्यक्षम प्रशासन, ही या ‘हिंदू राष्ट्रा’ची वैशिष्ट्ये असतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रप्रेम आणि धर्मनिष्ठा बाळगणारे, तसेच समाजहितासाठी निःस्पृहपणे अहोरात्र झटणारे राज्यकर्ते, हे या ‘हिंदू राष्ट्रा’चे आधारस्तंभ असतील. असे ‘हिंदू राष्ट्र’ जगातील एक ‘आदर्श राज्य’ असेल!

प्रश्न : हिंदु राष्ट्रात अन्य धर्मीयांचे अर्थात मुसलमान आणि ख्रिस्ती यांचे काय होणार?

रमेश शिंदे : ‘हिंदु राष्ट्रा’चा विषय निघाला की, एक प्रश्न तथाकथित निधर्मीवाद्यांकडून विचारला जातो, तो म्हणजे ‘हिंदू राष्ट्रा’त मुसलमान आणि ख्रिस्ती यांचे काय करणार? खरे म्हणजे हा प्रश्न मुसलमान आणि ख्रिस्ती यांना पडायला हवा. त्यांना तो पडत नाही. असो, जगाच्या पाठीवर १५२ ख्रिस्ती राष्ट्रे आहेत, त्यांमध्ये मुसलमान पण रहातात, हिंदु पण रहातात, अन्यही धर्मीय रहातात. ५२ इस्लामी राष्ट्रे आहेत, त्यांमध्ये ख्रिस्तीही रहातात, हिंदूही रहातात आणि अन्य धर्मीयही रहातात. मग हिंदूंचे एक राष्ट्र झाले, तर अन्य धर्मियांना रहायला काय अडचण आहे ? प्रश्न इतकाच आहे, कोणी अल्पसंख्य आहे म्हणून कोणाचे लांगुलचालन होणार नाही. सर्वांना कायदे समान असतील. जगभरात बहुसंख्यांकांच्या हिताला प्राधान्य दिले जाते; केवळ भारतच एकमेव देश आहे, जेथे बहुसंख्यांकांवर अत्याचार होतात आणि अल्पसंख्यांकांना सर्व सुविधा मिळतात. हा भेदभाव हिंदु राष्ट्रात नसेल. हिंदूहिताला प्रथम प्राधान्य असेल.

प्रश्न : ‘द कश्मीर फाइल्स’, ‘द केरला स्टोरी’ हे दोन्ही चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहेत, तरी देशभरात यांबद्दल का वादविवाद होत आहेत?

रमेश शिंदे : ज्या वेळी या देशात ‘पीके’, ‘ओ माय गॉड’ यांसारख्या असंख्य चित्रपटांतून गेली काही दशके हिंदू देवीदेवता आणि हिंदू धर्म यांवर कशा प्रकारेही टीका-टिप्पणी केली जात होती. त्या वेळी हेच सर्व ‘सेक्युलर’ नेते, पक्ष, काही प्रसिद्धीमाध्यमे त्याला ‘व्यक्तीस्वातंत्र्या’चा मुलामा देऊन चित्रपटांचे समर्थन करत होती. विरोध करणाऱ्या हिंदूंना मूलतत्त्ववादी म्हणवून हिणवत होते. आता नाण्याची दुसरी बाजू ती सत्यघटेनवर आधारीत असलेले ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरला स्टोरी’सारखे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर गजब माजवण्याचे कारण काय ? हे कोणा एका धर्माच्या विरोधात नसून एका अपप्रवृत्तीच्या अर्थात आतंकवादाच्या विरोधात आहे. जे वास्तव माध्यमांनी आणि त्या-त्या वेळच्या सरकारांनी दाखवायला हवे होते ते दाखवले गेले नाही. त्यावर आज कोणी चित्रपट काढून लोकांमध्ये जागृती करत असेल, तर त्याचे स्वागत करायला हवे. आज या चित्रपटांमुळे समाजात अशा प्रकारे घडलेली; पण उघडकीस न आलेली प्रकरणे मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे. अन्यायाला वाचा फोडली जात आहे. खरे तर अशा वेळी काही तथाकथित राजकीय स्वार्थ साधणाऱ्या लोकांचा विचार करण्यापेक्षा सत्याच्या बाजूने उभे रहायला हवे. लोकांमध्ये अधिकाधिक जागृती होण्यासाठी अशा चित्रपटांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे, असे वाटते.

प्रश्न : या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे स्वरूप कसे असेल, कोणत्या विषयावर चर्चा होईल?

रमेश शिंदे : यंदाच्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त लव्ह जिहाद, लँड जिहाद, हलाल सर्टीफिकेशन, काशी-मथुरा मुक्ती, धर्मांतर, गोहत्या, मंदिर संस्कृतीचे रक्षण, काश्मिरी हिंदूंचे मायभूमीत पुनर्वसन, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचार यांसारख्या विविध विषयांवर मंथन होईल, यासोबतच हिंदु राष्ट्राची वैचारिक दिशा स्पष्ट करणारी ‘हिंदु राष्ट्र संसद’ होईल. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी कृती आराखडाही तयार केला जाईल. प्रतिवर्षीप्रमाणे देश-विदेशांतील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, नेते, विचारवंत, लेखक, अधिवक्ते, संत, धर्माचार्य या अधिवेशनाला उपस्थित रहाणार आहेत. या अधिवेशनाचे हिंदु जनजागृती समितीच्या यु-ट्यूब, फेसबुक आणि ट्वीटर अकाऊंटवरून, तसेच www.hindujagruti.org या संकेतस्थळावरून थेट (लाईव्ह) प्रक्षेपण करण्यात येत आहे. आजवर केलेल्या आंदोलांनामध्ये समस्त हिंदूंना मिळत असलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन समस्त हिंदूंसाठी अत्यंत उत्साहाचे ठरेल, यात शंका नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.