१५ ऑनलाइन लोन अ‍ॅप्लिकेशनवर येणार बंदी

120

कर्जदारांना त्रासदायक ठरणाऱ्या ऑनलाइन लोन अ‍ॅप्लिकेशनवर बंदी घालण्यात येणार आहे. महाराष्ट्र सायबर सेलने नुकतेच अँड्रॉइड मोबाईलमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘प्ले स्टोर’ला पत्र लिहून १५ लोन अ‍ॅप्लिकेशनची यादी पाठवली असून हे अ‍ॅप्स प्ले स्टोरमधून काढून टाकण्याची विनंती केली आहे.

ऑनलाइन लोन अ‍ॅप्लिकेशनवर बंदी 

ऑनलाइन कर्ज देण्याच्या नावाखाली कर्जदारांची आर्थिक पिळवणूक करून त्यांची बदनामी करणाऱ्या विविध ऑनलाइन लोन अ‍ॅप्लिकेशनमध्ये वाढ झाली होती. छुप्या अटीच्या माध्यमातून २ हजारापासून लाखो रुपयांचे कर्ज देऊन कर्जदारांकडून पठाणी वसुली करण्याचे काम विविध लोन अ‍ॅप्लिकेशन कंपन्या करीत आहेत. या कंपन्यांकडून कर्जदारांना बदनामीकारक मेसेज, फोटो पाठवून ते समाज माध्यमावर, नातेवाईक आणि मित्रमंडळींकडे व्हायरल करण्याची धमकी देऊन वसुली केली जात आहे. हा सर्व प्रकार ऑनलाइनच्या माध्यमातून केला जात असल्यामुळे या कंपन्यांचा प्रत्यक्षात ठावठिकाणा नाही.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी; कंत्राटदारावर आर्थिक दंडाव्यतिरिक्त कारवाई व्हावी)

या लोन अ‍ॅप्लिकेशनला मुंबईसह इतर शहरांमधील अनेक जण बळी पडले आहेत. काही आठवड्यांपूर्वी मालाडमध्ये बदनामी आणि छळाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तसेच महाराष्ट्र सायबर विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने या लोन कंपन्यांची माहिती काढून १५ लोन अ‍ॅप्लिकेशनची यादी तयार करून त्यांच्यावर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

राज्यातील ४८ सायबर पोलीस ठाणी आणि सायबर गुन्हे शाखेसह प्रयोगशाळेद्वारे करण्यात आलेल्या विश्लेषणानंतर १५ लोन अ‍ॅपची यादी करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय सिंत्रे यांनी दिली ‘आम्ही गुगल प्ले स्टोर तसेच अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर अधिकृत अ‍ॅप स्टोअरला पत्र लिहून १५ लोन अ‍ॅपची यादी पाठवली आहे. या यादीत मुंबई, पुणे, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, झारखंड, हरियाणा येथून संचालित करण्यात येणाऱ्या लोन अ‍ॅप्लिकेशनची नावे आहेत असे सिंत्रे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.