सलग दुस-या दिवशीही मुंबईची दिल्लीला टक्कर, वायू प्रदूषणात दिल्लीपेक्षा मुंबईतील ‘या’ ठिकाणी हवेचा दर्जा ढासळला

96

भाऊबीजेच्या दिवशीही संपूर्ण दिल्ली शहरातील वायू प्रदूषणाच्या तुलनेत मुंबईतील काही निवडक ठिकाणांमध्ये हवेचा दर्जा ढासळलेला आढळून आला. केंद्रीय पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाच्या ‘सफर’ या स्वतंत्र प्रणालीत दिल्ली शहरातील वायू प्रदूषण २६६ वर नोंदवले गेले. तर मुंबईतील दक्षिणेकडील टोकावरच्या माझगाव आणि कुलाब्यात ३०६ आणि ३२१ वर वायू प्रदूषण आढळून आले.

सलग तीन दिवस मुंबईतील हवेचा दर्जा खराब दिसून येत असल्याने आता श्वसनाच्या रुग्णांना तसेच सामान्य माणसांनाही फटाक्यांच्या सततच्या संपर्काने घसा खराब होणे, खोकल्याच्या समस्या जाणवू शकतात, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

(हेही वाचाः आरेत हल्लेखोर बिबट्याला पकडले तरीही धोका टळलेला नाही)

मालाड आणि अंधेरीत धूरच धूर

सायंकाळी आठनंतर मुंबईतील वायू प्रदूषण दिल्लीच्या खालोखाल प्रदूषित होत असल्याचे सफरच्या प्रणालीत दिसून आले. मंगळवार नंतर बुधवारीही मुंबईतील दोन स्थानकांमध्ये अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वेगाने वाढलेले दिसून आले. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मंगळवारी उपनगरांतील मालाड आणि अंधेरीतील प्रवास लोकांना अतिधोकादायक बनला होता.

वरळी,भांडूपमध्ये प्रमाण कमी

बुधवारी कुलाबा आणि माझगाव या समुद्राला लागून असलेल्या ठिकाणी अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण रोजच्या पेक्षाही जास्त वाढलेले दिसले. सर्वात कमी प्रदूषण वरळी भागात आढळून आले. वरळीत अतिसूक्ष्म धूलिकणांची मात्रा ५० वर होती. वरळीनंतर भांडूपवासियांनी फटाके कमी फोडल्याने हवेचा दर्जा फारसा ढासळलेला नव्हता. भांडूपमध्ये अतिसूक्ष्म धूलिकणांची मात्रा केवळ ८० वर नोंदवली गेली.

सफरच्या नोंदणीतील नवी मुंबई व मुंबईतील सर्व स्थानकांमधील अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण

कुलाबा- ३२१- अती खराब

माझगाव -३०६- अती खराब

मालाड- २८८-अती खराब

नवी मुंबई- २७२- अती खराब

अंधेरी – २३२- अती खराब

बोरिवली- २२१- अती खराब

चेंबूर- २११- खराब

भांडूप- ८०- समाधानकारक

वरळी- ५०- समाधानकारक

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.