BMC : केवळ १ कि.मी. रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी तब्बल १६ कोटी रुपये होणार खर्च

1499
BMC : महापालिकेच्या उपायुक्ताला सेवानिवृत्ती ऐवजी एक वर्षांची वाढ?

मुंबई बाहेरील येवई जंक्शन ते येवई क्लोरिनेशन पॉईंट रस्त्यांचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. या केवळ एक किलो मीटर अंतराच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी विविध करांसह महापालिका प्रशासन (BMC) सुमारे १६ कोटी रुपये खर्च करणार आहे.

कोणत्या ठिकाणांना रस्ता जोडतो?

मुंबईला तानसा धरण, मोडक सागर धरण, मध्य वैतरणा धरण व भातसा धरणातून पाणी पुरवठा होत आहे. या धरणातील पाणी पिसे आणि येवई येथील जलशुध्दीकरण केंद्रातून मुंबईला पुरवठा केला जात आहे. पिसे आणि येवई दरम्यान सेवा रस्ता असून याचा वापर त्या परिसरातील महापालिकेच्या (BMC) कर्मचाऱ्यांकडून तसेच गावातील जनतेकडून केला जातो. मुंबई बाहेरील येवई क्लोरिन इंजेक्शन पॉईंट ते येवई जलाशय आणि येवई जंक्शन ते पिसे धरण हा ९ किमी लांबीचा हा सेवा रस्ता आहे. या रस्त्याचा वापर महापालिकेचे कर्मचारी हे जलवाहिन्यांची देखभाल व दुरुस्तीसाठी तसेच पांजरापूर जलशुध्दीकरण केंद्र, येवई क्लोरिन पॉईंट व पिसे धरण इत्याही ठिकाणी पोहोचण्यासाठी वापर करतात.

(हेही वाचा BMC : महापालिकेच्या सहायक आयुक्त आणि उपायुक्तांनाही रस्त्यावर पिटाळणार)

डांबरी आणि कच्च्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणमध्ये रुपांतर होणार

येवई ते पिसे धरणापर्यंतचा ८ किमी लांबीचा सिमेंट काँक्रिटचा रस्ता आहे, येवई जंक्शन ते येवई जलाशय प्रवेशद्वारापर्यंत ८०० मीटर लांबीचा डांबरी रस्ता आहे, तर येवई जलाशय प्रवेशद्वार ते येवई क्लोरिनेशन पॉईंटपर्यंत २०० मीटर लांबीचा खडीचा कच्चा रस्ता आहे. त्यामुळे येवई जंक्शन, जलाशय ते येवई क्लोरिनेशन पॉईँटचा १ किमी लांबीचा रस्त्याची सुधारणा करण्यात येणार आहे. हा रस्ता सध्या ५ मीटर रुंदीचा असून भविष्यात हा रस्ता १५ मीटर रुंदीचा केला जाणार आहे. तसेच सध्या असलेल्या डांबरी आणि कच्च्या रस्त्यांचे रुपांतर आता सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामांसाठी मागवलेल्या निविदेमध्ये रिध्दी एंटरप्रायझेस ही कंपनी पात्र ठरली असून या कामासाठी विविध करांसह १५ कोटी ८५ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. एक किलो मीटर अंतराच्या रस्ता बांधण्यासाठी महापालिका प्रशासन तब्बल १६ कोटी खर्च करणार आहे. या कंपनीने यापूर्वी अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा लिंक रोड पासून ईला नाल्यापर्यंत अभिषेक नाल्याचे  रुंदीकरणाचे काम डिसेंबर २०१९ मध्ये पूर्ण केले आहे. या निवड केलेल्या कंपनीला नाले रुंदीकरणाच्या कामांचा अनुभव असून आता रस्ते सिमेंट काँक्रिट कामांसाठी या कंपनीला पात्र ठरवण्यात आले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.