आषाढी एकादशी वारी २०२३ : वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

विद्यापीठातील परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना या बदलांची माहिती दिली.

136
आषाढी एकादशी वारी २०२३ : वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

आषाढी एकादशी वारी २०२३ च्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडत आहे. येत्या १२ जून आणि १३ जूनला पालखीचा पुण्यात मुक्काम आहे. या पालखीनिमित्त पुणे विद्यापीठाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे विद्यापीठाने पालखी दरम्यान असणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षांचं वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध केले जाईल. याशिवाय सासवड परिसरात १४ जून ते १६ जून दरम्यान होणाऱ्या पालखी मिरवणुकीमुळे नियमित परीक्षेला बसू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.

विद्यापीठातील परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना या बदलांची माहिती दिली. मार्च २०२३ च्या उन्हाळी सत्र परीक्षा ६ जून रोजी सुरु झाल्या आणि मूळ परीक्षेचे वेळापत्रक आधीच जाहीर केले होते. मात्र काही महाविद्यालयांच्या विनंतीचा विचार करुन विद्यापीठाने पुणे शहरातून पालखीचे प्रस्थान होण्याच्या अनुषंगाने १२ आणि १३ जून रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे वेळापत्रक पुन्हा प्रकाशित करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Xiaomi ED : शाओमी इंडियाच्या दोन अधिकार्‍यांना ईडीची नोटीस)

सुधारित परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केले जाईल जेणेकरुन विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात सगळी माहिती मिळणार आहे. पालखी मिरवणुकीमुळे जे विद्यार्थी नियमित परीक्षेला बसू शकत नाहीत ते विशेष परीक्षा देण्यास पात्र असतील. मात्र विशेष परीक्षेसाठी अर्ज करावा लागणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज त्यांच्या संबंधित महाविद्यालयांमार्फत सादर करणे आवश्यक आहे. कोणताही विद्यार्थी विशेष परीक्षा देण्याच्या संधीपासून वंचित राहू नये यासाठी परीक्षा विभागाकडून संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे आणि अर्जांवर प्रक्रिया करण्यात येणार आहे. विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

हेही पहा

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.