Chandrayaan – 3 : आपण खर्‍या अर्थाने मामाच्या गावाला पोहोचलो…

84

सर्व हिंदुस्थानवासीयांसाठी सर्वात मोठी, सर्वात अभिमानास्पद घटना म्हणजे Chandrayaan – 3 चं चंद्रावर यशस्वी लॅंडिंग झालेलं आहे. भारताच्या प्रत्येक नागरिकाने हा आनंदोत्सव आपापल्यापरिने साजरा केला आहे. तरी काही स्वदेशी विघ्नसंतोषी लोकांनी चंद्रयान-३ हे मिशन अपयशी व्हावं यासाठी मार्क्स, लेनिन इत्यादी दैवते पाण्यात बुडवून ठेवली होती. मात्र भारतवासीयांना आपल्या शास्त्रज्ञांवर पूर्ण विश्वास होता. भारतासोबतच इतर देशांच्या नजरा देखील या मिशनवर लागून राहिल्या होत्या. विशेष म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. भारताच्या चंद्रयान-१ ने चंद्रावर बर्फाचा शोध लावला होता. आता चंद्रयान-३ वर पाण्याचे साठे शोधण्याचे उत्तरदायित्व आहे.

ही मोहिम यशस्वी झाली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये होते. तिथूनच ऑनलाईन स्वरुपात त्यांनी भारतीय जनतेशी संवाद साधला. मोदी म्हणाले, “यह पल अविस्मरणीय है, यह क्षण अभूतपूर्व है, यह क्षण विकसित भारत के शंखनाद का है. यह क्षण नए भारत के जयघोष का है. यह क्षण मुश्किलों के महासागर को पार करने का है. यह क्षण जीत के चंद्र पथ पर चलने का है. यह क्षण १४० करोड़ धड़कनों के सामर्थ्य का है. यह क्षण भारत में नई ऊर्जा, नये विश्वास, नई चेतना का है. ये क्षण भारत के उदयमान भाग्य के आव्हान का है.’’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वेळी के सिवन सरांना मिठी मारुन धीर दिला होता. त्याची काही विघ्नसंतोषी लोकांनी थट्टा केली होती. वैज्ञानिक हा माणूस नसतो असा काही जणांचा गैरसमज झाल्यामुळे त्यांनी देवळात जाऊ नये, भावूक होऊ नये, मोदींनी माणुसकीच्या आणि कुटुंबप्रमुखाच्या नात्याने त्यांना धीर देऊ नये असा समज काहींनी करुन घेतला होता. मात्र वैज्ञानिकांनी मोदींचा शब्द पडू दिला नाही आणि Chandrayaan – 3 ही मोहीम यसस्वी करुन दाखवली.

स्वा. सावरकरांनी नेहमीच विज्ञानवादाचा पुरस्कार केला आहे. त्यांनी यंत्राचा स्वीकार केलेला आहे. त्या काळच्या अनेक नेत्यांनी यंत्राचा विरोधा केला. यंत्र हे माणसाचे शत्रू आहेत असा प्रचार केला. मात्र सावरकर म्हणाले, “यंत्राने मनुष्य दुबळा केला नाही; उलट दुबला प्राणी जो होता तो माणूस; आज पृथ्वीवरील, अंतराळातील, महासागरातील प्राण्यांत प्रबळतम जो झाला तो; हत्यार – कळ – यंत्र त्यांच्या योगे होय. मंत्रबळे नव्हे तर यंत्रबळे! शाप नव्हे! तर यंत्र हे मनुष्याला अतिमानुष करणारे विज्ञानाचे वरदान होय!” तसेच “युरोप जे आज अजिंक्य झाले, ते मुख्यतः यंत्रबळे!” किंवा “समाजकारणात विज्ञानाचे वर्चस्व स्थापिले पाहिजे, तसेच आपल्या राष्ट्राच्या अर्थकारणातही त्याच विज्ञानाची मूर्ती जे यंत्र त्या यंत्राचे वर्चस्व स्थापिले पाहिजे.” अशी सावरकरांची वक्तव्ये वाचल्यावर आपल्याला कळतं की जर सावरकरांच्या हातात भारताची सत्ता आली असती तर भारत विज्ञानाच्या क्षेत्रात किमान ३० वर्षांपूर्वीच अग्रेसर ठरला असता. ते स्वप्न आज मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्ण होत आहे.

(हेही वाचा Chandrayaan – 3 मोहिमेच्या यशाचे Googleनेही डुडल द्वारे केले अभिनंदन)

सावरकर अंदमानमध्ये असताना एकदा सावरकरांना अशा खोलीत ठेवण्यात आले होते, जिथून त्यांना चंद्राची कोर दिसली. बर्‍याच दिवसांनंतर चंद्राची कोर पाहून सावरकरांना आनंद झाला. ती चंद्राची कोर पाहत सावरकर कितीतरी वेळ पडून होते. तेव्हा सावरकरांना ’चांदोबा चांदोबा’ हे लहानपणीचे गाणे आठवले आणि बालपणीच्या आठवणी देखील ताज्या झाल्या. त्यावर सावरकरांनी एक कविता देखील रचली आहे. आज आपल्याकडे स्वातंत्र्याचं मोकळं आकाश आहे. पण त्या काळी सावरकरांसारख्या क्रांतिकारकाला चंद्राची कोर पाहण्याचं भाग्य देखील क्वचितच लाभायचं, म्हणून आज आपण Chandrayaan – 3 सारखी मोहीम यशस्वी करु शकलो आहोत हेही आपण विसरुन चालणार नाही. त्या क्रांतिकारकांच्या आणि त्यांच्या हौतात्म्याच्या बळावर आपण उभे आहोत.

भारत देश हा भावनिक आहे. आपण देशाला मायभू म्हणतो, मराठी भाषेला आई (माय-मराठी) म्हणतो. चंद्राला आपण मामा म्हणतो. हा आपला भाबडेपणा नसून आपण भावनिक आहोत हेच यातून दिसून येतं. मात्र आपण भावनिक असलो तरी मागासलेले नसून आपण आपली पाळेमूळे घट्ट पकडून भविष्याला साद घालताना विज्ञानाची कास धरली आहे. आणि म्हणूनच आपण ही मोहीम यशस्वी करुन दाखवू शकलो. लहानपणी मामाच्या गावाला जाऊया अशी गीते आपण म्हटली आहेत. आपण चंद्राला मामा म्हणतो, आज भारताचे चंद्रावर यशस्वी पाऊल पडले. एका अर्थाने आपण मामाच्या गावाला जाऊन पोहोचलो आहोत असे म्हणायला हवे.

ऐहिक जगापुरता खरा धर्म म्हणजे ऐहिक विज्ञान हेच होय – विज्ञाननिष्ट स्वा. सावरकर

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.