संरक्षण राज्यमंत्र्यांनी सीमा रस्ते संघटना कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणासाठी पुण्यात तांत्रिक संकुल आणि स्वयंचलित ड्रायव्हिंग ट्रॅकचे केले उद्घाटन

110

सीमा रस्ते संघटना (BRO)ने रविवारी, ७ मे रोजी देशभरातील सर्व केंद्रांमध्ये आपला ६४वा स्थापना दिवस साजरा केला. यानिमित्ताने मुख्य कार्यक्रमाचा भाग म्हणून पुण्यातील सीमा रस्ते संघटना शाळा आणि केंद्रात मुख्य अभियंते आणि उपकरणे व्यवस्थापन परिषद आयोजित करण्यात आली होती. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट या कार्यक्रमात उपस्थित होते. स्थापना दिवसानिमित्त, संरक्षण राज्य मंत्र्यांच्या हस्ते पुण्यातील केंद्राच्या आवारात बीआरओ तांत्रिक प्रशिक्षण संकुल आणि स्वयंचलित ड्रायव्हिंग ट्रॅकचे उद्घाटन झाले. या सुविधांमुळे सीमा रस्ते संघटना कर्मचार्‍यांचा प्रशिक्षण दर्जा सुधारेल आणि विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी ते अधिक चांगल्या प्रकारे सज्ज होण्यास मदत होईल.

‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केलेले बीआरओ-केंद्रित सॉफ्टवेअरही यावेळी लाँच करण्यात आले. बीआरओच्या कामकाजाचे विविध पैलू स्वयंचलित करण्यासाठी तसेच सुरळीत आणि जलद काम व्हावे यासाठी आणि वाढीव पारदर्शकतेसाठी रिक्रूटमेंट मॅनेजमेंट सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट बुक आणि वर्क मॅनेजमेंट सिस्टीम हे तीनही सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहेत.

याशिवाय, स्वदेशी वर्ग 70R डबल लेन मॉड्युलर पुलांच्या बांधकामासाठी बीआरओ आणि जीआरएसई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. हे पूल सशस्त्र दलांच्या कार्यान्वयन तयारीला चालना देण्यासाठी मदत करतील.

एक संस्था म्हणून उत्तरोत्तर विकास साधण्यासाठी सीमा रस्ते संघटनेने ‘बीआरओ व्हिजन@2047’ वरील मोनोग्राफसह अनेक दस्तऐवजांची संकल्पना केली आहे. यामध्ये, रस्त्यालगतच्या घोषवाक्यांचे संकलन; वैद्यकीय आस्थापनांची सुधारणा आणि मानकीकरण; बीआरओ मालमत्तेचे निरीक्षण करण्यासाठी उपग्रहांच्या वापरासह संरक्षण उत्कृष्टतेसाठीच्या (iDEX) नवकल्पनांची गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा आणि पुलांची रचना तसेच समस्या समाधान यांचा समावेश आहे. संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क संचालनालयाकडून प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘सैनिक समाचार’ या पाक्षिकाच्या विशेष बीआरओ आवृत्तीचे देखील संरक्षण राज्यमंत्र्यांनी प्रकाशन केले. या आवृत्तीमध्ये बीआरओच्या आजवरच्या कामगिरींची माहिती, निर्माणाधीन प्रकल्प आणि बीआरओ चा इतिहास प्रकाशित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांनी १० एप्रिल २०२३ रोजी सुरू झालेल्या ‘एकता अवाम श्रद्धांजली अभियान’ या मोहिमेला झेंडा दाखविला. या साहसी-जागरूकता मोहिमेत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या सर्व घटकांना एकत्र आणण्यात आले होते. मोटार-सायकल आणि चार-चाकी वाहनांचा समावेश असलेल्या या मोहिमेमध्ये विविध सीमावर्ती राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील टीमनी मातीचे नमुने, नद्या/तलाव/जलसाठे आणि स्थानिक रोपे यांचे नमुने गोळा केले. भट्ट आणि इतरांनी बीआरओ शाळा आणि केंद्रात रोपांची लागवड केली.

(हेही वाचा – पुलवामा: ‘आयईडी’सह दहशतवाद्याला अटक; पोलिसांनी उधळून लावला घातपाताचा कट)

बीआरओच्या सर्व श्रेणींतील अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची समर्पण भावना आणि त्यांच्या कठोर परिश्रमाची अजय भट्ट यांनी आपल्या भाषणात प्रशंसा केली. बीआरओच्या जवानांनी बांधलेले रस्ते, पूल आणि बोगद्यांमुळे केवळ सशस्त्र दलांची सज्जता वाढली नाही तर सीमावर्ती भागांचा सामाजिक-आर्थिक विकास व्हायलाही मदत झाली आहे, असे ते म्हणाले. सेला बोगदा आणि नेचिफू बोगदा प्रकल्पातील लक्षणीय प्रगतीबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.

सीमावर्ती क्षेत्राच्या विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवभारत अभूतपूर्व वेगाने प्रगती करत आहे, असे मत त्यांनी पुढे व्यक्त केले. “आपण पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत आणि अनेक देशांना आपण लष्करी उपकरणे निर्यात करत आहोत. हा नवभारत मजबूत आहे आणि स्वतःचे हित जपण्यासाठी सक्षम आहे. आम्ही कोणापुढे झुकत नाही आणि झुकणार नाही”, असे ते म्हणाले.

सर्व पदांवर जोमाने आणि समर्पणाने काम सुरू ठेवण्याचे आवाहन बीआरओचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांनी केले. ‘आम्ही एक तर मार्ग शोधू किंवा एक नवीन मार्ग तयार करू’ या मंत्राच्या अनुषंगाने बीआरओ उदयोन्मुख आव्हानांना सामोरे जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बीआरओ ६० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असून या संघटनेने भारताच्या सीमेवर तसेच भूतान, म्यानमार, अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानसह परदेशी मित्र देशांमध्ये ६१ हजार किलोमीटरहून अधिक रस्ते, ९००हून अधिक पूल, चार बोगदे आणि १९ हवाई क्षेत्रे बांधली आहेत.

२०२२-२३ मध्ये बीआरओने १०३ पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण केले. एका वर्षात या संस्थेने बांधलेले हे सर्वात जास्त प्रकल्प आहेत. यामध्ये पूर्व लडाखमधील श्योक ब्रिज आणि अरुणाचल प्रदेशमधील अलोंग-यिंकिओंग रोडवरील लोड क्लास ७० च्या स्टील आर्क सियोम ब्रिजच्या बांधकामाचा समावेश आहे. हे आणि यासारखे इतर धोरणात्मक महत्त्वाचे प्रकल्प संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या वर्षभरात राष्ट्राला समर्पित केले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.