BMC : भटक्या श्वानांच्या नसबंदीचे प्रमाण होतेय कमी; मागील वर्षांत सर्वांत कमी झाले निर्बिजीकरण

एकूण श्वानांची अपेक्षित संख्या २ लाख ९६ हजार २२१ इतकी आहे. सन २०१४ ते डिसेंबर २०२२ या कालावधीतील शस्त्रक्रिया झालेल्या श्वानांची संख्या १ लाख ३३ हजार १३१ एवढी झाली आहे.

119
  • सचिन धानजी

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण अर्थात नसबंदी करण्याची मोहिम राबवली जात असली तरी मागील वर्षी या भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणाची संख्या कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यांमध्ये १ लाख ०७ हजार ५१३ भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले असून सन २०२२ मध्ये  सर्वाधिक कमी अर्थात १० हजार ४८४ श्वानांचे  निर्बिजीकरण करण्यात आले. मागील सहा वर्षांतील भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण झालेली सर्वांत कमी संख्या असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अखत्यारित असलेल्या श्वान नियंत्रण विभागातर्फे १९९४ पासून भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्राणी जनन नियंत्रण (श्वान) कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. सन १९९८पासून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा कार्यक्रम अशासकीय संस्थांच्या सहभागाने पुढे चालू ठेवण्यात आला आहे. सन १९९४ पासून ते डिसेंबर २०२२ पर्यंत  ३ लाख ८८ हजार ४२१ भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण शस्त्रक्रीया करण्यात आलेल्या आहेत. परंतु भारत सरकारच्या भारतीय जीवजंतू कल्याण मंडळाने एप्रिल २०२२ यांनी पत्राद्वारे भटके श्वान निर्बिजीकरण कार्यक्रमासाठी शासकीय तथा अशासकीय संस्थांना प्रती श्वान १,६५० एवढे अधिदान करणे आवश्यक असल्याचे कळवले होते. या अधिदानाचे दर महापालिकेने ज्या अशासकीय संस्थांना श्वानगृह, पाणी आणि वीज मोफत पुरवले आहे, त्यांच्या करता भारतीय जीवजंतू कल्याण मंडळाने सुचवलेले आहे.

जानेवारी २०१४ मध्ये झालेल्या श्वान सर्वेक्षणनुसार त्यावेळी अस्तित्वात असलेल्या ९५,१७२ श्वानांपैकी २५,९३३ एवढ्या भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण झालेले नाही. निर्बिजीकरण न झालेल्या श्वानांची संख्या लक्षात घेता श्वान जनन दराचा विचार करून श्वान संख्येचे अनुमान लावले असता ११,२६२ मादी श्वानांना एक वर्षांत अंदाजित ०४ पिल्ले झाल्यास २०१४ ते २०१९ या सहा वर्षांत अपेक्षित संख्या २ लाख ७० हजार २८८ इतकी आली आहे. त्यामुळे एकूण श्वानांची अपेक्षित संख्या २ लाख ९६ हजार २२१ इतकी आहे. सन २०१४ ते डिसेंबर २०२२ या कालावधीतील शस्त्रक्रिया झालेल्या श्वानांची संख्या १ लाख ३३ हजार १३१ एवढी झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या श्वान निर्बिजीकरण व लसीकरण कार्यक्रमात कार्यरत असणाऱ्या शासकीय तसेच अशासकीय संस्थांची वार्षिक निर्बिजीकरण क्षमता  २९,६६८ आहे. तरी उपलब्ध क्षमतेच्या कमीत कमी ७५ टक्के म्हणजेच एकूण २२ हजार २५१ भटके श्वान दरवर्षी निर्बिजीकरण व लसीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

(हेही वाचा PFI चेच काम वेगळ्या नावाने सुरू! हिंदुत्वनिष्ठ नेते, पत्रकार दहशतवाद्यांच्या रडारवर)

या अंतर्गत द वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्ज-महालक्ष्मी, द बॉम्बे सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू ऍनिमल्स परळ, इन डिफेन्स ऑफ एनिमल्स देवनार,  अहिंसा मालाड, उत्कर्ष ग्लोबल फाऊंडेशन मुलुंड,  जीव रक्षा एनिमल्स वेल्फेअर ट्रस्ट मालाड व  बॉम्बे व्हेटनरी कॉलेज या संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. यासर्वांकडून २३ हजार श्वानांचे निर्बिजीकरण करण्यासाठी वार्षिक सुमारे ४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. त्यानुसार तीन वर्षांसाठी सुमारे १२ कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे

भटक्या श्वानांची आलेले वर्षनिहाय निर्बिजीकरणाची संख्या

  • सन २०१७ :  २४,२९०
  • सन २०१८ : २१,८८६
  • सन २०१९ : १८,९१२
  • सन २०२० : १४,४०७
  • सन  २०२१ : १७,५३४
  •  सन २०२२ : १०,४८४
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.