BMC : पश्चिम उपनगरातील ‘या’ अति सखल ठिकाणी तुंबणार नाही पावसाळी पाणी

पश्चिम उपनगरांत आणखी ३१ ठिकाणी निरनिराळ्या उपाययोजना प्रगतीपथावर असून पुढील वर्षभरात त्या पूर्ण होतील. परिणामी २०२४ च्या पावसाळ्याआधी पश्चिम उपनगरांतील या सर्व ठिकाणी पावसाच्या पाण्याचा वेगाने निचरा होवून जनतेला दिलासा मिळेल, असा महानगरपालिका प्रशासनाला विश्वास आहे. 

158

मुंबईत मागील काही वर्षांत अति सखल भागांत जोरदार पावसाने पाणी साचणाऱ्या ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून अविरतपणे कामे हाती घेण्यात आली आहेत. पश्चिम उपनगरांचा विचार करता, यंदा ४ सखल ठिकाणी पाणी साचण्यापासून पूर्णपणे दिलासा मिळणार आहे. पश्चिम उपनगरांत आणखी ३१ ठिकाणी निरनिराळ्या उपाययोजना प्रगतीपथावर असून पुढील वर्षभरात त्या पूर्ण होतील. परिणामी २०२४ च्या पावसाळ्याआधी पश्चिम उपनगरांतील या सर्व ठिकाणी पावसाच्या पाण्याचा वेगाने निचरा होवून जनतेला दिलासा मिळेल, असा महानगरपालिका प्रशासनाला विश्वास आहे.

मुंबई शहरासह पश्चिम उपनगरात नालेसफाईचे काम शाश्वत स्वरुपात हाती घेण्यात आले होते. पश्चिम उपनगरात वाढणारी नागरी वस्ती आणि उपनगराचा होणारा विस्तार या बाबींचा विचार करुन नागरिकांना कायमस्वरुपी दिलासा मिळेल, या पद्धतीने कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामध्ये नाले स्वच्छता आणि रुंदीकरण तसेच खोलीकरण आणि विस्तारिकरणाची कामे मुंबईत सुरु आहेत. मुंबईतील सखल भागांमध्ये अंधेरी सबवे सह अनेक नागरी वस्तीच्या भागात नागरिकांना पाणी साचण्यापासून दिलासा मिळेल, अशा पद्धतीने प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात आली असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सांगितले. पश्चिम उपनगरात उर्वरित कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करित असल्याचे उप आयुक्त (पायाभूत सुविधा)  उल्हास महाले यांनी यांनी स्पष्ट केले.

पश्चिम उपनगरात, पावसाळ्यात जोरदार पाऊस कोसळल्यास ज्या अति सखल भागांमध्ये पाणी साचते, अश्या ठिकाणी कालबद्ध प्रकल्प राबविण्यासाठी निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिले होते.

गोरेगाव स्क्वाटर कॉलनी परिसरात बॉक्स ड्रेन 

गोरेगाव (पूर्व) येथील स्क्वाटर कॉलनी परिसरात अस्तित्वात असलेली ६०० मिमी रुंदीची पर्जन्य जलवाहिनीची क्षमतावाढ करत ही जलवाहिनी १५०० मिमी रुंद क्षमतेची करण्यात आलेली आहे.

