Kalyan Dombivli Signal Yantrana : कल्याण डोंबिवलीत सिग्नल यंत्रणा शोभेचीच

15
Kalyan Dombivli Signal Yantrana : कल्याण डोंबिवलीत सिग्नल यंत्रणा शोभेचीच
Kalyan Dombivli Signal Yantrana : कल्याण डोंबिवलीत सिग्नल यंत्रणा शोभेचीच
श्रुती नानल

सध्या कल्याण डोंबिवली या दोन्ही शहरांची स्मार्ट सिटी कडे वाटचाल सुरु झाली आहे. जवळपास २० लाखांच्या घरात या दोन्ही शहरांची लोकसंख्या आहे. मात्र असे सगळे असताना विकासाच्या नावाखाली इथे सगळाच अंधार आहे. सध्या या शहारांमध्ये वाहतूक कोंडी ही खूप मोठी समस्या येथील नागरिकांना भेडसावत आहे. त्यातच या दोन्ही शहरातील एकही सिग्नल यंत्रणा ही कार्यान्वयित नाही. मात्र या ठिकाणी सिग्नल यंत्रणाच नाही असे नाही तर सिग्नल यंत्रणा या अनेक आहेत. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या यंत्रणा बंद अवस्थेत पडलेल्या आहेत. परिणामी वाहतूक पोलिसांवर याचा अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे या शहरातील यंत्रणा या शोभेच्याच ठरत आहे. (Kalyan Dombivli Signal Yantrana)

कल्याण डोंबिवली शहरांची लोकसंख्या जशी वेगाने वाढत आहे त्याप्रमाणेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्येही चांगलीच वाढत आहे. त्याचे कारणही तसेच आहे कल्याण-डोंबिवली शहरात सार्वजनिक वाहतुक तितकीशी सक्षम नसल्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.परिणामी शहरातील प्रदूषणाची पातळी वाढत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून खासगी वाहनावर अंकुश आणणे पालिका प्रशासनाला शक्य आहे. मात्र परिवहन सेवा सुधारण्यासाठी ठोस प्रयत्न होताना दिसत नसल्याचा फायदा घेत रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लुट केली जात आहे. परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक पोलिसांचीही कमतरता असल्यामुळे शहरातील १०० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि ५९ चौकांत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी करणारे पत्र तत्कालीन पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांनी तत्कालीन पालिका आयुक्तांना दिले होते. मात्र त्यानंतर मागील सात वर्षांत हा प्रस्ताव केवळ फायलीमध्ये अडकला होता.

(हेही वाचा : Andhra Pradesh Train Accident : ‘या’ कारणामुळे घडला अपघात)

पालिका प्रशासनाने शहरात किती ठिकाणी सिग्नल यंत्रणा आवश्यक आहे याच्या सूचना मागविल्या होत्या. मात्र पालिकेच्या महासभेत हा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला होता. कल्याण मधील शिवाजी चौक, सहजानंद चौक, गोविंदवाडी बायपास, तसेच डोंबिवली पूर्वेतील चार रस्ता, टिळकचौक तसेच घरडा सर्कल, डोंबिवली पश्चिमेतील सम्राट चौक ही ठिकाणे कायमच गजबजलेली असतात. विशेष म्हणजे या सर्व ठिकाणी सिग्नल यंत्रणा आहेत. मात्र या काही काळानंतर बंद पडल्या त्या पुन्हा कार्यान्वयीत करण्यासाठी त्यावर सोलर पॅनल लावण्यात आले जेणेकरून विजेची बचत करता येईल. मात्र तोही प्रयोग अपयशी ठरला. त्याला पुन्हा सुरु करण्यात यावे यासाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासन उदासीन असल्याचे पाहावयास मिळत आहे. अनेकवेळा तर स्थानिक लोकच ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांची भूमिका बजावतात. तर काही ठिकाणच्या सिग्नल यंत्रणा या राजकीय पक्षांच्या आशिर्वादामुळेच बंद आहेत. त्यातील एक महत्वाचे उदाहरण म्हणजे घरडा सर्कल येथील सिग्नल यंत्रणा नव्यानेच लावण्यात आली होती मात्र मनसेच्या काही लोकांनी हि यंत्रणा बंद पाडली. या रस्त्यावर चारही बाजूनी वाहनाची मोठयाप्रमाणात वर्दळ असते. लोकप्रतिनिधींनाच जर शहराचे हित कशात आहे हे कळत नसेल तर तर सर्वसामान्य नागरिक तरी काय करणार अनेकवेळा लोकांना १५ मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते एक तास लागत आहे. एकंदरच या सिग्नल नसलेल्या शहरात लोकांना चांगलीच कसरत प्रवास करावा लागत आहे . अजून किती काळ हे सहन करावे लागणार असाच प्रश्न कल्याण डोंबिवलीकरांच्या मनात उपस्थित होत आहे .
या संदर्भात वाहतूक पोलिसांनी सांगितले की, आम्ही महापालिकेशीही यासंदर्भात पाठपुरावा करत आहोत. लवकरच काही सकारात्मक बदल दिसतील.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.