Lok Sabha Election 2024 : राज्यातील ‘या’ पाच लढती; ज्याने मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा लागली पणाला

राज्यातील 48 जागांमध्ये 5 लोकसभा मतदार संघ असे आहेत ज्यामध्ये मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

140

राज्यात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) हवा जोरदार सुरू आहे. तिसऱ्या टप्प्याच्या जागांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. तसेच चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठीच्या जागांवर प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. राज्यातील 48 जागांमध्ये 5 लोकसभा मतदार संघ असे आहेत ज्यामध्ये मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

नारायण राणे प्रथमच लोकसभेचे खासदार होणार? 

साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election 2024) महायुतीतील गट-तट आणि मतदारांच्या भूमिकेमुळे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या कौशल्याची सत्त्वपरीक्षा होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपाचे नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे. गेली दहा वर्षे खासदार असलेले राऊत यंदा हॅटट्रिक साधण्यासाठी ताकदीने रिंगणात उतरले आहेत. या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चिपळूणचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम, रत्नागिरीचे वजनदार नेते पालकमंत्री उदय सामंत, कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे आणि सावंतवाडीचे मंत्री दीपक केसरकर या चारजणांच्या मतदारसंघांमध्ये राणे समर्थक मताधिक्याची अपेक्षा बाळगून आहेत.सिंधुदुर्गातल्या तीन विधानसभा मतदारसंघांपैकी कणकवली मतदारसंघात राणे यांना मताधिक्याची हमी असली तरी उरलेल्या दोन मतदारसंघांपैकी कुडाळमध्ये ठाकरे गटाचे वैभव नाईक त्यांना जोरदार विरोध करतील, हे उघड आहे. पण मंत्री केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघातही भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, केसरकर आणि राणे या तिघांमधील संबंध गेल्या काही वर्षांत ताणलेले राहिले आहेत. निवडणुकीच्या मतदानावर त्याचा प्रभाव पडल्याशिवाय राहणार नाही.

सुप्रिया सुळेंना यंदाची निवडणूक कठीण 

वडील शरद पवारांनंतर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी 2009, 2014 आणि 2019 अशा सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election 2024) बारामती लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. 2019 मध्ये तर सुप्रिया सुळे एक लाख 55 हजार 774 मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. त्यांनी भाजपाच्या कांचन राहुल कुल यांचा पराभव केला होता. नरेंद्र मोदींच्या वादळातही त्यांनी बारामतीची जागा कायम ठेवली होती. सध्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला या सहा विधानसभा येतात. यातील दोन विधानसभा राष्ट्रवादीकडे तर दोन काँग्रेसकडे आणि अन्य दोन विधानसभा भाजपाच्या ताब्यात आहेत. अजित पवार शरद पवारांपासून वेगळे झाले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा सांगितला. निवडणुकीपर्यंत अजित पवारांना पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आणि प्रथमच शरद पवार मनापासून हल्ल्याचे दिसून आले. आणि आता काहीही करून बारामतीच्या जागेवरून सुप्रिया सुळेंनाच विजयी करण्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला आणि पायाला भिंगरी लावून घेतली. आजवरच्या कारकिर्दीत शरद पवार कधीच बारामतीत तळ ठोकून बसले नव्हते, वा सभांचा धडाका लावला नव्हता. ही जागा निवडून येणारच अशी त्यांना पूर्ण खात्री होती, पण यंदा लढाई कठीण आहे याची त्यांना जाणीव झाली.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024: नाशिकमध्ये ठाकरेंना दणका! मध्यरात्रीच उद्धव ठाकरे गटाचा नाराज नेता शिंदेंच्या शिवसेनेत)

विरोधकांच्या गर्तेतून विजय खेचून आणणे नवनीत राणांसमोर आव्हान 

अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या उमेदवारीला स्थानिक नेत्यांकडून प्रचंड विरोध होता. पण तरीही भाजपाकडून नवनीत राणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. अमरावती लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election 2024) सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यात बडनेरा मतदारसंघातून रवी राणा आमदार आहेत. हा मतदारसंघ सोडला तर अमरावतीमध्ये काँग्रेसच्या सुलभा खोडके, तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, दर्यापूरमधून काँग्रेसचे बळवंत वानखेडे, मेळघाटमधून प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार पटेल आणि अचलपूरमधून बच्चू कडू आमदार आहेत. जे नवनीत राणा यांच्या विरोधात आहेत. आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर त्यांच्यावर काही आरोपही केले होते. विविध कामांवरून दोन नेत्यांमध्ये श्रेयवादाचा संघर्ष पहायला मिळाला होता. बच्चू कडू यांनी सध्या ‘आम्ही बुडलो तरी चालेल पण स्वाभिमान गेला नाही पाहिजे. मर जायेंगे, कट जायेंगे; लेकिन ताकद से लडेंगे’ अशी भूमिका नवनीत राणा यांच्याविरोधात घेतली आहे. बच्चू कडू यांचे दोन आमदार अमरावतीमध्ये आहेत. त्यामुळे अचलपूर आणि मेळघाटमधून नवनीत राणांना सहकार्य मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे विरोधकांच्या गर्तेतून नवनीत राणा यांना विजय खेचून आणणे तितके सोपे नाही.