मालाड (पूर्व) पाटकर वाडी 

मालाड पूर्व येथे सेंट्रल ऑर्डीनन्स डेपो गेट ते पाटकर वाडी नाल्यापर्यंत पर्जन्य जल वाहिनी (बॉक्स ड्रेन) मुळे रहिवाशांना पाणी तुंबण्यापासून दिलासा मिळणार आहे. पाटकरवाडी हा सी. ओ. डी. (सेंट्रल ऑर्डीनन्स डेपो) व मालाड पूर्व रेल्वे लाईन या मधील सखल परिसर आहे. या वर्षी पाटकर वाडीच्या दक्षिणेकडे सी. ओ. डी. द्वारापासून कुरार नाल्यापर्यंत मंच्छुभाई रस्त्यालगत असलेली ६०० मिमीची पर्जन्य जलवाहिनी आता १२०० मिमी पर्यंत वाढवण्यात आली आहे. पर्जन्य जलवाहिनी बांधण्याचे काम पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत पूर्ण झाले आहे. पाटकर वाडीच्या उत्तरेला सी. ओ. डी. बफर झोनमुळे येणाऱ्या पाण्याच्या  लोंढ्याने पाटकर वाडी भाग जलमय होत होता. या समस्येवर उपाय म्हणून यावर्षी सी. ओ. डी. व रेल्वे लाईनच्या मध्ये एक खंदक बनवून त्याला उत्तरेकडे पोईसर नदीला जोडण्यात आले आहे. त्यामुळे पाटकर वाडीच्या उत्तरेकडून येणाऱ्या सी. ओ. डी. च्या पाण्याचा निचरा पोईसर नदीत होऊ शकेल व त्याचा पाटकर वाडीवर विपरीत परिणाम होणार नाही. या दुहेरी उपायांमुळे पाटकर वाडी येथील पावसाळी पाण्याचा निचरा यावर्षी जलद गतीने होईल.

(हेही वाचा Aurangzeb : एमआयएमचे पुन्हा उफाळून आले औरंग्यावरील प्रेम; शहराध्यक्ष फोटो घेऊन नाचला )

सांताक्रूझ स्थानक परिसर 

स्वामी विवेकानंद मार्ग ते लिंकिंग रोड दरम्यान असलेला जे.के. मेहता रस्ता व परिसर हा सखल भाग आहे. येथे पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक ठप्प होते. काही सोसायटींमध्ये देखील पाणी भरते. त्याचा परिणाम सांताक्रुझ स्थानक परिसरापर्यंत होतो. यावर उपाय म्हणून जे. के. मेहता रस्त्यावरील ४३० मीटर लांबीची बॉक्स ड्रेन १.५ मीटर रूंदी वरून ३.० मीटर रूंदीची करण्यात आली आहे. यामुळे यंदापासून या परिसरात जोरदार पावसाने पाणी साचण्यापासून नागरिकांना निश्चितच दिलासा मिळेल.

कार्गो संकूल नाला परिसरात समस्या निकाली 

सहार गाव तसेच अंधेरी कार्गो एअरपोर्टला (अंधेरी)  लागून असलेला नाला पूर्वी ४ ते ५ मीटर रुंद होता. या नाल्याचे खोलीकरण करणे देखील आवश्यक होते. नाल्याच्या भिंतीही जीर्ण अवस्थेत होत्या. सुमारे ६५० मीटर लांबीचा हा नाला विमानतळाची इंधन वाहिनी नाल्याच्या शेजारून जात असल्याने, त्याच्या रुंदीकरणाला मर्यादा येत होत्या. एअर इंडियासोबत पाठपुरावा करून ही इंधन वाहिनी काढल्यानंतर नाला आता ६ मीटर ते ८ मीटर रुंद करण्यात आला आहे. तसेच नाल्याचे खोलीकरणही करण्यात आले. त्यामुळे सहार गाव, आंतरराष्ट्रीय विमानतळ (कार्गो विभाग), सहार पोलीस ठाणे, सुतार पाखडी पोलीस ठाणे, चर्च पाखाडी विभाग आणि कार्गो विभाग या भागातील पावसामुळे पाणी साचण्याची समस्या निकाली निघाली आहे.

कांदिवली (पूर्व) येथील आकुर्ली मार्गावर बॉक्स ड्रेन विस्तारीकरण 

आर दक्षिण विभागात कांदिवली (पूर्व) येथील आकुर्ली मार्ग ते पश्चिम द्रुतगती मार्ग परिसरातील  सखल भागात जास्त पाऊस झाल्यानंतर जलमय परिस्थिती निर्माण होते. रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम होतो. पर्जन्य जल वाहिनी विभागाकडून आकुर्ली मार्गावरील ठाकूर हाऊस व आकुर्ली मार्गावरील सार्वजनिक शौचालयासमोर बॉक्स ड्रेन रुंद करण्यात आले. तसेच आकुर्ली छेद मार्ग क्रमांक ३ येथील रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्या रुंद करण्यात आल्या. त्यामुळे आकुर्ली मार्गावरील ठाकूर हाऊस परिसरातील नागरिकांना पावसाळ्यामध्ये हमखास दिलासा मिळेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.