Water Crisis : लोकसभा निवडणुकीपूर्वीच मुंबईत पाणीबाणी ओढवणार

जल अभियंता (Hydraulic engineer) विभागातील मुख्य कार्यालयांसह २५ विभाग कार्यालयांमधील तसेच गळती दुरुस्ती विभागातील कर्मचाऱ्यांच्या ऑर्डर निवडणूक कामांसाठी काढल्या गेल्या आहेत.

871
  • सचिन धानजी, मुंबई

लोकसभेची निवडणूक होऊ घातली आहे पण या निवडणुकीपूर्वीच मुंबईत पाण्याची तीव्र समस्या (Water Crisis) आणि पाणी प्रश्नावरून भांडण करून येण्याची दाट शक्यता आहे. मुंबईत तळागाळातील जनतेपर्यंत होणाऱ्या पाणीपुरवठा हा सुरळीत राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या जल अभियंता विभागातील कर्मचारी वर्गच आत निवडणूक कामासाठी निघून गेल्याने भविष्यात पाण्याची समस्या (Water Crisis ) मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता आहे.  जल अभियंता विभागातील कर्मचाऱ्यांअभावी पाणी समस्या चे निवारण वेळेत होऊ न शकल्याने प्रत्येक वाडी वस्ती आणि चाळींमध्ये पाण्याची तीव्र समस्या निर्माण होऊन जनतेमध्ये लोकप्रतिनिधी आणि महापालिका यांच्या प्रति रोष निर्माण होण्याची भिती वर्तवली जात आहे. (Water Crisis)

सर्वच कर्मचाऱ्यांच्या सरसकट ऑर्डर काढल्या

मुंबई महापालिकेचे जलअभियंता विभाग हे आपत्कालिन विभागांमध्ये मोडत असून मुंबईकरांना दैनंदिन पाण्याचे वितरण करताना येणाऱ्या तक्रारी आणि त्यांच्या समस्यांचे (Water Crisis) निवारण करत योग्य दाबाने लोकांच्या घरापर्यंत पाणी सुरळीत पोहोचले जावे यासाठी जलअभियंता विभागातील कर्मचारी वर्ग कार्यशील असतो. त्यामुळे आजवर अनेक निवडणूक कामांसाठी जल अभियंता विभागातील कर्मचाऱ्यांच्या ऑर्डर आल्यास तत्कालिन अतिरिक्त आयुक्त प्रकल्प तथा आयुक्तांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला कळवून संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना या निवडणूक कामांसाठी पाठवता येणे शक्य नसल्याचे कळवले जात होते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीच्या पूर्वी जलअभियंता विभागाच्या कार्यरत कर्मचाऱ्यांची जरी निवडणूक कामांसाठी ऑर्डर काढली गेलेली असली तरी रद्द करायला भाग पाडले गेले.  परंतु यावेळी लोकसभा  निवडणुकीपूर्वीच महापालिकेच्या (BMC) सर्वच कर्मचाऱ्यांच्या सरसकट ऑर्डर काढल्या जात असून यामध्ये आपत्कालिन विभागांचाही समावेश केला आहे.

(हेही वाचा Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिवादन)

एकूण ३१८ अभियंते व कर्मचारी निवडणूक कामांसाठी निघून गेले

त्यामुळे यंदा जल अभियंता (Hydraulic engineer)विभागातील मुख्य कार्यालयांसह २५ विभाग कार्यालयांमधील तसेच गळती दुरुस्ती विभागातील कर्मचाऱ्यांच्या ऑर्डर निवडणूक कामांसाठी काढल्या गेल्या आहेत. आतापर्यंत १३५ अभियंते आणि  १८३ कामगार, कर्मचारी आदी प्रकारच्या एकूण ३१८ अभियंते व कर्मचारी निवडणूक कामांसाठी निघून गेले आहे. निवडणूक कामांसाठी ऑर्डर काढताना निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट २५ विभाग कार्यालयांमध्ये जावून ऑर्डर काढले असून  वॉर्डामधून या अभियंते कर्मचारी निवडणूक कामांसाठी ऑर्डर काढल्याने विभाग स्तराव निर्माण होणाऱ्या पाणी समस्येला मोठ्याप्रमाणात महापालिकेला तोंड द्यावे लागणार आहे.

पाण्याची समस्या निर्माण झाल्यास त्याचे निवारण कोण करणार?

महापालिकेच्या निवृत्त जलअभियंता यांच्या म्हणण्यानुसार या विभागातील अभियंते आणि कर्मचाऱ्यांची कधीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी मदत घेतली गेली नाही, जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा आयुक्तांच्या स्तरावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना कळवून या आपत्कालिन विभागातील कर्मचाऱ्यांना या कामांमधून वगळण्याची सुचना केली जायची. केवळ महापालिका निवडणुकीच्या वेळी या विभागातील कर्मचाऱ्यांचे ऑर्डर निघायचे, परंतु त्यामध्ये ज्यांच्यामुळे पाणी पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेऊन कर्मचाऱ्यांना  निवडणूक कामांसाठी पाठवले जायचे, परंतु ते प्रमाणही अत्यल्प असायचे. पाणी पुरवठा विभाग हा जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असल्याने कर्मचाऱ्यांअभावी काही समस्या निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम जनतेवर होत असतो. त्यामुळे याला विभागाचा आपत्कालिन विभागांमध्ये समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जलअभियंता विभागांमध्ये सध्या ५० टक्क्यांहून अधिक पदे ही रिक्त आहेत. त्यातच जर सुमारे सव्वा तिनशे अभियंते व कर्मचाऱ्यांना निवडणूक कामांसाठी जुंपल्यास विभागांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाल्यास त्याचे निवारण कोण करणार असाही सवाल निवृत्त जल अभियंत्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक आणि अतिरिक्त आयुक्त प्रकल्प यांनी तात्काळ ही बाब निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून जलअभियंता विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे कार्यालयीन आदेश रद्द करायला भाग पाडले पाहिजेत असेही त्यांनी स्पष्ट केले. (Water Crisis)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.