आसाममध्ये पुराचा कहर सुरूच! 20 जिल्हे पाण्याखाली; जाणून घ्या, किती मरण पावले

104

गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. 16 मे रोजी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आसाममधील 20 जिल्ह्यांतील 46 महसूल मंडळे पुरामुळे प्रभावित झाली आहेत. बजाली, बाक्सा, बिस्वनाथ, कछार, चराईदेव, दरंग, धेमाजी, डिब्रुगड, डिमा-हसौ, होजाई, कामरूप, कार्बी आंगलोंग वेस्ट, कोकराझार, लखीमपूर, माजुली, नागांव, नलबारी, सोनितपूर, तामुलपूर, उदलगुरी हे प्रभावित जिल्हे आहेत. पुरात आणखी पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

(हेही वाचा – मुंबईतील ‘या’ भागातून प्रवास करणार असाल, तर ही बातमी महत्त्वाची…)

केंद्रीय जल आयोगाने (CWC) जाहीर केलेल्या माहितीनुसार, ब्रह्मपुत्रा नदी निमतीघाट येथे धोक्याच्या चिन्हाभोवती वाहत आहे. कांपूर येथील कपिली नदीची पाणी पातळी खूप उंचावरून वाहत आहे. सोमवारी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दिमा हासाओ जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात भूस्खलनामुळे रेल्वे आणि रस्ते संपर्क तुटल्यानं त्याचा उर्वरित राज्याशी संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.

20 जिल्ह्यांत लाखो लोक बाधित

20 जिल्ह्यांतील 652 गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून, 197248 नागरिक बाधित झाले आहेत. एकूण 16645.61 हेक्टरवरील उभी पिके पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. पूरग्रस्त भागात एकूण 55 मदत शिबिरे उघडण्यात आली आहेत. याशिवाय 12 मदत वितरण शिबिरे उभारण्यात आली असून, तेथून बाधित लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. एकूण 32959 लोक मदत शिबिरात राहत आहेत. ज्यामध्ये 3189 मुले आणि 19 गर्भवती महिलांचाही समावेश आहे. पुरात कचर जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी पुरात तीन जण बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे.

मदत आणि बचाव कार्य सुरूच 

एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल, स्थानिक पोलीस कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. पूरग्रस्त भागात एकूण 31 बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. 16 मे रोजी पूरग्रस्त भागातून एकूण 857 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. बोटीच्या माध्यमातून 23 प्राण्यांची सुटकाही करण्यात आली आहे. पूरग्रस्त भागात आठ आरोग्य पथकेही आपली सेवा देत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.