१३०० छिद्रे, ६०० किलो स्फोटके; पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात

98

चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे नियोजन करण्यात येत असून त्यासाठीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे. शनिवार १ ऑक्टोबर रात्री ११ वाजेपासून ते २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत हा मार्गावरील वाहतूक बंद करुन २ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजता ब्लास्ट करण्यात येईल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गावरील सद्यस्थितीतील चौपदरी रस्त्याचे सहापदरीकरण करण्यासाठीचे रिटेनिंग वॉलचे व माती भरावाचे काम सुरू आहे. श्रृंगेरी मठाच्या समोरील सेवा रस्त्याचे कामदेखील करण्यात येत आहे. बावधनकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या रॅम्प क्र. ६ च्या खडकामध्ये ब्लास्टींगद्वारे खोदकामही सुरू आहे.

( हेही वाचा : रुग्णवाहिकेसाठी थांबला पंतप्रधानांचा ताफा; व्हिडिओ व्हायरल )

एनडीए ते मुंबई या रॅम्प क्र. ५ चे काम प्रगतीपथावर आहे. दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडसाठी रॉक ब्लास्टींगचे काम करण्यात येत आहे. अवजड वाहने शहराच्या बाहेर दोन्ही बाजूस (मुंबई बाजू व सातारा बाजू) थांबवावी लागणार आहेत. त्यासाठी टोल नाक्यावर व इतर ठिकाणी सूचना फलक लावण्याचे काम सुरू आहे. इतर वाहनांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यावरुन वाहतूक वळवावी लागणार आहे. त्यासाठी दिशा दर्शक फलक बसविण्याचे कामही सुरू आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, रायगड या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना नियोजित पूल पाडण्याच्या वेळेत वाहतूक नियोजनाबाबत माहिती देण्यात आली आहे.

प्रशासनाचे आवाहन

एकूण १३०० छिद्रांच्या ड्रीलिंगचे सर्व काम तसेच मुंबई बाजू व सातारा बाजूकडील स्लॅबवरील जिओ टेक्टाईल लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. ए-१ व ए-२ अबटमेंटमध्ये एक्सप्लोजीव मटेरीयल भरण्याचे काम सुद्धा झाले आहे. सॅन्ड बॅग भरण्याचे काम प्रगतीपथावर असून इतर कामे देखील करण्यात येत आहेत, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम यांनी दिली आहे. नागरिकांनी पूल पाडण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अत्यावश्यक कारण असेल तरच या मार्गाने प्रवास करावा, अन्यथा पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.