रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटचे काम निकृष्ट करणाऱ्या कंपनीला महापालिकेने बजावली नोटीस

194
रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटचे काम निकृष्ट करणाऱ्या कंपनीला महापालिकेने बजावली नोटीस
रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटचे काम निकृष्ट करणाऱ्या कंपनीला महापालिकेने बजावली नोटीस

हिंदुस्थान पोस्ट इम्पॅक्ट

छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील समर्थ व्यायाम मंदिर मार्गापाठोपाठ आता हरिश्चंद्र माणिक पाटील मार्गांच्या सिमेंट काँक्रिट रस्त्यांचेही काम निकृष्ट बनवणाऱ्या संबंधित कंत्राटदाराला महापालिकेच्या रस्ते विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली. या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून लोकांसाठी खुले करण्यात आले होते. परंतु या रस्त्यांवरच अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या पहायला मिळत असल्याचे वृत्त ‘हिंदुस्थान पोस्ट’ने प्रकाशित केली होती. या वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या रस्ते विभागाने या संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून पुन्हा या रस्त्यांचे काम करून देणे किंवा काळ्या यादीत टाकण्यात येण्याची कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे.

दादर पश्चिम येथील रानडे मार्गाला जोडून जाणाऱ्या सेनापती बापट पुतळ्याशेजारील हरिश्चंद्र पाटील मार्गांच्या सिमेंट काँक्रिटचे काम महापालिकेने हाती घेतले. रस्त्यांच्या निम्म्या भागाचे अर्थात एमटीएनएलपर्यंतचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत काम पावसाळा सुरु झाल्याने वापरण्यास सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी ही कंत्राटदाराची असते. परंतु या कामांसाठी नेमलेल्या कंत्राटदाराने सिमेंटीकरण केलेल्या रस्त्याच्या भागांवर अनेक ठिकाणी चिरा तथा भेगा पडलेल्या पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर मॅनहोल्सच्या परिसराचे बांधकाम खचलेले पाहिल्याने स्थानिक रहिवाशांनी संबंधित कंत्राटदाराच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी हे बांधकाम तोडून नव्याने बनवूनही दिले. परंतु या व्यतिरिक्तही अनेक भागांवर या रस्त्यांच्या पृष्ठभागावर भेगा पडलेल्या पहायला मिळत असल्याने या रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे बनल्याचे वृत्त हिंदुस्थान पोस्टने ६ जुलै २०२३ रोजी प्रकाशित केले होते.

सेनापती बापट चौकाच्या विरुध्द बाजुलाच समर्थ व्यायाम मंदिर मार्ग असून हा मार्ग केळुस्कर रोड, एम.बी. राऊन मार्ग दक्षिण यांना छेदून चौकाला जोडला गेला आहे. या रस्त्याचे सिमेंटीकरण मागील वर्षी पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले. परंतु रस्त्यांचे सिमेंटीकरण पूर्ण झाल्यानंतर अवघ्या दीड महिन्यांतच या रस्त्यावर भेगा पडल्या होत्या. त्याबाबत हिंदुस्थान पोस्टने ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यावर कंत्राटदाराच्या माध्यमातून पुन्हा काम करण्यात आले होते. परंतु या वर्षी या रस्त्यावरील भेगा मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे. विशेष म्हणजे केळुस्कर मार्गाचे सिमेंटीकरण ३० वर्षांपूर्वी झाले होते. त्यावर आता काही प्रमाणात भेगा पडल्याचे पहायला मिळत आहे. परंतु याला जोडलेल्या समर्थ व्यायाम मार्गावर वर्षभरातच मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने या रस्त्यांवरच लवकरच खड्डयांचे साम्राज्य दिसून येईल.

(हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘या’ कारणासाठी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट)

याबाबतच्या वृत्तानंतर रस्ते विभागाचे प्रभारी प्रमुख अभियंता मनिषकुमार पटेल यांनी संबंधित लँडमार्क कॉर्पोरेशन या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबत उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हरिश्चंद्र पाटील मार्गाच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करणाचे काम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या कंपनीकडून पुन्हा काम करुन घेतले जावे कि त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे याबाबतचा निर्णय पुढील काही दिवसांत घेतला जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.