BMC : खड्ड्यांची तोंडे बंद !

158
BMC : खड्ड्यांची तोंडे बंद !
BMC : खड्ड्यांची तोंडे बंद !

सचिन धानजी

श्री गणरायांचे आगमन दोनच दिवसांनी होत आहे. (BMC) बाप्पाच्या या आगमनासाठी अवघी मुंबापुरी सजली आहे. सगळीकडे बाप्पाला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून ते सजावटीच्या सामानाच्या खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत आहे. चाकरमानीही गणपतीच्या सणासाठी गावाला रवाना होत आहेत. त्यामुळे ज्या देवाला आपण विघ्नहर्ता असे म्हणतो, त्या गणपती बाप्पाच्या उत्सवात कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये, अशीच प्रार्थना प्रत्येक भाविक करत असतो. प्रत्येक वर्षी मुंबईत बाप्पाच्या आगमन आणि विसर्जन मार्गात आणि गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या रस्त्यांत खड्डे ही समस्या कायमच राहते. त्यातूनही मग महापालिका आणि राज्यशासन हे बाप्पाच्या मार्गावरील आणि चाकरमान्यांच्या गावी जायच्या मार्गावरील खड्ड्यांची समस्या कमी करण्याचा प्रयत्न करत असले, तरी शेवटी पावसावरच सर्व अवलंबून असते.

(हेही वाचा – Importance Of Cow : गोमातेचे महत्त्व समाजाला पटवून देणे आवश्यक; अयोध्येतील श्रीराम मंदिर न्यासाचे स्वामी गोविंददेव गिरी महाराज)

यंदा मुंबईत बाप्पाच्या आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डयांची समस्या राहिलेली नाही, ही वस्तूस्थिती आहे. (BMC) या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या बैठकीत रस्त्यांवरील खड्डयांचा विषय प्रमुख असतो. तसेही या प्रमुख मार्गावर खड्डे पडणार नाही आणि पडले तर ते बुजवण्याचे काम मुंबई महापालिका युध्दपातळीवर करून खड्डयांचे विघ्न दूर करण्याचे काम करतच असते. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईतील रस्त्यांवर खड्डयांचे प्रमाण कमी आहे, हे मान्य करायलाच हवे. एखाद्याला ‘कानफाट्या’ म्हणून नाव पडले की, त्याने चांगले काम केल्यानंतरही त्याला वाईट संबोधत राहायचे हे योग्य नाही, त्यांनी जर चांगले काम केले असेल, तर त्यांचे निश्चितच कौतुक करून त्यालाही सुधारण्याची संधी द्यायला हवी. तेच या मुंबई महापालिकेच्या संदर्भात म्हणता येईल.

यंदा मुंबईतील खड्डयांची समस्या म्हणावी तेवढी जटील बनली नाही. कुठेही खड्डयांच्या तेवढ्या तक्रारी आल्या नाहीत, जेवढ्या मागील अनेक वर्षांत गणेशोत्सवाच्या तोंडावर यायच्या. त्यामुळेच समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे यंदा खड्डयांचा विषय हा जेवणात चवीला लोणचे लावायचे त्याप्रमाणे राहिला होता. याला कारण म्हणजे खड्डयांचे योग्य प्रकारे केलेले नियोजन आणि त्यावर सरकारच्या माध्यमातून असलेला दबाव. आजवर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याने प्रत्येक वर्षी खड्डयांची समस्या ही तीव्र होऊन या खड्डयांमुळेच मुंबई महापालिका बदनाम होत होती. तसे पाहिल्यास मुंबई महापालिका ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने या ठिकाणची दळणवळण व्यवस्था, व्हीआयपींची रेलचेल आदींमुळे या शहरातील खड्डयांकडे सर्वांचे लक्ष वेधले जाते. मुंबईपेक्षा बाजूच्या शहरात म्हणजे, ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई – विरार, मिरा – भाईंदर, नवी मुंबई आदी महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांवर जेवढे खड्डे असतात, त्याच्या ५ टक्केही खड्डे मुंबईत नसतात. चर्चा मात्र मुंबईतील खड्डयांची होत असते. (BMC)

