स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सदस्य सुनील वालावलकर यांचे निधन

100

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे सदस्य सुनील वालावलकर यांचे शनिवारी सकाळी दीर्घ आजाराने वयाच्या 68व्या वर्षी निधन झाले. या दुःखद वार्तेमुळे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सर्व पदाधिकारी, तसेच सदस्य यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलं, सूना असा परिवार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, अध्यक्ष प्रविण दीक्षित, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर यांच्याकडून वालावलकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

जूना मित्र गमावला- रणजित सावरकर

सुनील वालावलकर यांच्या रुपात एक जूना मित्र गमावला आहे. त्यामुळे व्यक्तिशः माझे अपरिमित नुकसान झाले आहे. पण त्याचबरोबर सावरकरांचा एक सच्चा अनुयायी आज हरपला, त्यामुळे त्यांच्या जाण्याने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे फार मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना लाभो., अशा शब्दांत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी वालावलकरांना श्रद्धांजली वाहिली आहे.

एक सच्चा सावरकर प्रेमी गमावला- प्रविण दीक्षित

वीर सावरकरांच्या विचारांचे खंदे समर्थक अशी सुनील वालावलकर यांची ओळख होती. समाजकार्यात देखील ते सक्रीय होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार करण्यात वालावलकर यांचा मोठा वाटा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे करण्यात येणा-या प्रत्येक उपक्रमांत वालावलकर मोठ्या उत्साहाने भाग घेत असत. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाची निर्मिती असलेल्या हे मृत्यूंजय या नाटकाच्या प्रचार आणि प्रसारासाठी वालावलकर यांनी फार मोठे कार्य केले. एक सच्चा स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी आज आपण गमावला आहे. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरुन निघणार नाही. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो, अशा शब्दांत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आणि माजी पोलिस महासंचालक प्रविण दीक्षित यांनी वालावलकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हे मृत्यूंजय नाटकाचे प्रयोग

हे नाटक महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या कानाकोप-यात पोहोचावं, असा त्यांचा मानस होता. शाळा, महाविद्यालयांतील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत सावरकरांची राष्ट्रनिष्ठा आणि विचार पोहोचावेत यासाठी त्यांनी या नाटकाचे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शाळा महाविद्यालयांत प्रयोग करण्याचा ध्यास घेतला होता. त्यांच्या या प्रयत्नाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडून देण्यात आलेल्या पाठिंब्यामुळे लाखो विद्यार्थ्यांपर्यंत हे मृत्यूंजय हे नाटक पोहोचले. वालावलकर यांच्या जाण्यामुळे सर्व सावरकर प्रेमींकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सावरकर भक्ताने घेतला निरोप- सच्चिदानंद शेवडे

शांत, संयमी व मनमिळावू स्वभावाचे आमचे स्नेही सुनिलजी वालावलकर यांना आज देवाज्ञा झाली. या सावरकर भक्ताने सावरकर जयंतीच्या तिथीला जगाचा निरोप घेतला. ईश्वर गतात्म्यास सद्गती देवो!, अशा शब्दांत इतिहासकार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर प्रचारक सच्चिदानंद शेवडे यांनी दुःख व्यक्त केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.