Shivsanwad Parishad : हिंदवी स्वराज्याचे राष्ट्र उभारणीतील योगदान उलगडणार ‘शिवसंवाद परिषद’

83

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाद्वारे विविध महत्वपूर्ण उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याचअंतर्गत सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनातर्फे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे ‘शिवसंवाद’ (Shivsanwad Parishad) या दोन दिवसीय विद्वत परिषदेचे आयोजन शुक्रवार, १५ व शनिवार, १६ मार्च, २०२४ रोजी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमधील दीक्षांत सभागृहात करण्यात आले आहे.

या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन सत्र शुक्रवार १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होत असून यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, तंजावर संस्थानचे राजश्री बाबाजी राजे साहेब भोसले छत्रपती, महाराणी गायत्री राजे साहेब भोसले, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या परिषदेच्या दोन्ही दिवशीच्या सत्रांमध्ये अनेक ख्यातनाम इतिहास अभ्यासक, लेखक, इतिहासकार व इतिहास संशोधकांची व्याख्याने होणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे केवळ इतिहासातील एक पर्व नसून आधुनिक भारताच्या जडणघडणीच्या प्रक्रियेतील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याने पुढे साम्राज्याचे रूप धारण करत भारताच्या राजकीयच नव्हे तर आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांत मोठे योगदान दिले आहे. या साऱ्या वाटचालीमागे छत्रपती शिवरायांच्या धोरणी दृष्टीची, युद्धनीती, व्यवस्थापन, राजनीती, विदेशनीती, अर्थनीतीची प्रेरणा आहे. याच विषयांवर व्यापक स्तरावर विद्वत संवाद घडवावा व या विचारमंथनातून छत्रपती शिवरायांच्या कार्याची आधुनिक काळातील प्रासंगिकता मांडली जावी, हा ‘शिवसंवाद’ (Hindu Swarajya) परिषदेचा उद्देश आहे. १७ व्या ते २० व्या शतकापर्यंत, सुमारे तीन शतके वृद्धिंगत होत गेलेल्या, शिवाजी महाराजांच्या धोरणांवर निर्माण झालेल्या मराठा साम्राज्याचे आपल्या इतिहासातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्वातंत्र्यलढ्यात स्वराज्य, स्वातंत्र्य यांचे मूर्तिमंत प्रतिक म्हणून शिवराय अनेक स्वातंत्र्ययोद्ध्यांचे स्फूर्तीस्थान होते. या संपूर्ण इतिहासाचा ऊहापोह या परिषदेत होणार आहे.

(हेही वाचा JNU मध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारण्याकरता १० कोटी रूपये मंजूर)

इतिहासप्रेमींसाठी वैचारिक पर्वणी

सदर परिषदेच्या (Shivsanwad Parishad) पुढील सत्रांमध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचे ऐतिहासिक महत्त्व मांडणार आहेत. डॉ. उदय कुलकर्णी, १८ वे – १९ वे शतक म्हणजेच ‘मराठा शतक’ अशी मांडणी करणार आहेत. प्रसिद्ध इतिहासकार पांडुरंग बलकवडे ‘लोककल्याणकारी शिवराय आणि त्यांची राजनीति’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. ग्वाल्हेरचे इतिहास-अभ्यासक निलेश ईश्वरचंद्र करकरे ‘श्रीनाथ’ महादजी शिंदेंच्या कार्यावर आणि योगदानावर आपल्या व्याख्यानातून प्रकाश टाकणार आहेत. जेएनयुचे प्राध्यापक डॉ. उमेश कदम शिवरायांच्या प्रभावाचा भौगोलिक आणि सांस्कृतिक वारसा मांडणार आहेत. इतिहास अभ्यासक डॉ. केदार फाळके, ‘शिवराज्याभिषेक- नव्या युगाचा प्रारंभ’, या अतिशय महत्त्वाच्या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

दुसऱ्या दिवशी तंजावरचे मराठी पंडित डॉ. बी. रामचंद्रन ‘तंजावर भोसले घराण्याचे राष्ट्र-उभारणीतील योगदान’ या विषयवार बोलणार आहेत. बंगळूरच्या इतिहास अभ्यासिका मेधा भास्करन ‘छत्रपती शिवरायांची सैन्यव्यवस्था’ हा विषय मांडणार आहेत. अभ्यासक प्रसाद तारे त्यांनी संशोधन करून शोधून काढलेली शिवरायांची लघुचित्रे आणि शिल्पे सर्वांना उलगडून दाखविणार आहेत. अभ्यासक गुरुप्रसाद कानिटकर, ‘शिवपूर्व काळातील सत्ताधीश आणि त्यांची ध्येये’ या विषयातून शहाजीराजांच्या ऐतिहासिक कामगिरीचा आलेख श्रोत्यांसमोर मांडणार आहेत. सुरतचे डॉ. मकरंद जोशी ‘बडोदे संस्थानचा उज्ज्वल इतिहास’ उलगडून दाखविणार आहेत आणि अभ्यासक रविराज पराडकर हे छत्रपती शिवाजी महाराज, व्यवसाय, तंत्रशिक्षण आणि कौशल्य विकासाचे प्रेरणास्थान कसे ठरतात याविषयी व्याख्यान देणार आहेत.

या परिषदेच्या माध्यमातून देशभरातील विद्वान आणि अभ्यासक एका व्यासपीठावर येऊन जागतिक स्तरावर हिंदवी स्वराज्याच्या इतिहास आणि योगदानाविषयी एक नवा विद्वत-संवाद सुरु होईल असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. या परिषदेस इतिहासप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी अशा सर्वांनीच मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.