मुळात मुंबईत नाही म्हटले, तरी दरवर्षी पडणाऱ्या एकूण पावसाच्या तुलनेत शहरात ९० टक्के आणि उपनगरांत सरासरी ९७ टक्के एवढा पाऊस पडला. मागील वर्षी हा पाऊस याच कालावधीत शहरात सरासरी ७८ टक्के आणि उपनगरांत ८५ टक्के एवढा पडला होता, म्हणजे मागील वर्षी याच कालावधीत १७४७ मि.मी आणि उपनगरांत २३०५ मि.मी पाऊस पडला होता. त्या तुलनेत याच कालवधीत शहरात २३१० मि.मी आणि उपनगरांत २६९५ मि.मी एवढा पाऊस पडला. सर्वसाधारणपणे आपण जर पाहिले, तर शहरात मागील वर्षीच्या तुलनेत ६०० मि.मी आणि उपनगरांत सुमारे ४०० मि.मी एवढ्या जास्त पावसाची नोंद झाली. त्यामुळे या वर्षी जास्त पाऊस पडूनही रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रमाण कमी राहणे यातूनच मुळी मुंबई महापालिकेने योग्य प्रकारे नियोजन करत योग्य प्रकारे खड्डे बुजवल्याचे स्पष्ट होते. यातून एकच संदेश दिला जावू शकतो, तो म्हणजे प्रशासनाला दमात घेऊन आणि त्यांच्यावर अंकूश ठेवून काम केले, तरच ते चांगले काम करू शकतात. अर्थात याला पावसानेही तेवढीच मोलाची साथ दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असला, तरी तो थांबून थांबून पडल्याने आणि मध्येच बरीच उघडीप घेतल्याने झालेल्या खड्डयांवर त्वरीत मलमपट्टी करून खड्डयांची तोंडे कायमची बंद करण्याची संधी महापालिकेला मिळाली आणि त्याचाच प्रत्यय आज मुंबईत प्रवास करताना आपल्याला येत आहे. त्यामुळे पूर्वी ‘रस्त्यात खड्डे की खड्डयांत रस्ते’, असे म्हटले जात होते, पण आता तर खड्डे शोधावे लागतात, अशी परिस्थिती आहे. दिसलेला खड्डाही महापालिकेचे रस्ते अभियंते आपली जबाबदारी समजून स्वत: किंवा कंत्राटदारांकडून भरून घेत आहेत.

मुळात यंदा खड्डयांचे प्रमुख मूळ असलेल्या पूर्व द्रूतगती महामार्ग आणि पश्चिम द्रूतगती महामार्ग यांची जबाबदारी महापालिकेने स्वत:वर घेत त्यांच्या देखभालीसाठी स्वतंत्र एजन्सी नेमली, त्याचाही नाही म्हटले, तरी खूप फायदा दिसून येत आहे. त्यामुळे खड्डयांसाठी कोणते तंत्र वापरता, हे महत्त्वाचे नसून या तंत्राचा वापर केल्यानंतर काही तास वाहतूक बंद ठेवणे, तसेच पावसाची उघडीप मिळणे, हेच आवश्यक असते. त्यामुळे या दोन्हींचा संगम जुळून आल्याने खड्डयांत ओतलेल्या प्रत्येक तंत्राची मात्रा जुळून आली. मग मास्टिक असो वा रॅपिड हार्डनिंग काँक्रिट असो. या तंत्राचा योग्य वापर, रस्ते विभागाच्या अभियंत्यांनी जबाबदारीने केलेले काम, विभाग कार्यालयांनी केलेली देखरेख आदींचा संगम जुळून आल्याने यंदा उत्सव हा खड्डेमुक्तीचा असेल. भविष्यात बाप्पांचे आगमन आणि विसर्जन मार्ग पूर्णपणे खड्डेमुक्त असू द्या, ही बाप्पांच्या चरणी प्रार्थना ! (BMC)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.