मलेरिया, डेंगी आजारांच्या प्रतिबंधासाठी आता कोविड फॉर्म्युला

192
मलेरिया, डेंगी आजारांच्या प्रतिबंधासाठी आता कोविड फॉर्म्युला
मलेरिया, डेंगी आजारांच्या प्रतिबंधासाठी आता कोविड फॉर्म्युला

सर्व खासगी प्रयोगशाळा व रुग्णालये यांनी त्यांच्याकडील सर्व डेंगी व मलेरिया रुग्णांची माहिती महानगरपालिकेला देणे बंधनकारक असेल, असे परिपत्रक कार्यकारी आरोग्य अधिकारी यांमार्फत काढण्यात आले आहे. तसेच कोविड काळात विभाग स्तरावर कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘कोविड वॉर रूम’ यांचा उपयोग डेंग्यू, मलेरिया व पावसाळी आजार यांच्या प्रतिबंधासाठी करण्याचे निर्देशही महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आहेत.

डेंगी, मलेरिया (हिवताप) या सारख्या आजारांशी मुकाबला करण्यासाठी व त्यांना प्रतिबंध करण्यासाठी महानगरपालिका सातत्याने सर्व स्तरावर प्रयत्न करीत असते. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे आणि उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱहाडे यांच्या मार्गदर्शनात नियमितपणे सर्व स्तरीय कार्यवाही करतानाच जनजागृती पर मोहीम देखील नियमितपणे राबविण्यात येत असते. मात्र, अनेकदा डेंगी-मलेरिया यासारख्या आजारांचे निदान लवकर न झाल्याने हे आजार बळावतात आणि प्रसंगी प्राणघातकही ठरू शकतात.

हीच बाब लक्षात घेऊन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनात महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य व संबंधित यंत्रणांची एक विशेष बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान डॉ. शिंदे यांनी कोविड विरोधातील लढ्याच्या धर्तीवर डेंग्यू मलेरिया विरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याची निर्देश दिले आहेत. या अंतर्गत डेंगी, मलेरियाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांचा मोहीम स्वरूपात शोध घेण्याचे व लक्षणे आढळून आल्यास वैद्यकीय चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या चाचणीमध्ये डेंगी, मलेरियाचे निदान झालेल्या रुग्णांनी वेळेवर औषध घ्यावे व आवश्यक ती काळजी घ्यावी, यासाठी ‘टेलिफोनिक फॉलोअप’ घेता यावा, याकरिता सर्व २४ विभागांमध्ये कार्यरत असलेल्या नियंत्रण कक्षांमार्फत कार्यवाही करण्याचे निर्देशही डॉ. शिंदे यांनी दिले आहेत, अशी माहिती महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली आहे.

१ जुलै २०२३ पासून तात्काळ लागू करण्यात आलेल्या सुधारित कार्यपद्धती अंतर्गत कोविडच्या धर्तीवर घरोघर जाऊन शोधमोहीम घेण्याचे निर्देश, आरोग्य केंद्रामार्फात केलेल्या शोध मोहिमेअंतर्गत डेंगी किंवा मलेरियाचा रुग्ण आढळून आलेल्या कुटुंबासह जवळपासच्या परिसरातील सुमारे २५० घरांमधील नागरिकांचे ‘रॅपिंड’ सर्वेक्षण करून तापसदृश्य रुग्णांचे रक्तनमुने संकलित करून त्याच दिवशी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहेत. त्यात तापसदृश्य रुग्णांना नजीकच्या महापालिका रुग्णालयात पाठवले जात आहे. रॅपिड सर्वेक्षण करताना वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते, कीटक नियंत्रण अधिकारी, कीटक नियंत्रण विभाग आणि मलेरिया संनिरीक्षण विभाग यांनी संयुक्तपणे मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून एकाच वेळी रुग्ण शोधणे, रुग्णांवर उपचार करणे आणि डासांची उत्पत्ती स्थळे शोधून ती नष्ट करणे यासारखी कार्यवाही एकत्रितपणे करणे शक्य होईल. तसेच अतिजोखमीचे महापालिका विभाग शोधून त्यावर कार्यवाही करता येईल.

नागरिकांना डासांची उत्पत्ती स्थळे कशी शोधावी व ती कशी नष्ट करावी याबाबत संयुक्त मोहिमेदरम्यान व्यापक जनजागृती व प्रचार करणे. तसेच खासगी इमारती, गृहनिर्माण संस्था या ठिकाणी एएलएम बरोबर बैठका आयोजित करणे. बांधकामाच्या ठिकाणी बैठका आयोजित करणे व जनजागृती करणे. तसेच कार्यालयीन ठिकाणी बैठका आयोजित करण्याचेही निर्देश डॉ. दक्षा शाह यांनी दिले आहेत.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी

हे करावे

  • दिवसा आणि रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिकारक (Mosquito Repellent) औषधांचा वापर करावा.
  • कुलर आणि लहान कंटेनरमधून नियमितपणे पाणी काढा, सर्व जलस्त्रोत पूर्णपणे झाकलेले आहेत याची खात्री करा.
  • डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे काढून टाका. जसे की, बाल्कनीत प्लॅट, एसी ट्रे, मातीची भांडी, फ्रीज ट्रे, धुतलेली भांडी ठेवणारे स्वयंपाकघरातील रॅक, खचाखच भरलेले स्वयंपाकघर आणि बाथरूमचे नाले, कूलर, बाथरूम आणि टाक्यांमध्ये गळती.
  • उघड्या बादल्या किंवा पाण्याचे डबे जे नियमितपणे वापरले जात नाहीत.
  • शोभिवंत फुलांच्या फुलदाण्या किंवा पाण्यासह शोपीस.
  • बोन्साई वनस्पती आणि इनडोअर वनस्पती.
  • डासांपासून बचाव करण्यासाठी पूर्ण बाजूचे कपडे घाला.

(हेही वाचा – मुंबईत राजकीय बैठकांचे सत्र; काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या बैठका)

हे करू नये:

जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर यांसारख्या वस्तू जमा करणे टाळा, कारण त्यातून डासांची उत्पत्ती होते.

डासांची पैदास होऊ नये म्हणून पाण्याचे डबे बंद ठेवा.

जलजन्य आजारांसाठी (गॅस्ट्रो, हिपॅटायटीस, टायफॉइड) खबरदारीचे उपाय:

गॅस्ट्रोपासून बचाव करण्यासाठी रस्त्यावरच्या उघड्या पदार्थाचे सेवन करणे टाळा.

खाण्यापूर्वी स्वच्छ हात धुवा किंवा सॅनिटायझरचा वापरा करा.

पाणी उकळून प्यावे.

एच १ एन १ च्या प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना

गर्दीची ठिकाणे टाळा.
शिंकताना किंवा खोकताना रुमालाचा योग्य वापर करावा.
वारंवार साबणाने हात धुवणे.
डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळा.
तीव्र ताप, श्वास घेण्यास त्रास किंवा त्वचा/ओठ निळे पडणे अशी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ मनपाच्या आरोग्य सुविधा केंद्रामध्ये जाऊन डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.
उपचारांना उशीर केल्याने गुंतागुंत होऊ शकते आणि मृत्यूचा धोका वाढू शकतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.