JNU मध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारण्याकरता १० कोटी रूपये मंजूर

168

नवी दिल्ली येथील प्रख्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) “छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन” केंद्र उभारण्याकरता महाराष्ट्र शासनाने १० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार याकरता आग्रही होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली आझादी का अमृतमहोत्सव समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निधी मंजूर करण्यात आला. महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्य विभाग राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून हा निधी लवकरच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला वितरित करणार आहे.

हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० व्या महोत्सवाचे वर्ष असून ते राज्य शासनातर्फे राज्यभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्यात येत आहे. याच निमित्ताने दिल्लीतील JNUमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, धोरण व राज्यकारभार पद्धती आणि तत्वज्ञान यांचा अभ्यास करणारे अध्यासन उभारावे अशी कल्पना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली. नवी दिल्ली येथे जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतीश्री पंडित यांच्यासोबत सुधीर मुनगंटीवार यांच्या झालेल्या बैठकीत या संकल्पनेला आकार देण्यात आला. त्यानुसार JNU ने छत्रपती शिवाजी महाराजांवर अध्यासन उभारण्याची पूर्वतयारी सुरू केली.

जेएनयूने पूर्वतयारी सुरू केली

श्रीशिवराज्याभिषेकाच्या या ३५० व्या वर्षातच हे अध्यासन उभे राहावे असा आग्रह मंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी जेएनयूकडे मांडला. त्यानुसार जेएनयूने पूर्वतयारी सुरू केली असून लवकरच हे अध्यासन सुरू होईल. या अध्यासनासाठी अभ्यासक्रम आखण्यासाठी, विषय मांडणीसाठी, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात विविध बाबीतील संशोधनासाठी महाराष्ट्र शासन JNU सोबत सहकार्य करणार आहे. स्वत: सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार या सर्व आखणीवर लक्ष ठेवून आहेत.

या अध्यासनात (१) अंतर्गत सुरक्षा, (२) पश्चिम हिंदी महासागरातील मराठा नौदल रणनीती, (३) गनिमी कावा (४) किल्ल्यांच्या तटबंदी संदर्भातील रणनीती, (५) मराठा इतिहास या विषयावर संशोधनात्मक कार्य होणार आहे. तसेच मराठी भाषेतूनही पदविका, पदवी आणि विद्यावाचस्पती पदवी (पीएचडी) ची सुविधा तसेच मराठा साम्राजाची सैन्य व्यूहरचना, किल्ले व तटबंदी रचना यावरील अभ्यासक्रम उपलब्ध असणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार हे अध्यासन कार्य करणार आहे.

छत्रपतींचा फक्त रणसंग्रामातील पराक्रमच नव्हे तर त्यांचा राज्यकारभार, त्यांचे राज्यकारभारातील तत्वज्ञान, राज्य कारभाराकरता उभारलेली सुसंघटित प्रशासकीय यंत्रणा, त्यांनी स्वभाषेला राज्यकारभारात दिलेले महत्व, त्यांचे परराष्ट्र धोरण, देशातील विविध भागातील राज्यकर्त्यांना परकीय आक्रमण मोडून काढत स्वकीय राज्य उभारण्यास त्यांनी केलेली मदत, त्यांच्या राजकीय तत्वज्ञानाचा आणि राज्यकारभाराचा भारताच्या राजकारणावर आणि समाजमनावर झालेला दीर्घकालीन सकारात्मक परिणाम, थोरल्या महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य, त्यांनी अंगिकारलेली व्यवस्थापनाची तत्वे, त्यांचे शिक्षण, संस्कृती, मंदिरे, व्यापार, शेती, जलसंधारण आणि सिंचन, गाव वस्त्या व शहरांचे व्यवस्थापन आणि नियोजन, संरक्षण यंत्रणा या सर्व बाबतीतले धोरणे व व्यवस्थापन, परकी आक्रमकांबाबतचे धोरण, संत महात्म्यांबाबतचे धोरण अशा विविध अंगाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा आणि राज्यकारभाराचा अभ्यास होणे आवश्यक आहे असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार आणि धोरणे आजही आपल्याला मार्गदर्शक आहेत असे आपण म्हणतो, मात्र या सर्व बाबींची आधुनिक शैक्षणिक परिप्रेक्षात मांडणी होणे गरजेचे आहे, ते कार्य या अध्यासनाने साध्य होईल असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि प्रेरणा इतकी ताकदवान होती की छत्रपती संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्येनंतरही महाराष्ट्र औरंगजेबासमोर झुकला नाहीच, उलट महाराष्ट्राचे पारिपत्य करण्यास २७ वर्षे महाराष्ट्रात मुक्काम ठोकून राहिलेला औरंगजेब इथेच गाडला गेला. इतकेच नव्हे तर त्यानंतर लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याने दिल्लीच्या तख्तावरही आपले नियंत्रण प्रस्थापित केले. भारतावर चालून आलेल्या अब्दालीला महाराष्ट्रातून इतक्या दूरवर पानीपतावर गाठून मराठा सैन्याने इतका जबर मार दिला की त्या बाजूने भारतावर पुन्हा कधीही आक्रमण झाले नाही. इंग्रजांविरूद्धच्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणाही छत्रपती शिवाजी महाराजांचे तत्वज्ञानच होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वज्ञानाची ही शक्ती आहे. त्यामुळेच शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या महोत्सवाच्या अनुषंगाने नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करणारे अध्यासन सुरू होणे ही आनंदाची बाब आहे. नवी दिल्लीतील जेएनयूमध्ये अशा प्रकारचे अध्यासन सुरू होण्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे व चरित्राचे हे सर्व विविध पैलू जागतिक पातळीवर मांडले जातील असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून जवाहरलाल नेहरू विद्यापीठात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाचे विद्वत जगतातून जोरदार स्वागत होत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.