Mumbai Local : महिलांच्या लोकल प्रवासाच्या सुरक्षेसाठी रेल्वेचे सर्वेक्षण; विचारणार २१ प्रश्न

174

मुंबईची लोकल (Mumbai Local) जीवनवाहिनी मानली जाते. दिवसाला ७५ लाख लोक उपनगरी लोकलने प्रवास करतात. यात साधारण २५ लाखांपेक्षा जास्त महिला प्रवाशांची संख्या आहे. अशा वेळी पहाटेच्या पहिल्या लोकलपासून ते रात्रीच्या शेवटच्या लोकलपर्यंत ट्रेनच्या महिला डब्यातून महिला प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, याकरिता लोहमार्ग पोलिस सतत प्रयत्न करत आहे. यापुढे जात महिला प्रवाशांच्या दृष्टीने सुरक्षिततेमध्ये कोणत्या बाबींचा समावेश व्हावा आणि महिलांच्या शिफारशी, त्यांचा अनुभव जाणून घेण्यासाठी गुगल फॉर्मच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. ३१ मार्चपर्यंत सर्वेक्षण सुरू राहणार आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांत गुगल फॉर्म उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.

(हेही वाचा Pune : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या जड वाहनांना ‘या’ दिवसापासून प्रवेश बंदी)

दर चार महिन्यांनी आढावा घेणार 

महिला प्रवाशांसाठी २१ प्रश्नांचे हे सर्वेक्षण असणार आहे. ज्यात महिला प्रवाशांचे वयोगट, कुठून ते कुठपर्यंत प्रवास, दिवसात कितीदा लोकलचा (Mumbai Local) वापर, पासधारक- तिकीटधारक, प्रवासाची वेळ, कोणत्या वेळेत असुरक्षितता वाटते, रात्री १० नंतरचा प्रथम श्रेणीतील सुरक्षितता, फलाटांवरील सुरक्षितता, गणवेशधारी पोलिस असावेत का, असे २१ प्रश्न असणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी दर चार महिन्यांनी आढावा घेण्याचा निर्णय रेल्वे पोलिस महासंचालकांनी घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून महिला प्रवाशांसाठी २१ प्रश्नांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. रेल्वे प्रवासात महिला प्रवाशांना सुरक्षे संदर्भातील भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती घेण्यात येणार आहे. ज्यामुळे लोहमार्ग पोलिसांना महिला प्रवासी सहभागातून सुरक्षा भक्कम करता येणार आहे.  रेल्वे मार्गावर महिला प्रवाशांची संख्या ज्या पटीने वाढत आहे, तेवढाच महिलांचा लोकल (Mumbai Local) प्रवासाचा सुरक्षेचा मुद्दा समोर आलेला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.