श्रीकांत श्रीकांत शिंदे हॅट्रिक मारणार का? 

कल्याण लोकसभा मतदारसंघाने गेली अनेक वर्ष हिंदुत्ववादी पक्षाला निवडून दिले आहे. 1996 पासून हा मतदारसंघ शिवेसेनेचा बालेकिल्ला राहिला होता. 2014-2024 मागची दहा वर्ष मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे या मतदारसंघातील खासदार आहेत. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सहा मतदारसंघामध्ये मनसेचे राजू पाटील, भाजपचे रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे बालाजी किणीकर, भाजपचे गणपत गायकवाड आणि भाजपचे उत्तमचंद ऐलानी हे आमदार आहेत. यात भाजपाच्या आमदारांची संख्या जास्त असल्याने भाजपाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघावर (Lok Sabha Election 2024) दावा करण्यात येत असल्याची माहिती आहे. भाजपा कार्यकर्ते आणि आमदारांकडून श्रीकांत शिंदे यांच्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली. लोकसभेची जागा जरी शिवसेनेची असली तरी ती भाजपाच्या मदतीने निवडून येत असल्याचे काही नेत्यांकडून बोललं गेले. वर्षभरापूर्वी भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांकडूनही कल्याण लोकसभा मतदारसंघाची चाचपणी करण्यात आली होती. भाजपाचे नेते आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांचं एकनाथ शिंदेंशी चांगले असले तरी श्रीकांत शिंदेंशी मतभेद असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आलं होते. त्यामुळे रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमांना गैरहजर लावत नसल्याचे चित्र काही दिवसांपूर्वी दिसून आले. भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून भाजपाचा उमेदवार असेल तरच स्थानिक पातळीवर मदत केली जाईल असा ठराव करण्यात आला होता. भाजपा पदाधिकाऱ्यांवरचे गुन्हे, मतदारसंघातील कामं, श्रेयवाद यावरून भाजपाचे आमदार आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात संघर्ष निर्माण झाला. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या ठरावानंतर श्रीकांत शिंदे यांनी शुल्लक कारणावरून अशी विधानं आणि ठराव होणं योग्य नाही असं म्हटले.

(हेही वाचा Lok Sabha Election : शिवसेना असली-नकली ठरवणारी निवडणूक, मुख्यमंत्री शिंदे यांच्या अस्तित्वाची लढाई)

शाहू महाराज छत्रपती लढाई जिंकणार का?  

राज्यातील लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) कोल्हापूरचा मतदार संघ जोरदार चर्चेत आला आहे. याला कारण आहे या ठिकाणाहून मविआच्या वतीने काँग्रेसच्या तिकिटावर शाहू महाराज छत्रपती निवडणूक लढवत आहेत. महाराज प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. मात्र याठिकाणी महायुतीच्या वतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तिकिटावर संजय मंडलिक निवडणूक लढवत आहेत. कोल्हापुरात या दोघांमध्ये चुरशीची लढत होईल, असे चित्र निर्माण झाले आहे. या मतदारसंघात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंडलिक यांच्यासाठी प्रचारसभा घेतली आहे. या ठिकाणी महाराज यांच्या बाजूने केवळ आमदार सतेज पाटील वगळता कुणीही मविआमधील नेते कोल्हापुरात प्रचारासाठी फिरताना दिसत नाही. महाराजांच्या घरातील सर्व सदस्य मात्र प्रचारासाठी रस्त्यावर उतरले आहेत.  तर याउलट संजय मंडलिक यांच्या बाजूने खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, कागलच्या राजकारणात दबदबा असणारा शाहू सहकारी साखर कारखाना आहे. या कारखान्याचे अध्यक्ष घाटगे यांचे मंडलिक यांना समर्थन आहे. त्यामुळे संजय मंडलिक यांच्या बाजूने असलेल्या दिग्गजांची फळी पाहिल्यास या निवडणुकीत मंडलिक यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे.  मात्र तरीही शाहू महाराज छत्रपती ही राजघराण्यातील असल्याने त्यांचाही मतदार संघात दबदबा तितकाच दिसत आहे. परंतु त्यांच्या प्रचारासाठी मविआच्या नेत्यांकडून विशेष प्रयत्न होताना दिसत नाही, त्यामुळे प्रचारात महाराज तुलनेने मागे पडताना दिसले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.