Mithi River मध्ये आजवर जिरवले गेले अडीच हजार कोटी रुपये; २० वर्षांनंतर आज…

486
Mithi River मध्ये आजवर जिरवले गेले अडीच हजार कोटी रुपये; २० वर्षांनंतर आज...
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मिठी नदीच्या विकासावर आजवर सुमारे २००० कोटी रुपये आणि मिठी नदी सफाई कामांवर ३३१ कोटी खर्च करूनही मिठी नदी (Mithi River) अजूनही प्रदूषितच आहे. मिठी नदीच्या खोलीकरणाचे काम पूर्ण होऊन संरक्षक भिंतीचेही काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, २० वर्षांनंतरही मिठीचे चित्र रुंदीकरणाशिवाय काही बदलले नाही. त्यामुळे मिठी नदीत अजून किती हजारो कोटी रुपये जिरवले जाणार आहेत म्हणजे मिठी पुन्हा शुद्ध होईल असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.

मुंबईतील विहार तलावातून मिठी नदीचा (Mithi River) उगम होऊन माहिम खाडी याठिकाणी समुद्रात मिळते. या नदीची एकूण लांबी १७.८४ कि. मी. आहे. वाकोला हा नाला असून तो मिठी नदीस मिळतो आणि याच मिठी नदीमुळे सन २६ जुलै २००५ रोजी मुंबईत महापूर आला होता. त्यानंतर सन २००६ पासून माधवराव चितळे समितीच्या शिफारशीनुसार, मिठी नदीचा विकास आणि त्यातील गाळ काढून या नदीला मूळ स्वरूपात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मिठी नदी विकासावरच २ हजार कोटींहून अधिक रक्कम खर्च केली गेली असून या व्यतिरिक्त येथील गाळ काढण्यासाठी सन २०२४ पर्यंत ३३१कोटी रुपये खर्च केल्याची आकडेवारी मिळत आहे.

(हेही वाचा – HIV Test : लग्न करायचं? आधी HIV रिपोर्ट दाखवा ! ‘या’ राज्यात येतोय नवा कायदा)

मिठी नदी (Mithi River) विकास प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांमध्ये करण्यात आलेले असून त्यातील टप्पा-१ अंतर्गत मिठी नदीचे १६ ते ६० मी रुंदीकरण व गाळ काढण्याचे काम एप्रिल २००६ ते जून २००६ दरम्यान पूर्ण करण्यात आलेले आहे. तसेच, टप्पा-२ अंतर्गत (सन २००७ ते २०१९ दरम्यान), मिठी नदीचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम, संरक्षक भिंत बांधण्याचे काम व सेवा रस्ता बांधण्याचे कामे करण्यात आलेली आहेत. उर्वरित कामे मिठी नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्प अंतर्गत प्रगतीपथावर असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मिठी नदी (Mithi River) विकास व प्रदूषण नियंत्रण प्रकल्पातंर्गत मुंबई महानगरपालिकेमार्फत मिठी नदीतील प्रदुषण नियंत्रित करण्यासाठी जानेवारी, २०१७ मध्ये सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती. सल्लागाराने सादर केलेल्या तांत्रिक व व्यवहार्यता अहवालानुसार लघुमुदतीची (पॅकेज-१) व दीर्घमुदतीची पॅकेज-२, ३ व ४) कामे सुचविली आहेत. पॅकेज १ मधील कामे पूर्ण झाली असून, पॅकेज २ व ४ मधील कामे प्रगती पथावर आहेत. पॅकेज-१ मधील कामे जानेवारी, २०२३ मध्ये पूर्ण झाली. पॅकेज ३ च्या कामाची निविदा मागविण्यात आलेली होती. पण, तांत्रिक कारणास्तव फेरनिविदा मागविण्यात येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

(हेही वाचा – Ladki Bahin Yojana : योजना महिलांसाठी पण पैसे गेले १४,२९८ पुरुषांच्या खिशात!)

मुंबई महापालिकेने मिठी नदीची (Mithi River) पूर समस्या दूर करण्यासाठी आणि मिठी नदीची जैवविविधता व पर्यटनवृध्दीसाठी मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प प्रारंभ केला आहे. यामध्ये विशेषत: मिठी नदीची वहन क्षमता वाढवण्यासाठी मिठी नदीचे अधिक खोलीकरण करणे, जपानी तंत्रज्ञानावर आधारीत बोगदा बांधणे, मिठी नदी लगत कृत्रिम तलाव व पाणथळ तयार करणे, नदीला बारामाही वाहते करणे, माहिम खाडीजवळ किंवा इतर ठिकाणी धरण किंवा बंधारे बांधून पंपिंग स्टेशन बनवणे, मिठी नदीत जलवाहतूक करणे, कांदळवनाचा विकास करणे, पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आरेतील मिठी नदीच्या किनाऱ्या लगत कृत्रिम जंगल बसवणे, मिठी नदी किनारी सुशोभिकरण व मनोरंजनात्मक बाबींचा विचार करणे, जैवविविधता जपून मिठीच्या किनाऱ्यालगतच्या भागात आणि मिठी नदीच्या विकास कामांमधून महसूल निर्मिती करणे आदी बाबींचा समावेश आहे.त्यानुसारच या कामांसाठी जागतिक दर्जाचे सल्लागार नियुक्त करण्यासाठी महापालिकेने मागवलेल्या निविदेमध्ये टीपीएफ इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड व पॅसिफि कन्स्ल्टंट ही कंपनी पात्र ठरली असून या कंपनीला सल्लागार सेवेसाठी ३५ कोटी ८७ लाख ९९ हजार ९९२ रुपये मोजले जात आहेत.

मिठी नदीच्या (Mithi River) खोलीकरणाच्या कंत्राट कामांमधील खडक फोडण्याच्या नावाखाली मोठा आधीच गैरव्यवहार झाला असून यावर कॅगनेही ताशेरे ओढले होते. नदीच्या खोलीकरणाचे काम जवळपास पूर्णत्वा आलेल असताना पुन्हा याचे खोलीकरण का केले जाते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता मिठी नदीतील गाळ काढण्याच्या आरोपांवर याची आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीने चौकशी सुरू आहे. यात काहीना अटक करण्यात आले. तसेच मिठीच्या किनाऱ्याचा परिसर सुशोभित करण्याचा प्रस्ताव यापूर्वी संमत करण्यात आलेले आहे तरीही त्याचा काही परिणाम दिसत नाही. मग मिठी नदीच्या विकास आणि गाळ काढण्यावर अजून किती कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत असा मुंबईकरांना पडू लागला आहे. महानगरपालिकेद्वारे सन २००५ पासून सन २०२४ पर्यंत मिठी नदीतील गाळ उपसा व स्वच्छता याकरिता रु.३३१,७३,०६,०९० एवढा खर्च करण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.