Veer Savarkar : ‘त्या तिघी…स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’ नाटकाचा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात विनामूल्य प्रयोग 

480

सावरकर बंधूचा त्याग, पराक्रम, कष्ट इतिहासात नोंदवला गेला आहे. पण हा त्याग, पराक्रम करत असताना त्यांच्या स्त्रिया कशा जगल्या? १६व्या वर्षी अष्टभुजा भवानीच्या  चरणांना स्पर्श करुन घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी स्वातंत्र्यवीर (Veer Savarkar) अंदमानात निघून गेले. पण त्यांच्या मागे माई कशा जगल्या? बाबाराव तर स्वातंत्र्यवीरांच्याही आधी अंदमानात जाऊन पोहोचले. पण त्यानंतर येसूबहिनी कशी जगली? या धामधुमीत वैद्यकीचं शिक्षण पूर्ण करून राष्ट्रकार्यही साधणाऱ्या नारायणरावांची केवळ १५ वर्षीय पत्नी कशी धीराने जगली? कष्टभरली आयुष्य अनेकींच्या वाट्याला येतात, पण या स्त्रियांचं वैशिष्ट्य आहे ते त्यांच्या जगण्याच्या पद्धतीत. आनंदी आणि रसाळ मन, उदात्त विचार आणि दुःखाचं हलाहल पिऊनही न ढळणारी देशनिष्ठा हे त्यांचे विशेष गुण त्यांना अढळपदी नेऊन बसवतात. या तिघींनी पतीविरह, हालअपेष्टा, उपासमार सहन करत असतानाही आपल्या पतींच्या राष्ट्रकार्याची धुरा निष्ठेने सांभाळली. अशा या वीरांगनांची शौर्यगाथा आजच्या तरुण पिढीला माहिती असणं, हे अज्ञात बलिदान, इतिहास प्रत्येक भारतीयाला ज्ञात होणं आवश्यक आहे. या वीरांगनांची शौर्यगाथा ‘त्या तिघी…स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’ या एकपात्री नाटकाच्या स्वरुपात सादर करण्यात आली आहे. या नाटकाचा ३४वा प्रयोग स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) सभागृहात रविवार, १० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताहोणार आहे. या नाटकासाठी प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. हा प्रयोग स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

(हेही वाचा Veer Savarkar : सवंग प्रसिद्धीसाठी सावरकरांवर टीका; जनता काँग्रेसला पुढच्याही निवडणुकांमध्ये धडा शिकवेल; रणजित सावरकरांचा हल्लाबोल)

सावरकर बंधूच्या त्यागाचा इतिहास साऱ्या जगाला ज्ञात आहे. पण या ज्ञात इतिहासातील अज्ञात इतिहास, अज्ञात बलिदान, अज्ञात समिधा आजही अज्ञातच आहेत, अबोल आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षी भीष्म प्रतिज्ञा घेऊन यज्ञकुंडात आत्मार्पण करण्यास सिद्ध असलेल्या तात्यारावांचे, भारतमातेच्या स्वातंत्र्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी तीन चंदनी समिधा अत्यंत मूकपणे झिजत होत्या. यशोदाबाई गणेश सावरकर (येसूबहिनी/बाई), यमुनाबाई विनायक सावरकर (माई) आणि शांताबाई नारायण सावरकर (ताई), सावरकर घराण्यातील तीन धीरोदात्त स्त्रिया ! या तीनही बंधूंच्या पत्नींनी त्यांना वैयक्तिक आयुष्यात आणि स्वातंत्र्यकार्यात कशी साथ दिली. अत्यंत खडतर परिस्थितीत एकमेकींसाठी कशा उभ्या राहिल्या? यावर आधारित अभिव्यक्त पुणे प्रस्तुत, एकपात्री नाटक ‘त्या तिघी… स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’. २३ मार्च २०१९ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यातील सुदर्शन रंगमंच येथे झाला होता. रविवार, १० डिसेंबर रोजी या नाटकाचा ३४वा प्रयोग होत आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कष्ट प्रकाशयोजना म.टा. सन्मान २०२१ पुरस्कारप्राप्त या नाटकाची संकल्पना, संहितालेखन, दिग्दर्शन, सादरीकरण, निर्मिती अपर्णा चोथे यांनी केले आहे. अपर्णा चोथे यांनी तब्बल १ तास ४० मिनिटे तिन्ही पात्रे एकटीनेच उभी करण्याची किमया साधली आहे. अजित यशवंत यांनी या नाटकाला संगीत दिले आहे, तर संकेत पारखे यांची प्रकाशयोजना आहे. महिलांसह, पुरुषांनीही हे नाटक जरूर पहावे अशा या नाटकाचा हा प्रयोग प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे.

(हेही वाचा Veer Savarkar : वीर सावरकर यांचे विचार फूट पाडणारे नव्हे; तर हिंदूंमध्ये बंधुभाव निर्माण करणारे; सात्यकी सावरकर यांचे प्रियांक खरगेंना प्रत्युत्तर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.