मुंबईतील धक्कादायक घटना! कांदिवलीत ४ जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ

107

मुंबईतील कांदिवली भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कांदिवलीमध्ये चार जणांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. चार पैकी तीन जणांचे मृतदेह एकाच कुटुंबातील असून तीन जणाच्या हत्येनंतर चौथ्या व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती मिळतेय.

काय घडला प्रकार 

पश्चिम उपनगरातील कांदिवली पश्चिमेला असणाऱ्या एका खासगी रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत बुधवारी रात्री चौघांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. चौघांपैकी दोघांचे मृतदेह रक्तरंजित अवस्थेत तर दोघांचे मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळून आले आहे. मृतांमध्ये ३ महिला आणि एक पुरुष असून प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड करून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी हत्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

मृतदेहाची ओळख पटलेली असून किरण दळवी (४५) मुस्कान शाहू (२६) भूमी दळवी(१६) आणि शिवदयाल सेन (६०) असे मृतांची नावे आहेत. मुस्कान ही किरणच्या पहिल्या पतीची मुलगी असून भूमी ही दुसऱ्या पतीपासून झालेली मुलगी आहे. शिवदयाल सेन हा त्यांचा वाहन चालक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. किरण यांचा दुसरा विवाह असून तिचा पती पत्नीसोबत होणाऱ्या वादाला कंटाळून मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथे राहतात. तर किरण यांची आई डॉक्टर असून त्यांचे खाजगी रुग्णालय असून ते सध्या बंद अवस्थेत आहे, व त्या ठिकाणी किरण मुली आणि वाहन चालकासह राहण्यास होत्या.

(हेही वाचा – फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब; बैठकीनंतर होणार औपचारिक घोषणा)

बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एक इसम कोयता घेऊन फिरत आहे, व तो रेल्वे स्थानकाजवळील राधाबाई रुग्णालयात गेला असल्याची माहिती कांदिवली पोलिसांना मिळाली, पोलीस निरीक्षक दिपशिखा वारे हे गुन्हे प्रकटीकरण पथकासह सदर ठिकाणी दाखल झाले.

जवळच असणाऱ्या राधाबाई रुग्णालयात संशयित इसम गेल्याचे कळताच पोलिसांनी रुग्णालयाचे गेट तोडून आत प्रवेश केला असता आता मध्ये दोन महिला रक्तबंबाळ अवस्थेत तर संशयित इसम आणि १६ वर्षाची भूमी हे दोघे पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत मिळून आले. पोलिसांनी चौघांना घेऊन रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी चौघांना तपासून मृत घोषित केले. पोलिसांना संशयित इसमाच्या खिशात मिळून आलेल्या चिठ्ठीत मालकीण मालकांना सतत त्रास देत असल्यामुळे मालक मुंबई सोडून निघून गेले. या रागातून हत्या करून आत्महत्या करीत आहोत, असे लिहलेले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी शिवदयाल सेन यांच्याविरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याची माहिती कांदिवली पोलिसांनी दिली आहे. हे हत्याकांड प्रेम-प्रकरणातून झाल्याची चर्चा परिसरात सुरू असून आत्महत्या करणाऱ्या सेन याचे अल्पवयीन मुलीसोबत प्रेमप्रकरण होते व आई आणि सावत्र बहिणीचा विरोध असल्यामुळे त्याने हे हत्याकांड करून आत्महत्या केली असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे, मात्र पोलिसांनी नकार देत तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.