Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुण जोशी यांची बिनविरोध निवड

460
डॉ. अरुण जोशी, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष
डॉ. अरुण जोशी यांची स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्षपदी निवड झाली.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) अध्यक्ष आणि १० कार्यकारिणी सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी रणजित सावरकर यांनी शुक्रवार, १२ डिसेंबरला हा निर्णय जाहीर केला. (Veer Savarkar)

या निवडणुकीसाठी इच्छूकांकडून अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक ९ डिसेंबर २०२५ हा होता, तर अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक ११ डिसेंबर हा होता. अंतिम मुदतीनंतर प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची पडताळणी करून निवडणूक अधिकारी रणजित सावरकर यांनी १२ डिसेंबर २०२५ या दिवशी हा निर्णय जाहीर केला. अध्यक्षपदी डॉ. अरुण शामराव जोशी, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून आश्रयदाता विभागात चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक दिग्पाल लांजेकर, के. सरस्वती, विज्ञानेश शंकर मासावकर, पद्मा दिवाणे, कमलाकर गुरव यांची बिनविरोध निवड झाली.

(हेही वाचा – 8th Pay Commission : निवृत्तीवेतनधारकांनाही नवीन वेतन रचनेत महागाई भत्ता वाढ मिळणार का ?)

कार्यकारिणी सदस्य सामान्य विभागात प्रांजल अक्कलकोटकर, दीपक कानुलकर, अमित नाबर, चिरायू पंडित, प्रवीण जोशी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

डॉ. अरुण जोशी यांचा परिचय

हिंदुमहासभेचे ज्येष्ठ नेते तसेच अनेक नामांकित शैक्षणिक संकुलांच्या माध्यमातून ज्ञानप्रचाराचे कार्य सर्वदूर नेणारे डॉ. अरुण शामराव जोशी हे वर्ष २०१० ते वर्ष २०२२ ही सलग १२ वर्षे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष होते. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अरुण जोशी यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) असलेल्या बातल जवळच्या हिमशिखराला शिखर सावरकर असे नाव मिळाले. अंदमानच्या पोर्ट ब्लेअर (Port Blair) येथील विमानतळाला स्वातंत्र्यवीर सावरकर असे नाव असून त्या ठिकाणी त्यांचा पुतळा नसल्याचे निदर्शनास येताच स्मारकाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धपुतळ्याची त्या विमानतळावर प्रतिष्ठापना करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित थ्री डी वॉल मॅपिंग तंत्रावरील ध्वनी-प्रकाशाचा `शो’ स्मारकात सुरु करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उर्दू गझलांचा शोध लागल्यानंतर त्यांच्यावर आधारित `हम ही हमारे वाली हैं’ ही संगीतमय ध्वनीफित निर्माण करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निवडक ग्रंथसंपदा स्मारकाच्या वतीने १२ भारतीय भाषांमध्ये अनुवादित करण्यात आली आहे. त्याचबरोबर ब्रेलमध्येदेखील रूपांतरित करण्यात आली आहे. `सावरकर श्री’ ही शरीरसौष्ठव स्पर्धा देखील नियमित आयोजित केली जाते. त्याशिवाय मुष्टियुद्ध, धनुर्विद्या, नेमबाजी आदींमध्ये स्मारकाच्या खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर अव्वल कामगिरी केली असून अनेक पदके प्राप्त केली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकाळात स्मारकाचे सभागृह ४ महिन्यांच्या विक्रमी कालावधीत पूर्ण झाले. (Veer Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.