AC Local : भिकारी तसेच बाल फेरीवाल्यांमुळे एसी लोकलमधील प्रवाशी हैराण

पासधारकांना एसी लोकलमध्ये फुकट्या प्रवाशांमुळे गर्दीचा सामना करावा लागत आहे, तिथे दुसरीकडे बाल फेरीवाले आणि भिकाऱ्यांच्या त्रासालाही सामोरे जावे लागत आहे.   

961

पश्चिम आणि मध्य रेल्वेवर वातानुकूलित (एअर कंडिशन) लोकल सेवेद्वारे प्रवाशांना गारेगार प्रवास देण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने केला आहे. परंतु या एसी लोकलमध्ये (AC Local) आधीच तिकीट तपासनीसांची हजेरी लागत नसल्याने फुकट्या प्रवाशांकडून या लोकलमध्ये प्रवास केला जात आहे.  या फुकट्या प्रवाशांमुळे आधीच अधिकृत तिकीट तथा पास धारकांना गर्दीतून उभे राहत प्रवास करावा लागत आहे, त्यातच आता या लोकलमधील गारेगार प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी भिकारी आणि बाल फेरीवाल्यांचीही संख्या वाढू लागली आहे. या भिकारी आणि बाल फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्येमुळे एसी लोकलचे प्रवाशी हैराण झाले आहेत.

railway 1

नियमित कडक तपासणीही टीसी यांच्याकडून होत नाही

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या सेवेत डिसेंबर २०१७ पासून वातानुकूलित लोकल दाखल झाल्या असून पश्चिम रेल्वे सोबतच आता मध्य रेल्वेतही या लोकल आता दाखल होऊ लागल्या आहेत. आतापर्यंत पश्चिम रेल्वेमध्ये सुमारे ९६ लोकलच्या फेऱ्या होत आहेत. तर मध्य रेल्वेत लोकलच्या फेऱ्या ६६ एवढ्या झाल्या आहेत. टप्प्या टप्प्याने मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या (AC Local) फेऱ्यांची संख्या वाढवली जात असली तरी या लोकलमधील प्रवाशांची नियमित कडक तपासणीही टीसी यांच्याकडून होत नाही. परिणामी टीसींच्या नियमित तपासणीच्या अभावी फुकटे आणि फर्स्ट क्लास तसेच जनरल तिकीटधारक बिनधास्तपणे एसी लोकलमधून प्रवास करत आहेत. त्यामुळे एसी लोकल आता गर्दीने भरुन धावू लागल्या आहेत.

(हेही वाचा Shri Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठाला चारही शंकराचार्यांचा विरोध आहे का? अखेर पुरीच्या शंकराचार्यांनी केला खुलासा )

अधिकृत पासधारक प्रवाशांकडून तीव्र नाराजी

या वाढत्या गर्दीमुळे एसी लोकलचे तिकीट तथा पासधारकांना उभ्याने तथा गर्दीत चिरडत प्रवास करावा लागत आहे. पासधारकांना एसी लोकलमध्ये (AC Local) फुकट्या प्रवाशांमुळे गर्दीचा सामना करावा लागत आहे, तिथे दुसरीकडे बाल फेरीवाले आणि भिकाऱ्यांच्या त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. एसी लोकलमध्ये भिकारी आणि फेरीवाल्यांना प्रवेश बंदी असतानाही बालकांचा वापर करत फेरीवाल्यांकडून आपला व्यावसाय करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  वस्तूंच्या विक्रीसाठी छोट्या बालकांचा वापर केला जात असतानाही रेल्वे पोलिस तथा आरपीएफ यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. याबरोबर संगीत वाद्ये वाजवत भिक मागणाऱ्यांचीही संख्या वाढू लागली आहे. याबरोबरच हाती पेन, टिश्यू पेपर आदी वस्तू विक्रीच्या नावाखाली  भिक मागणाऱ्या महिला आणि पुरुषांचीही संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे लोकल गाड्यांमधून भिकारी आणि बाल फेरीवाल्यांचा त्रास जाणवत नाही, त्याहून अधिक त्रास एसी लोकलमध्ये (AC Local) वाढू लागला आहे. त्यामुळे एसीच्या अधिकृत पासधारक प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासनींच्या द्वारे जर कडक तपासणी गर्दीच्या वेळेत केल्यास गाड्यांमधील गर्दीचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे तिकीट तपासनीसांकडून आधीच प्रवाशांची कसून तपासणी केली जात नाही. किमान या वाढत्या भिकारी आणि बाल फेरीवाल्यांना आळा घाला अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.