पर्यटन वाढीसाठी जोगेश्‍वरी गुंफेचे सौंदर्यीकरण करा, वायकरांची मागणी

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांनी पत्राद्वारे केली विनंती 

83

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील प्राचीन अशा जोगेश्‍वरी गुंफेचा वारसा जपणुक करुन शासनाच्या माध्यमातून सौंदर्यीकरण व सक्षमीकरण केल्यास येथील पर्यटन क्षेत्रालाही अधिक वाव मिळेल. त्यामुळे या गुंफेचे सौंदर्यीकरण व सक्षमीकरण करण्यात यावे, अशी विनंती पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार तसेच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

असे म्हटले पत्रात…

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रात जोगेश्‍वरी गुंफा ही प्राचीन व इतिहासकालिन पुरातन वास्तु येत असून या गुंफेचा पुरातन व ऐतिहासिक वारसा जपणार्‍या वास्तूंच्या यादीत प्रथम दर्जा श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने पुरातन वास्तुचे जतन व्हावे म्हणुन सुरुवातीस गुंफेच्या केंद्रबिंदुपासून ५०० मीटर पर्यंतचे क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले.  मात्र येथील दाट लोकवस्तीचा विचार करता या नियमात शिथिलता आणून गुंफेपासून २५ मीटरपर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले असून १०० मीटर परिघात कोणत्याही खाजगी बांधकामास बंदी आणली असल्याचे, वायकर यांनी आपल्या पत्रात नमुद केले आहे.

(हेही वाचा- सत्तेच्या लालसेपोटी शिवसेना बनली सावरकर विरोधी! चित्रा वाघ यांचे टीकास्त्र)

सौंदर्य व पुरातत्वबाबी लक्षात घेता सक्षमीकरण आवश्यक

राज्यातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी त्यांचे प्राचिनत्व जपून त्या वास्तूंचा विकास करण्याचे महाराष्ट्र शासनाचे धोरण असून शासनाच्या माध्यमातून त्याचे सौंदर्यीकरण करण्याची निश्‍चित करण्यात आले आहे. जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रात अति प्राचीन पांडवकालीन गुंफेचा विकास, त्याचे सौंदर्य व पुरातत्वबाबी याची जपणूक करुन सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. ही गुंफा पाहण्यासाठी देश विदेशातील अनेक पर्यटक याला भेट देतात. या गुंफेच्या परिसरातचे सौंदर्यीकरण व सक्षमीकरण करुन येथील पर्यटकांच्या सुविधेत सुनियोजित वाढ केल्यास येथील पर्यटन क्षेत्राला अधिक चालना मिळेल, असे मतही वायकर यांनी पत्राच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. त्यामुळे जोगेश्‍वरी गुंफेच्या सौंदर्यीकरण व सक्षमीकरणासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध झाल्यास विकास करणे शक्य होणार असल्याने निधी उपलब्ध देण्यात यावा, अशी विनंती वायकर लेखी यांनी पत्राद्वारे मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.