Samriddhi Highway Accident : बसचालक मद्यधुंद अवस्थेत; फॉरेन्सिक अहवालातून सिद्ध

168
Samriddhi Highway Accident : बसचालक मद्यधुंद अवस्थेत; फॉरेन्सिक अहवालातून सिद्ध

समृद्धी महामार्गावर शुक्रवारी ३० जून रोजी मध्यरात्रीनंतर नागपूर वरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या विदर्भ या खासगी बसचा भीषण अपघात (Samriddhi Highway Accident) झाला. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले. आता या अपघातासंदर्भातली मोठी बातमी समोर आली आहे. त्या बातमीनुसार या बसचा चालक हा अपघात घडला तेव्हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सिद्ध झाले आहे. ही माहिती फॉरेन्सिक अहवालातून उघड झाली आहे.

बसचालकाच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण जास्त

अमरावती मधील रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने दिलेल्या अहवालाप्रमाणे, ड्रायव्हर शेख दानिशच्या रक्तात मान्य प्रमाणापेक्षा ३० टक्के जास्त अल्कोहोल आढळलं आहे. महाराष्ट्रात ब्लड अल्कोहोल कंटेंट (BAC) म्हणजेच रक्तात अल्कोहोलचं मान्य प्रमाण १०० मिलिलीटर रक्तात ३० मिलीग्राम अल्कोहोल एवढं आहे. मात्र, रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालानुसार, दानिश शेखच्या रक्तात त्यादिवशी ३० टक्के जास्त अल्कोहोल आढळलं आहे. त्यामुळे मध्यरात्री घडलेला तो अपघात समृद्धी महामार्गामुळे नव्हे तर ट्रॅव्हल्स चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या मद्यपानामुळे घडला होता का अशी शंका व्यक्त केली जात आहे.

(हेही वाचा – Sextortion : तरुणाला आला तरुणीचा फोन…आणि ४६,९९९ रुपये गायब)

म्हणून बसचालकाला अटक

बसचे टायर फुटल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती बसचालकाने पोलिसांना दिली. परंतु, खरंच बसचा टायर फुटून अपघात झाला आणि बस नंतर पेटली की, ड्रायव्हरला डुलकी लागली होती?, याविषयी मात्र संशय निर्माण झाला. कारण बसचे टायर फुटून तो तुटल्याची कुठलीही निशाणी घटनास्थळावर पोलिसांना आढळली नाही. यासंदर्भात अधिक चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्या बसचालकाला अटक केली.

असा झाला अपघात

विदर्भ ट्रॅव्हल्सची (क्र. एमएच २९ बीई १८१९) ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. नागपूरहून शुक्रवारी ३० जून रोजी संध्याकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. तर १ जुलैच्या रात्री १ वाजून २२ मिनिटांनी धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटली. त्यानंतर काही वेळातच गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवासी बस पेटली आणि हा अपघात झाला असे वाहन चालकाचे म्हणणे आहे.

या अपघातातून ड्रायव्हर दानिश इस्माईल शेख आणि त्याचा सहकारी अरविंद जाधव हे दोघेही बचावले आहेत. या दोघांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत. बस डिव्हायडरला धडकून उलटताच हे दोघे बसच्या काचा फोडून पळाले, असे बसमधून वाचलेल्या दोन प्रवाशांनीच सांगितले. पोलिसांनी ड्रायव्हर दानिश इस्माईल शेख आणि क्लिनर जाधव यांना ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरू केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.