बुलेट ट्रेनसाठी झाडांची कत्तल निश्चित, पण दुपटीने झाडे लावण्याची सूचना

102

गुजरात-मुंबई बुलेट ट्रेनच्या मार्गातील झाडांच्या कत्तलींसंदर्भात माहिती घेण्यासाठी नुकतीच केंद्रीय वने व पर्यावरण तसेच वातावरणीय बदल विभागाच्या केंद्राच्या सदस्यांनी मुंबईत भेट दिली. या भेटीत मुंबईतील स्थानकांबाबत आणि झाडांच्या कत्तलींसंदर्भात येणाऱ्या समस्यांची माहिती घेतली गेली. स्थानकांच्या उभारणीसाठी झाडांची कत्तल अनिवार्य असल्याने दुपटीने झाडे लावण्याची सूचना केंद्रीय वने व पर्यावरण तसेच वातावरणीय बदल या विभागाच्या सदस्यांनी दिल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.

गुजरातमध्ये सध्या बुलेट ट्रेनसाठी वेगाने काम सुरु आहे. पालघर ते मुंबई टप्प्यातील बुलेट ट्रेन मार्गातील खारफुटींचे जंगल तसेच तुंगारेश्वर अभयारण्यानजीक जाणा-या मार्गानंतर विरारपुढे बुलेट ट्रेनचा भूमिगत प्रवास संपत आहे. मुंबईत स्थानकांच्या उभारणीसाठी झाडांच्या कत्तलींबाबतचा प्रस्ताव गेल्या दोन महिन्यांपासून केंद्रीय वने व पर्यावरण तसेच वातावरणीय बदल या विभागांत प्रस्तावित होता, असे वनविभागातील अधिका-यांनी सांगितले. मुंबईतील स्थानकांची जागा अंदाजे दोन हेक्टरच्या आसपास आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानक उभारणीतील झाडांच्या कत्तलीनंतर झाडांचे पुनर्रोपण केले जावे, असा मुद्दा केंद्राच्या सदस्यांनी मांडला. मात्र पुनर्रोपणासाठी प्रस्तावित जागेत झाडे लावता येणार नाहीत, असा मुद्दा राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या मंडळाकडून मांडला गेला. परिणामी, दोन महिने झाडांच्या कत्तलीच्या प्रस्तावाला मंजूरी मिळण्यास अडचणी येत होत्या. अखेर गेल्या आठवड्याच्या शेवटी केंद्रीय वने व पर्यावरण तसेच वातावरणीय बदलांची टीम मुंबईतील प्रस्तावित स्थानकांची भेट घेऊन गेली. यावेळी वनाधिकारी तसेच राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधिकारीही उपस्थित होते. भौगोलिक मर्यादेमुळे झाडांचे पुर्नरोपण शक्य नसल्याने अखेरिस केंद्राच्या सदस्यांनी दुप्पट झाडांची सूचना करताच राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.