शिंदे गटात प्रवेश करताच मनिषा कायंदे यांना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी

ठाकरेंची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना नव्हे, खरी शिवसेना इथे आहे असं कायंदे म्हणाल्या.

269
शिंदे गटात प्रवेश करताच मनिषा कायंदे यांना मिळाली 'ही' मोठी जबाबदारी

ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या अशी ओळख असलेल्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. रविवार १८ जून रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा संपन्न झाला. मनिषा कायंदे या मागच्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यापासून मनीषा कायंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत मनातील खदखद व्यक्त केली.

रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर मनिषा कायंदे यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार संजय शिरसाट उपस्थित होते. दरम्यान, रविवारी मनिषा कायंदे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.

मनिषा कायंदे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करताच त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. कायंदे यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

(हेही वाचा – हिंदूंचा आवाज बुलंद करणारे हिंदु राष्ट्र अधिवेशन!)

यावेळी बोलतांना मनीषा कायंदे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना अधिकृत आणि ओरिजनल शिवसेना आहे. इमाने-इतबारे मी मागच्या शिवसेनेत काम केलं. पक्षाची भूमिका मी भक्कमपणे मांडली. परंतु मागच्या वर्षभरात माझं काहीही ऐकूण घेतलं जात नव्हतं. एकनाथ शिंदे यांनी मला नेहमीच साथ दिली होती. शिंदे-फडणवीसांचं सरकार एक वर्ष पूर्ण करत आहे. हे सरकार गतिमान सरकार आहे. कामाचा झपाटा खूप आहे. तीन-तीन वर्षे थांबलेले प्रोजेक्ट या सरकारमुळे मार्गी लागलेले आहेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

पुढे बोलतांना मनिषा कायंदे म्हणाल्या की, एक वर्षात उद्धव ठाकरेंनी पक्षाची पुनर्बांधणी करायला पाहिजे होती, लोक पक्ष सोडून का चालले आहेत, यावर विचार करायला पाहिजे होता. परंतु तसं झालं नाही.

सकाळी उठून थुकरटवाडी बघायला लोक चॅनेल लावत नाहीत. देवी-देवतांचा अपमान करणाऱ्यांचं आणि देवी बसली, असं म्हणून देवीचा अवमान करणाऱ्यांचं आता टीव्हीवर ऐकावं लागत आहे. ठाकरेंची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना नव्हे, खरी शिवसेना इथे आहे असं कायंदे म्हणाल्या. त्यांच्या बोलण्याचा रोख सुषमा अंधारे यांच्याकडे असल्याचं स्पष्ट होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.