BMC : जी -२० शिष्टमंडळाच्या मुख्यालयातील हेरिटेज वॉकसाठी महापालिकेलाच मोजावे लागले ७९ हजार रुपये

जी-20 परिषदेच्या आपत्ती सौम्यीकरण कार्यगटाची दुसरी बैठक मुंबईत २३ ते २५ मे २०२३ या कालावधीत संपन्न झाली.

153
BMC : जी -२० शिष्टमंडळाच्या मुख्यालयातील हेरिटेज वॉकसाठी महापालिकेलाच मोजावे लागले ७९ हजार रुपये

सचिन धानजी,मुंबई

पर्यटनाला चालना देण्यासाठी ऐतिहासिक पुरातन वास्तू असलेल्या महापालिका (BMC) मुख्यालय पुरातन वास्तू पाहणीअंतर्गत पर्यटकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. परंतु महापालिका मुख्यालयाची वास्तू पहायला आलेल्या पाहुण्यांसाठीही महापालिकेलाच (BMC) पैसे मोजण्याची वेळ आली आहे. स्वत:ची वास्तू असूनही या वास्तूची पाहणी करायला आलेल्या जी २०च्या शिष्टमंडळातील १२० जणांच्या हेरीटेज वॉक करता महापालिकेलाच तब्बल ७९ हजार रुपये मोजावे लागले असल्याची माहितीच उघड झाली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या काळात घेतलेल्या निर्णयाचा फटका खुद्द महापालिकेलाच बसल्याची बाब समोर आली आहे.

जी-20 परिषदेच्या आपत्ती सौम्यीकरण कार्यगटाची दुसरी बैठक मुंबईत २३ ते २५ मे २०२३ या कालावधीत संपन्न झाली. या कार्यगटाच्या शिष्टमंडळाने मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयाला २३ मे २०२३ रोजी भेट दिली. महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा अभ्यास दौरा करुन या शिष्टमंडळाने मुख्यालयाचे पुरातन वास्तूवारसा दर्शनही (हेरिटेज वॉक) केले. या बैठकीमध्ये जी-२० परिषदेचे सदस्य असलेल्या २० देशांतील सुमारे १२० पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. या महापालिका मुख्यालयातील जी २०च्या १२० प्रतिनिधींच्या हेरिटेज वॉक करता महापालिकेला ७८ हजार ७५० रुपये मोजावे लागले असल्याची माहितीच माहिती अधिकारातून समोर आली आहे. जी २०च्या शिखर परिषदेतील पाहुण्यांसाठी खाकी टुर्स मार्फत हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे पर्यटकांना आकारण्यात येणाऱ्या शुल्काची रक्कम म्हणून महापालिकेने ७८ हजार ७५० रुपयांची रक्कम या कंपनीला मोजली असल्याची माहितीच माहिती अधिकाराच्या अर्जाला उत्तर देताना राजशिष्टाचार व संपर्क विभागाने दिली आहे.

(हेही वाचा – ‘दहशतवाद फूट पाडतो, पर्यटन एकत्र आणते’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी)

मुंबई महानगरपालिकेचे (BMC) मुख्यालय असलेली पुरातन व ऐतिहासिक वास्तू पर्यटकांना पाहता यावी, यासाठी ‘पुरातून वास्तू पाहणी’ (हेरिटेज वॉक) बाबत मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यादरम्यान १३ ऑक्टोबर २०२० सामंजस्य करार करण्यात आला होता. तत्कालिन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पर्यटन व उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या विशेष उपस्थितीत, मुंबईच्या तक्कालिन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तक्कालिन उपमहापौर सुहास वाडकर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, राज्याच्या पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ महानगरपालिका सभागृहात पार पडला होता. त्यानंतर अडीच महिन्यांनी म्हणजे जानेवारी २०२१मध्ये पर्यटकांना महापालिकेतील पाहणीचा शुभारंभ राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व तक्कालिन उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते झाला होता. परंतु महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी)माध्यमातून सुरु झालेल्या या हेरिटेज वॉकसाठी महापालिका प्रशासनाला आपल्याच वास्तू येणाऱ्या पाहुण्यांसाठीचे पैसे मोजावे लागले आहे. एका बाजुला माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे महापालिकेची तिजोरी लुटली जात असल्याचा आरोप करत असताना त्यांच्या काळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे महापालिकेला आपल्या तिजोरीत हात घालून सुमारे ७९ हजार रुपये मोजण्याची वेळ आली. त्यामुळे महापालिकेच्या या वास्तूचे जगाला दर्शन घडवण्यासाठी हा प्रयत्न आहे की एका संस्थेचे भले करण्यासाठी हे हेरिटेज वॉक तयार करण्यात आले असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.