लसीकरणासाठी बाहेरील व्यक्ती मुंबईत… नगरसेवक झाले स्थानिकांच्या रोषाचे धनी

कोविन पोर्टलवरील नोंदणीचा फटका स्थानिकांकडून नगरसेवकांना बसत असल्याने, आता डोक्याला हात लावून बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

86

मुंबईत आपल्या विभागातील नागरिकांना सुविधा मिळावी, म्हणून प्रत्येक नगरसेवक लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आता ही केंद्र त्यांची डोकेदुखी ठरताना दिसत आहे. कोविन पोर्टलवर कोणताही नागरिक कुठेही लस घेण्यासाठी नोंदणी करू शकतो. याचा त्रास आता नगरसेवकांना सहन करावा लागत आहे. विभागतील नागरिकांना लसीकरणाची सुविधा मिळण्याऐवजी मुंबई बाहेरीलच व्यक्ती केंद्रात लसीकरण करुन जात असल्याने, नक्की हे केंद्र कोणासाठी खुले केले, असा सवाल स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे कोविन पोर्टलवरील या नोंदणीचा फटका स्थानिकांकडून नगरसेवकांना बसत असल्याने, आता डोक्याला हात लावून बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

काय होते नेमके?

मुंबई महापालिकेच्यावतीने सुरुवातीला काही ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आल्याने, विभागातील जनतेला यासाठी दूरवर जावे लागत आहे. म्हणून प्रत्येक नगरसेवकाने आपल्या विभागात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली. त्यानुसार काही नगरसेवकांच्या लसीकरण केंद्रांना परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात ते सुरुही झाले आहे. परंतु काही दिवसांपासून प्रत्यक्ष उपस्थित राहिलेल्या व्यक्तींना(वॉक इन पध्दतीने) लसीकरण करता येत होते. तोपर्यंत नगरसेवकांना लसीकरणाचा प्रश्न उद्भवला नाही. परंतु जेव्हापासून प्रशासनाने नोंदणी करुनच लस घेण्याचे निर्देश दिल्यापासून, आता नगरसेवकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

(हेही वाचाः लसीकरण केंद्रच ठरणार नगरसेवकांची डोकेदुखी)

मुंबई बाहेरील व्यक्तींनाच मिळतो जास्त लाभ

कोविन पोर्टलवर नोंदणीनुसार भारतातील कोणताही नागरिक कुठेही नोंदणी करू शकतो. त्यानुसार मुंबईतील ज्या केंद्रांवर गर्दी नाही, तेथील स्लॉट ओपन आहेत. तिथे मग मुंबईच्या बाहेरील व्यक्ती नोंदणी करुन लसीकरणासाठी हजेरी लावतात. त्यामुळे ज्या स्थानिकांसाठी हे लसीकरण सुरू केले आहे, त्या सर्वांनाच या लसीकरणाच्या सुविधेचा लाभ मिळत नाही. परिणामी मुंबई बाहेरीलच अधिक व्यक्ती लसीकरणासाठी येत असल्याने स्थानिकांकडून नगरसेवक रोषाचे धनी होताना दिसत आहेत.

नगरसेवकांची डोकेदुखी

भांडुप पूर्व कांजूर गाव येथील भाजपच्या नगरसेविका सरीता मंगेश पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या प्रयत्नांनी महापालिकेच्या माध्यमातून लसीकरण केंद्र खुले केले. परंतु या लसीकरण केंद्रामध्ये वसई-विरार, नवी मुंबई, नरिमन पॉईंट, डोंबिवली येथील नागरिकच लसीकरणासाठी येत असल्याची बाब समोर येत आहे. लसीकरणासाठी रांगेत असलेल्या लोकांना जेव्हा मुंबई बाहेरील व्यक्ती लसीकरणासाठी येत असल्याची माहिती मिळते, तेव्हा ते मग आम्हाला प्रश्न विचारतात, असे पवार यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आधीच पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नाही, दुसरीकडे मुंबई बाहेरील व्यक्ती याठिकाणी लसीकरणासाठी येत असल्याने स्थानिकांची नाराजी आहे. त्यामुळे किमान ज्या व्यक्तीचे आधार कार्ड लिंक करताना त्यावरील पत्ता ग्राह्य धरुन त्यांची नोंदणी केली जावी. जेणेकरुन स्थानिकांना जवळच्याच केंद्रात जाऊन लस घेता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

(हेही वाचाः लसीकरण केंद्रांवर ऑफलाईन नोंदणीसाठी का होते गर्दी? ही आहेत उत्तरे)

ही समस्या मुंबईतील सर्वच नगरसेवकांना भेडसावत असून यासाठी अधिक प्रमाणात लस उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे. परंतु प्रशासनाकडून याबाबत कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जात नसल्याने, नगरसेवकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.