डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयाचा उफराटा न्याय; ओपीडी बंद असल्याचे सांगत रुग्णाला तपासण्यास नकार

103

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते. सध्या सर्वत्र सर्दी, ताप, खोकला, उलटीची साथ पसरली आहे. ही संसर्गाची साथ पसरली असतानाही, रुग्णालयात आलेल्या रुग्णाला अत्यावश्यक सेवेमध्ये मोडत नसल्याचे सांगून त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ औषधे तरी लिहून द्या, आम्ही बाहेरुन घेतो, अशी विनवणी ताप आलेला रुग्ण करत असतानाही इमर्जन्सी वाॅर्डमध्ये असलेल्या डाॅक्टरने त्यांना उपचार देण्यास नकार दिला आणि वर इमर्जन्सीचा अर्थ समजतो का? असा प्रश्न केला. हा सर्व प्रकार 12 फेब्रुवारी, रविवारी दुपारच्या सुमारास घडला.

डाॅक्टरांची अरेरावी

रुग्णासोबत आलेल्या नातेवाईकांनी रुग्णाची तपासणी न करण्याबाबत जाब विचारला असता, तुम्ही वाद घालत असल्याचा उलटा आरोप करत त्यांनी सुरक्षारक्षकांना बोलावून त्यांना बाहेर काढण्यास सांगितले. त्यावर रुग्ण व नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. डाॅक्टर असूनही त्यांनी थेट रुग्णाला उपचार देण्यास नकार दिला. शिवाय, जिथे पाहिजे तिथे आमची तक्रार करा, अशी अरेरावीची भाषाही डाॅक्टरांनी यावेळी केली.

( हेही वाचा: युती तोडण्याला उद्धव ठाकरेंचा स्वार्थ आणि पुत्र प्रेम जबाबदार; बावनकुळेंचे टीकास्त्र )

नेमकं काय घडलं?

रविवार असल्याने खासगी दवाखाने बंद होते. त्यामुळे रुग्ण शास्त्रीनगर येथील शासकीय रुग्णालयात गेला. परंतु आमच्याकडे केवळ इमर्जन्सी वाॅर्ड चालू आहे. ओपीडी आज बंद असल्याने आम्ही रुग्णाला अटेंड करु शकत नाही, असे सांगण्यात आले. त्यावर रुग्णाने केवळ प्रिस्क्रिप्शन लिहून द्या, आम्ही बाहेरुन मेडिसिन्स घेतो असे सांगितले. परंतु तरीदेखील उद्धटपणे उत्तर देत, डाॅक्टरांनी तुम्हाला इमर्जन्सीचा अर्थ समजतो का? अशी उलट विचारणा केली. त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी डाॅक्टरांची तक्रार करण्याचे म्हटले, त्यावर इमर्जन्सी वाॅर्डमध्ये असेलल्या डाॅक्टरने रुग्णाला आम्ही तपासतो आणि जर त्याला ताप नसेल तर तुमचीच तक्रार करु, अशा धमकीच्या भाषेत बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर हाॅस्पिटलचे वरिष्ठ आले आणि त्यांनी रुग्णाची तपासणी करण्यास सांगितले. त्यानंतर डाॅक्टरांनी संबंधित रुग्णाला प्रिस्क्रिप्शन्स लिहून दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.